वनस्पती आणि आरोग्य

0
37

औषधी वनस्पतींचा वापर केला तर हल्ली विकत आणावी लागणारी कितीतरी औषधे आणावी लागणारच नाहीत. गावपातळीवरची आरोग्यसेवा चांगली उभी राहण्यासाठी ही औषधे फारच उपयोगी आहेत. त्यामुळे शक्य झाल्यास औषधी वनस्पतींची बाग तयार करावी.

आपण राहतो तिथे आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. त्यातल्या काही मोसमी-अल्पजीवी तर काही बहुवर्षीय असतात. हल्ली पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने वनस्पतींची मुबलकता कमी होत आहे. अशा परिस्थितीत बहुउपयोगी वनस्पतींचे संवर्धन करून आपण आरोग्य रक्षणाचे काम चालू ठेवू शकतो.
आरोग्य आणि औषधोपचार फक्त पॅकबंद आणि इंग्रजी लेबलच्या बाटल्या-गोळ्यांतूनच येतात हा समज चुकीचा आहे. सभोवतालच्या निसर्गातून आरोग्यरक्षण करता येते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपण आपल्या औषधी वनस्पतींची यादी करायला बसलो तर कितीतरी मोठी यादी तयार होईल.
औषधी वनस्पती
तुळस, गुळवेल, नागरमोथा, कंबरमोडी, कोरफड, पुनर्नवा, पाणकणीस, धोत्रा, कडुनिंब, कुडा, सातवीण, भुईरिंगणी, आघाडा, शंखपुष्पी, टाकळा, हिरडा, बेहडा, एरंड, भुईआवळा, पळस, साग, आवळा, अडुळसा, बहावा, त्रिधारीनिवडुंग, सागरगोटा, सुंठ, आले, हळद, पिंपळी, हरळी, मुरुडशेंग, धायटी, पपई, गोखरू, तालीमखाना, शिकेकाई, लिंबू, करंज, सीताफळ, काटेसावर, बाभूळ, दातवणाची झाडे, रुई, बिब्बा, अफू, रिठा, अर्जुन, आंबेहळद, जमालगोटा, इंद्रावण, इसबगोल, लसूण, ओवा अशी लांबलचक यादी तयार होईल. औषधी म्हणून उपयुक्त ठरलेल्या औषधी वनस्पती अक्षरशः शेकडो आहेत. आपण आपल्या सभोवतालच्या उपलब्ध वनस्पतींमधून पंधरा-वीस वनस्पतींची ओळख करून घेतली तरी पुरते. सर्व वनस्पती काही एकाच ठिकाणी उपलब्ध नसतात. तसेच स्थलकालाप्रमाणे त्यांच्यात गुण कमी-जास्त असतो.
वनस्पतींबरोबरच इतर काही साधने-
मध, जळवा, मेण, राळ इत्यादी आजूबाजूला सापडू शकतील. या सर्व माहितीबरोबर वनस्पतींच्या विषारी गुणधर्माचीही माहिती घ्यावी. आजूबाजूच्या सापांचे प्रकार, विषारी किटक इत्यादी माहीत होणे आवश्यक आहे. असे निसर्ग निरीक्षण नसेल तर आपल्या वैद्यकीय ज्ञानात आणि कौशल्यात मोठी उणीव राहून जाईल. वनस्पतीपैकी अल्पजीवी मोसमी वनस्पती मुख्यतः ऑगस्ट-जानेवारी (श्रावण ते माघ, पौष-नारळी पौर्णिमा ते संक्रांत) या काळात आढळतात. या काळात त्यांना भरपूर पालवी, फुले, फळे असतात. वनस्पती गोळा करताना सकाळी गोळा कराव्यात. म्हणजे त्यात रस जास्त असतो, पण दव असेल तर मात्र दुपारी घ्याव्यात. दवाच्या दमटपणाने वनस्पती खराब होते. ऑक्टोबरनंतर पाऊस कमी होतो. या काळात वनस्पती सावलीत वाळवून ठेवाव्यात. वाळवण करताना मधूनमधून हात फिरवून सर्व भागांस सारखा मोकळेपणा मिळेल अशी काळजी घ्यावी. नाही तर खालच्या वनस्पती ओल्या राहणे, बुरशी लागणे वगैरे अडचणी येतात. वनस्पती चांगली सुकल्यावर सर्वसाधारणपणे मूळ वजनाच्या तिसरा हिस्सा वजन होते. वनस्पतींना उष्णता देऊन औषधीकरण करायचे असल्यास मार्चमध्ये करावे. तोपर्यंत वनस्पती पूर्ण कोरड्या होतात आणि उष्णताही कमी लागते.
या वनस्पतींचा वापर केला तर हल्ली विकत आणाव्या लागणार्‍या औषधांपैकी कितीतरी औषधे आणावी लागणारच नाहीत. पूर्वी आजीच्या बटव्यातून आणि स्त्रियांच्या पारंपरिक ज्ञानानुसार अनेक वनस्पतींचा औषधी वापर होत असे. अजूनही बर्‍याच प्रमाणात ही बहुमोल परंपरा टिकून आहे. गावपातळीवरची आरोग्यसेवा चांगली उभी राहण्यासाठी तर ती फारच आवश्यक आहे. त्यामुळे शक्य झाल्यास आपल्याला औषधी वनस्पतींची बागही तयार करता येईल.