‘किडनी’बाबत निष्काळजीपणा नको!

0
112
  • डॉ. मनाली महेश पवार

जागतिक ‘मूत्रपिंड दिवस’ जगभर मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी साजरा केला जातो. मूत्रपिंड (किडनी) हा शरीरातील महत्त्वाचा अवयव. त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने मनुष्य विविध आजारांना बळी पडतो. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी म्हणून हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

जागतिक ‘मूत्रपिंड दिवस’ जगभर मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी साजरा केला जातो. मूत्रपिंड (किडनी) हा शरीरातील महत्त्वाचा अवयव. त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने मनुष्य विविध आजारांना बळी पडतो. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी म्हणून हा दिवस जागतिक पातळीवर ‘मूत्रपिंड दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

आता कडाक्याच्या थंडीनंतर ऊन वाढायला सुरुवात झाली आहे. थंडी कमी होऊन सूर्याची किरणे प्रखर होऊ लागली आहेत. वारंवार तहान लागणे, कफाचा प्रकोप होऊन कफ पातळ झाला आहे व विविध आजार निर्माण करत आहे, लघवीच्या तक्रारी वाढल्या आहेत, अशा अवस्थेत ‘मूत्रवहनसंस्थे’ची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

आयुर्वेदात शरीरातील तेरा स्रोतांचे वर्णन केले आहे, त्यांपैकी एक मूत्रवहन स्रोत आहे. आपल्या शरीरात जे काही भावपदार्थ आहेत, त्या सर्वांचे आपापले असे स्रोत आहेत. या स्रोतात ते राहतात, स्रोतातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेले जातात, रूपांतरित होतात. सर्व शरीरघटकांच्या क्रिया स्रोतांच्या आधारे होत असतात. त्यामुळे या मूत्रवहन स्रोताची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

रोजच्या घडामोडीत शरीरात जे काही पदार्थ निर्माण होतात, ज्यांची शरीराला अजिबात गरज नसते, असे पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे काम मूत्रसंस्था करत असते. मूत्रसंस्थेचे काम फक्त लघवीपर्यंतच मर्यादित नाही. मूत्रसंस्थेचे काम रक्तशुद्धी हेही आहे. अशुद्ध झालेले रक्त शुद्ध करण्याचे काम फुफ्फुसांबरोबर मूत्रपिंडही करत असतात. मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरातील अतिशय परिणामकारक अशा चाळण्या होत. हे कार्य करण्यासाठी ईश्‍वराने माणसाला दोन मूत्रपिंडे दिली आहेत, त्यांची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक मूत्रपिंडात दहा लाख छोट्या-छोट्या चाळण्या असतात. या चाळण्यांना ग्लोमुलर ऍपरेट्‌स असे म्हणतात. २४ तासांमध्ये या दोन्ही मूत्रपिंडातील वीस लाख ग्लोमुलरमध्ये १८० लिटर पाणी गाळले जाते. यापैकी १७८ लिटर पाणी परत शोषले जाते. सर्वसाधारण १५०० सी.सी. पाणी रोज लघवीवाटे बाहेर पडते. जेव्हा आपण म्हणतो की मूत्रपिंडे काम करीत नाहीत, त्यांचे कार्य बिघडले आहे, त्यावेळी या वीस लाख चाळण्या काम करेनाशा झाल्या आहेत असे समजावे. वयपरत्वे साधारण ६० वर्षांनंतर हळूहळू नैसर्गिकरीत्या या चाळण्यांचे काम मंदावते व त्यांची कार्यक्षमता कमी-कमी होऊ लागते.

वारंवार इन्फेक्शन (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे प्रत्येक वेळी थोड्या-थोड्या चाळण्या निकामी होऊ लागतात, चाळण्या काम करेनाशा होतात, अशावेळी मूत्रपिंड काम करत नसल्याची लक्षणे आढळतात.
वेदनाशामक औषधे व काही प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक) सतत सेवनाने चाळण्याचे आयुष्य संपून जाते. आयुर्वेद शास्त्रानुसार अशक्त व्यक्ती तसेच जखमी व्यक्तीच्या मूत्रसंस्थेतही बिघाड होऊ शकतो.
लघवीचा वेग अडविल्यास, विशेषतः लघवीची संवेदना जाणवत असतानाही जेवल्यास, पाणी प्यायल्यास किंवा मैथून केल्यास मूत्रवहनस्रोत बिघडते. लघवीचा वेग जबरदस्तीने अडवून ठेवणे ही गोष्ट आरोग्यासाठी हानीकारक आहे.

अती व्यायाम, तीव्र औषधांचे सेवन, मद्यपान, वाहनातून सतत प्रवास, दलदलीच्या प्रदेशात राहणे, अति प्रमाणात मासे खाणे, अपचन असताना परत खाणे या सर्व कारणांनी प्रकुपित झालेले दोष बस्तीमध्ये क्षोभ उत्पन्न करून मूत्रदोष उत्पन्न करतात. मूत्रवहनस्रोतात बिघाड झाला असता शरीरावर खालील लक्षणे दिसतात-

  • लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीला खूप प्रमाणात होणे.
  • लघवीला वारंवार पण प्रत्येक वेळी कमी होणे.
  • लघवी दाट होणे.
  • लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे.
  • लघवी करताना जोर करावा लागणे.
  • लघवीची धार बारीक असणे.
  • लघवी झाली तरी समाधान न होणे.
  • लघवीची संवेदना झाली तरी जास्त वेळ अडवून धरता न येणे.
  • हसले, खोकले की थोडीशी मूत्रप्रवृत्ती होणे.
    अशी काही लक्षणे दिसू लागल्यास मूत्रवहनस्रोतात बिघाड आहे हे जाणावे व वैद्याचा लगेच सल्ला घ्यावा. उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लघवीचा वेग अडविल्यास अंगदुखी, डोकेदुखी, मुतखडा होणे, मूत्राशयात वेदना होणे इत्यादी त्रास होऊ लागतात. अनेकदा कळत-नकळत असे घडत असते पण त्याचा दुष्परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. पचनानंतर मल या स्वरूपात मूत्र तयार होत असते. प्रमाण साधारण चार ओंजळी असते.

मूत्राचे वहन हे महत्त्वाचे कार्य आहे. मात्र आपण जे खातो-पितो तेवढाच द्रव नाही तर संपूर्ण शरारातील अनावश्यक ओलावा, द्रवभाग मूत्ररूपाने बस्तीत एकत्र येऊन शरीराबाहेर टाकला जातो. म्हणूनच मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी झाले की अंगावर सूज येते. अशा वेळेस मूत्र योग्य प्रमाणात तयार होण्यासाठी औषधोपचार करावेत.
यावर केले जाणारे सामान्य उपचार असे-
स्वेदन ः यात ओटीपोटीवर गरम लेप, काढ्याची कोमट धार धरावी किंवा शेकावे.
अवगाहन ः सोसवेल इतक्या गरम औषधी काढ्यात ओटीपोटीचा भाग बुडेल अशा पद्धतीने बसून कटीस्नान घ्यावे.
अभ्यंग ः औषधी सिद्ध तेल जिरवावे. सर्वांगाला अभ्यंग करावे.
धृतपान ः घरचे ताजे, शुद्ध, साजूक तूप सेवन करावे.
बस्ती (एनिमा) ः औषधी सिद्ध तेलाने किंवा औषधी काढ्याची बस्ती घ्यावी.
पिचुधारण ः औषधी वनस्पतींनी सिद्ध तेलाने/काढ्याने शिजवलेला पिचू योनी भागी ठेवावा.

बस्तीची शुद्धी केल्यावर मूत्राची मात्रा वाढवणार्‍या औषधी द्रव्यांचा वैद्याच्या सल्ल्याने उपयोग करावा. त्यासाठी विदारी कंद, गोरूख, पुनर्नवा, दर्भ, कूश, पाषाणभेद इत्यादी द्रव्यांचा वापर करावा.
पुनर्नवा, चंद्रप्रभा, गोक्षूर, शतावरी धृत, वरुणादी काढा, पुनर्नवासव, उशीरासव, चंदनासव इत्यादी मूत्रवहनसंस्थेवर कार्य करणारी प्रभावी औषधे आहेत.

रोज भरपूर पाणी प्या. तहान लागेल त्या-त्या वेळी पाणी प्यावे. गरमी वाढली म्हणजे पाण्याचे प्रमाणही वाढवावे. साधारण २ ते ३ लीटर, प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार व ऋतुबदलांनुसार पाणी प्यावे. योग्य आहार घ्यावा. तुमच्या आहारावरच तुमचे आरोग्य अवलंबून असते. रोज सकस आहार घ्या. फास्ट फूड, जंक फूड, पॅकेटबंध फूड, बेकरी खाद्यपदार्थ इत्यादींचा परिणाम थेट किडनीवर होतो. त्यामुळे आहारात जलीय कलिंगड, संत्रे, द्राक्षे, लिंबू यांसारखी फळे खावीत. ताकात यवक्षार टाकून घेतल्यास लघवी मोकळी व्हायला मदत होते. कुळथाचे सूप घेतल्यास कष्टपूर्वक मूत्रप्रवृत्तीत उपयोग होतो. शहाळ्याचे पाणी, तांदळाची पेज बस्तीच्या शुद्धीकरणासाठी उत्तम होय. साळीच्या लाह्या चार-पाच तास पाण्यात भिजवून त्याचे पाणी पिल्यास लघवी स्वच्छ होते. उसाचा रसही मूत्रप्रवृत्ती वाढवणारा आहे. फळांचा ताजा रस घेणे हे किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. चहा-कॉफी टाळा. बीट व पालक या भाज्याची शक्यतो टाळा. योग्य व नियमित व्यायाम करा. लठ्ठपणाचा थेट परिणाम किटनीवर होत असतो. तेव्हा नियमित थोडातरी प्रत्येकाने व्यायाम करावा. सूर्यनमस्कार घातले तरी चालेल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा. तुम्ही घेतलेले प्रत्येक औषध गाळणीतून चाळले जाते. त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. धूम्रपान व मद्यपान टाळा.