दिवसभरात ४९७ नवे कोरोना रुग्ण; ८ मृत्यू

0
121

>> कोरोनाचा कहर सुरूच; मृतांची एकूण संख्या १६५

गणेश चतुर्थीच्या काळात कोरोना चाचण्याच कमी झाल्याने नवी रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत असताना काल पुन्हा कोरोनाचे थैमान दिसून आले. काल दिवसभरात तब्बल ४९७ कोरोनाबाधित आढळून आले, तर आणखी आठ जणांचा मृत्यू ओढवला. राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने आता पंधरा हजारांची संख्या पार केली असून एकूण रुग्णसंख्या १५०२७ झाली आहे. सध्या कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या ३३५१ झाली आहे, तर आजवर ११५११ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोनाने मृत पावलेल्यांची एकूण संख्या १६५ वर जाऊन पोहोचली आहे.

पेडे – म्हापसा येथील एका ६४ वर्षीय महिलेला काल उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात मृतावस्थेत आणण्यात आले होते, ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. फातोर्डा – मडगाव येथील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येत असता वाटेत त्याचा मृत्यू झाला.

सावर्डे येथील ६० वर्षीय रुग्ण, फातोर्डा येथील ७२ वर्षीय रुग्ण यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. आर्लेम येथील एका ४३ वर्षीय तरुणाचा कोविड इस्पितळात मृत्यू ओढवला. चिंचिणी येथील ७१ वर्षीय रुग्ण फातोर्डा येथील ६२ वर्षीय रुग्ण व बेलाबाय – वास्को येथील ६३ वर्षीय रुग्ण मिळून तिघांचा कोविड इस्पितळात काल कोरोनाने मृत्यू झाला.

२७१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी १९१४ जणांचे अहवाल नकारात्मक आले, आणखी ३०३ अहवाल प्रलंबित आहेत. इस्पितळांच्या आयसोलेशन वॉर्डांत सध्या आणखी ९८ रुग्ण असून विविध रेसिडेन्सी व हॉटेलांत ३६ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यातील घरगुती विलगीकरणाखाली एकूण रुग्णांची संख्या ३९२९ आहे.