केंद्र सरकारकडून सहकार मंत्रालयाची स्थापना

0
63

मोदी सरकार आज बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सहकार क्षेत्रासाठी एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशात आता सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. सहकार क्षेत्रासाठी एक वेगळे मंत्रालय असावे या उद्देशाबरोबरच देशातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठीही या मंत्रालयाची निर्मिती करण्याचा केंद्राचा उद्देश आहे. सहकार में समृद्धी हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी धोरण आहे. त्यानुसार त्याला बळकटी देण्याचाही यामागे उद्देश आहे.

आज होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केंद्रीय सहकार मंत्रिपदाची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी, स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर बाबी व धोरणात्मक चौकट तयार करण्याचे काम सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत केले जाणार आहे.