सोन्याचे दागिने, वितळलेले सोने, लॅपटॉप हस्तगत; विविध चोऱ्यांत सहभाग; पेडणे पोलिसांची कारवाई
विविध ठिकाणच्या चोरी प्रकरणांत दोघा सराईत चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, वितळलेल्या स्वरूपातील सोने आणि लॅपटॉपसह एकूण अंदाजे 53,68,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पेडणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी रोहन महादेव पडवळ (29, रा. वार्पेवाडो-पेडणे) आणि त्याचा साथीदार जगन्नाथ उर्फ केतन संजय बागकर (20, रा. रामनगर कोलवाळ) याला अटक केली आहे. दरम्यान, डिसेंबर 2024 पासून पेडणे, धारगळ, विर्नोडा, तुये आणि कोरगाव परिसरात घरफोडी आणि चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या, त्यात या चोरट्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
पेडणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती जाहीर केली. या पत्रकार परिषदेला पेडणे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख, निरीक्षक नितीन हळर्णकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर, श्री. वांगणकर आदी उपस्थित
होते.
पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबरला रात्री आठ ते बाराच्या दरम्यान तुये-पेडणेतील अनिल कांबळी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या लॉकेटसह मंगळसूत्र, एक सोन्याचा हार, सोन्याच्या लॉकेटसह तीन सोन्याच्या साखळ्या, दोन ब्रेसलेट, तीन अंगठ्या, चार सोन्याच्या कानातल्या जोड्या, दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा कडा, सोन्याची नथ आणि 22,000 रुपये रोख रक्कम लंपास केली होती. सर्व सोन्याच्या दागिन्यांची अंदाजे किंमत 8,00,000 रुपये एवढी होती.
या चोरी प्रकरणी विश्वसनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक पाळत ठेवून मिळालेल्या सुगाव्यावरून दोघाही चोरट्यांना 26 डिसेंबरला अटक करण्यात आली.
रोहन पडवळ याने मुथूट फायनान्सच्या पेडणे आणि धारगळ शाखेत चोरलेले सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. ते जप्त करण्यात आले, त्याची एकूण किंमत अंदाजे 21,48,460 रुपये आहे.
याशिवाय रोहन पडवळ याच्या पेडणे येथील राहत्या घरातून अंदाजे 80,000 रुपये किमतीचा एक लॅपटॉप, अंदाजे 40,000 रुपये किमतीचा एक लॅपटॉप आणि इतर सोन्याचे दागिने त्यात 13 सोन्याच्या बांगड्या, 7 सोन्याचे हार, चांदीच्या पैंजणांची एक जोडी, एक सोन्याचे पेंडेंट असा एकूण अंदाजे 18,00,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
त्याचबरोबर रोहन पडवळ याच्याने बँक ऑफ बडोदाच्या कोलवाळ शाखेत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पणजी व म्हापसा येथील सोनारांना विकलेले चोरीचे सोन्याचे दागिने असा अंदाजे 14,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपींना पेडणे येथे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

