देशातील ७३ जिल्ह्यांना तिसर्‍या लाटेचा धोका

0
50

>> आयसीएमआरचा इशारा, गोव्यातील जिल्हे नाहीत

देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत. कोरोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर पडून राहल्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी केले.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी, हिलस्टेशन्सवर जाणारे लोक कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यांनी शासकीय मार्गदर्शक तत्वांचे योग्य प्रकारे पालन करावे. अन्यथा आम्हाला नाइलाजाने पुन्हा निर्बंध लागू करावे लागतील. शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास महामारी पुन्हा भयानक प्रकारे येऊ शकते असा इशारा दिला.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या खूप कमी झाली असून सध्या जवळपास ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाची प्रकरणे ५ लाखांखाली आली आहेत. मात्र काही राज्यांत कोरोनाचे अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांचा पॉझिटिव्हीटी रेटही १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

लसीकरणाला वेग
डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा विषाणू तिसर्‍या लाटेला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर जास्ती जास्त भर दिला जात आहे. देशात सोमवार दि. ५ जुलैपर्यंत एकूण ३५,७१,०५,४६१ लशीचे डोस देण्यात आले आहेत. ज्यात पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या २४ तासांत ३१.४४ लाखांपेक्षा जास्त लशीचे डोस दिले गेले आहेत.