दुग्धं गीतामृतं

0
31

योगसाधना – ५४३
अंतरंगयोग – १२८

  • – डॉ. सीताकांत घाणेकर

गायीचे दूध जसे पौष्टिक व आवश्यक आहे, तसेच उपनिषदांतील विचार व तत्त्वज्ञान पौष्टिक आहे. दूध शरीरासाठी व उपनिषदेे मन-बुद्धीसाठी. उपनिषदांतील उच्च, पवित्र विचार व्यक्तीचे जीवन प्रकाशमय, उज्ज्वल बनवते.

सर्व ब्रह्मांड भगवंतानी निर्माण केले आहे. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे या निर्मितीचा विस्तार फार मोठा आहे. सामान्य मानवाला अनाकलनीय असा. त्यात जड-चैतन्य, स्थूल-सूक्ष्म, दृश्य-अदृश्य…. असे सर्वकाही आहे.
पंचमहाभुते ः पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश अशी पंचमहाभुते आहेत. त्याचबरोबर वृक्ष-वनस्पती, जीव-जंतू, कृमी-किटक, पशुपक्षी हेसुद्धा आहेत. पण अत्यंत बुद्धिमान प्राणी मानव आहे. भगवंताची उत्कृष्ट कलाकृती. अत्यंत बुद्धिमान, हुशार, विचार करणारा असे अनेक गुण त्याला भगवंताने दिले आहेत. त्याचबरोबर विकार-वासना, षड्‌रिपु – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर…. हेदेखील दिले आहेत. तसेच प्रेम, वात्सल्य, करुणा, दया, समर्पण…. असे विविध सद्गुण दिले आहेत.

मानवाला संपूर्ण स्वातंत्र्य सृष्टिकर्त्याने दिले आहे. विश्‍वात सुख-शांती-सहयोगाने राहून स्वर्गनिर्मिती करायची की राग-द्वेष करून नरक करायचा हे त्याने ठरवायचे.

आपल्या थोर ऋषी-महर्षींनी या विषयावर पुष्कळ चिंतन केले व उच्च अशी भारतीय संस्कृती विश्‍वापुढे मांडली. त्यांना अनेक शुभ गोष्टी दिसल्या. पण मुख्य म्हणजे त्यांनी जास्त भर दिला तो पवित्रतेवर.
आपला अभ्यास चालला आहे तो गोमातेबद्दल- तिच्या महानतेच्या संदर्भात. श्रीमद् भगवद्गीतेबरोबर गीतामाहात्म्य व गीताध्यानदेखील आहे. गीताध्यानामध्ये एक श्‍लोक आहे-
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः|
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्‌॥
इथे म्हटल्याप्रमाणे-

  • उपनिषदे – या गायी
  • दूध काढणारे गोपाळकृष्ण
  • पार्थ हे वासरू
  • बुद्धिमान पुरुष हा भोक्ता
  • उत्तम दूध जे काढले आहे- ते गीतामृत.
    या श्‍लोकामध्ये मानवी जीवनाचे महान तत्त्वज्ञान आहे. गायीचे दूध जसे पौष्टिक व आवश्यक आहे, तसेच उपनिषदांतील विचार व तत्त्वज्ञान पौष्टिक आहे. दूध शरीरासाठी व उपनिषदेे मन-बुद्धीसाठी. उपनिषदांतील उच्च, पवित्र विचार व्यक्तीचे जीवन प्रकाशमय, उज्ज्वल बनवते. त्यातील रूपक समजणे आवश्यक आहे-
    भगवान श्रीकृष्णाने उपनिषदांतील विचार गीतारूपी दूध बनवून मानवतेसमोर ठेवले आहे. दुधाला जसे अमृत मानतात तसेच गीतादेखील अमृत आहे. म्हणून गीतेचे तत्त्वज्ञान शास्त्रशुद्ध रीतीने समजून त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने वागायला हवे. सर्व मानव समाजाचे व विश्‍वाचे कल्याण होईल. गीता म्हणूनच मानवी जीवनाचा ‘पथदर्शक’ ग्रंथ आहे.

श्रीकृष्णाने म्हटले आहे की गाय लगेच अंतःचक्षूंसमोर येते. त्यांनी गायीचे महत्त्व पुष्कळ वाढवले आहे. गायीला त्यांनी स्वतःच्या जीवनाचे अंग बनवले म्हणून तो ‘गोपाल’ झाला. ‘गोपालकृष्ण’ बनला. बालपणात तो गायींना घेऊन इतर गुराख्यांबरोबर डोंगर-जंगलात जात असे. त्यांच्याकडे अगदी प्रेमाने वागत असे. त्यांना गवतपाणी व्यवस्थित मिळते की नाही यावर लक्ष ठेवीत असे. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवीत असे. त्यामुळेच त्याच्या मुरलीची धून ऐकताच गायी वेड्या बनून त्याच्याकडे पळत येत असत.

‘गो’ अक्षर गायीशी संबंधित आहे. श्रीकृष्णाच्या जीवनात हे अक्षर असलेले इतर शब्द म्हणजे ‘गोकुळ’, ‘गोवर्धन’ (पर्वत). गोकुळातील गोपी, दूध, लोणी… यांच्या अनेक गोष्टी प्रसिद्धच आहेत. बालपणी या सर्व कथा प्रत्येक कुटुंबात आवडीने, प्रेमाने सांगितल्या जात असत. मुलांचा भाव वृद्धिंगत होत असे. आतादेखील त्या कथा आठवल्या की मन प्रसन्न होते.

गोवर्धनाची गोष्टदेखील सर्वांना माहीत आहेच. इंद्राचा अहंकार कमी करण्यासाठी हा पर्वत सर्व गोपांनी उचलला व श्रीकृष्णाने आपल्या करंगळीने त्याचा सर्व भार झेलला. त्यावेळी त्या लहान गोपालकृष्णाबद्दल फार प्रेम व आदर वाटत असे.

भारतीय संस्कृतीत गायीबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे महर्षी वसिष्ठांची गाय नंदिनी. राजर्षी दिलीप व महाराणी सुदक्षिणा यांनी नंदिनीची उत्कृष्ट सेवा केली. रघुवंशात महाकवी कालिदासांनी याबद्दल अतिशय सुंदर वर्णन केले आहे. ‘शाकुंतला’मध्ये यासंदर्भात पूजनीय पांडुरंगशास्त्री तो श्‍लोक कथन करतात-
आस्वादवद्भिः कवलैस्तृणानां कण्डूयनैदंशनिवारणैश्च|
आब्याहृतैः स्वैरगतैः स तस्याः सम्राट् समाराधनतत्पराऽभूत्‌॥
स्थितः स्थितामुच्चलितः प्रयातां निषेदुषीमासनबन्धधीरः|
जलाभिलाषी जलमाददानां छायेव तां भूपतिरन्वगच्छत्‌॥
राजा दिलीप हृदयाच्या ओढीने नंदिनीची सेवा करू लागला. कधीकधी तो स्वादिष्ट गवताचा घास बनवून स्वतःच्या हाताने तिला भरवीत असे. कधी तिचा देह खाजवीत असे. कधी मच्छर, माश्या वगैरे उडवी. ती जिथे जाऊ इच्छित असे तिथे तिला जाऊ देत असे. ती उभी राहिली की राजाही उभा राहात असे आणि ती चालू लागली की राजाही तिच्यासोबत चालू लागे. ती बसे तेव्हा राजाही बसत असे. ती पाणी पिण्याची इच्छा करी त्यावेळी तो तिला पाणी पाजीत असे आणि स्वतःही पीत असे. याप्रमाणे पडछायेप्रमाणे तो तिच्याबरोबर राहात असे. या अशा गोष्टी वाचल्या आणि रस्त्यावरील भटक्या गायी बघितल्या की बरेच विचार मनात येतात. त्या जनावरांची दया येते. स्वतःच्या असहायतेची जाणीव होते. राजकर्त्यांचा राग येतो. किती उदात्त होती या लोकांची, राजा-राणीचीदेखील वागणूक! आणि आता आपण?
लहानपणी माझ्या आजोळी एक पांढरी सफेद गाय होती. डोळे अगदी काळे होते. तिचे नाव होते कपिला. तिच्या पाठीवर हात फिरवला की ती शेपटी हलवायची. कपाळावर हात फिरवला की माझ्या तोंडाकडे बघत राहायची. तिच्या डोळ्यात मला मातेची माया दिसायची.

एक गोष्ट मी नोंद केली होती की तिला काहीही खायला दिले की ती रवंथ करायची. कितीतरी वेळ… मला त्या वयात ती तसे का करते ते माहीत नव्हते. मला वाटत असे की ती जास्त वेळ चावते कारण तसे केले तर कदाचित गवत गोड होत असावे. म्हणून मी एकदा गवताचा तुकडा चावायला सुरुवात केली. घरात आल्यावर आजीने विचारले- ‘‘तू काय चावतोस?’’
मी जीभ बाहेर काढून म्हटले, ‘‘गायीचे गवत!’’
आजी- ‘‘का?’’
मी- ‘‘हेच बघायला की गवत जास्त वेळ चावले की गोड लागते का?’’
आजी- ‘‘वेड्या, तसे कसे होणार? गाय शहाणी आहे. तिला ठाऊक आहे की जास्त चावल्यावर अन्न चांगले पचते. रक्त व्हायला मदत होते. म्हणून मी तुला अनेकवेळा सांगते की तू ‘भका भका’ जेवू-खाऊ नकोस. गायीसारखं चावून- रवंथ करून खा.’’
खरे म्हणजे त्यापूर्वी मी अगदी ‘भका भका’ खायचो. गायीपासून मी हा धडा शिकलो.
प. पू. पांडुरंगशास्त्रीजी यासंदर्भात छान बोध देतात-
‘गाय परोपकारी तर आहेच, परंतु तिच्या परोपकाराबरोबर तिचा रवंथ करण्याचा गुणही ध्यान आकर्षित करील असा आहे. गवताचा रवंथ करून-करून, त्याचे दुधात रूपांतर करणार्‍या गायीला सुपात्र गणण्यात आले आहे, तर दूध पिऊन विष ओकणार्‍या सापाला अपात्र गणण्यात आले आहे.’
पात्रापात्रविवेकोऽस्ति धेनुपन्नगयोखि|
तृणात्संजायते क्षीरं क्षीरात्संजायते विषम्‌॥
आपणही आपल्याजवळ येणारे विचार किंवा हेतू यांचा तत्काळ स्वीकार न करता गायीप्रमाणे रवंथ करून, त्याच्यावर मनन केले तर समाजात होणारे कितीतरी अनर्थ टळतील. तसेच रवंथ करून बाहेर पडलेले विचार आपल्यासाठी तसेच समाजासाठी शुभदायी व पुष्टदायी बनतील.

बालपणात आजीकडून मी एक साधा-सोपा धडा शिकलो व शास्त्रीजींसारखा महापुरुषाकडून मानवी जीवनाचे एक फार मोठे तत्त्वज्ञान ज्ञात झाले.
आपण अन्न ग्रहण करतो तसेच विचारदेखील ऐकतो-वाचतो. अन्नाला जसे रवंथ करायचे असते तसेच विचारांनादेखील चिंतन-मनन करून मग कथन करायचे असते. म्हणजे इतरांना वाटायचे असते. म्हणून शास्त्रकारांनी सांगितले आहे-

  • सत्‌श्रवण| सत्‌पठण – सत्‌चिंतन- सत्‌मनन – सत्‌कथन. हे इतरांना कथन करता करता आपोआप सत्‌चरित्र्य घडते.
    आपल्या योगसाधकांना ही सर्व प्रक्रिया माहीत आहे आणि त्याप्रमाणे ते तसे करतातदेखील.
    (संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृती पूजन (गो-पूजन)