खरा सूत्रधार

0
195


पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड दुसरा तिसरा कोणी नसून जैश ए महंमदचा म्होरक्या मौलाना मसुद अजहर हाच असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात ठासून सांगितले आहे. हे आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाला खरा, परंतु या भीषण दहशतवादी हल्ल्याचे सर्व धागेदोरे जुळवून त्याची सुसंगती लावणे हेच एक मोठे आव्हानात्मक काम होते हे लक्षात घेता हा विलंबही समर्थनीय ठरतो. सदर दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोराच्या आणि त्याच्या कारच्या चिंधड्या उडाल्या, त्याचे साथीदार त्यानंतर महिन्याभरातच एन्काऊंटरमध्ये मारले गेले, त्यामुळे हल्ल्याचा सूत्रधार कोण, त्याची जुळवाजुळव कशी झाली, त्यात कोण कोण सामील होते हे सगळे शोधणे हे फार अवघड काम होते. परंतु तरीही राष्ट्रीय तपास संस्थेने सर्व धागेदोरे व्यवस्थित जुळवत तेरा हजार पानी आरोपपत्राची जुळणी केली आहे हे विशेष आहे.
या हल्ल्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे पुरावे एनआयएने मिळवले आहेत. हल्ल्यात वापरली गेलेली मारुती कार आदिल अहमद दार याची होती हे सिद्ध झाले आहे. ई कॉमर्स संकेतस्थळांवरून या स्फोटासाठी लागणारी रसायने, शक्तिशाली बॅटर्‍या व मोबाईल फोन विकत घेण्यात आली होती हे सिद्ध झाले आहे. कट कार्यवाहीत उतरवणार्‍या उमर फारुकच्या मोबाईल चॅटचा तपशील, त्यातील छायाचित्रे, व्हिडिओ यांचे भरभक्कम पुरावे एनआयएने मिळवले आहेत, जे अंतिमतः पाकिस्तानकडे बोट दाखवत आहेत.
एनआयएच्या या आरोपपत्रानुसार या हल्ल्याच्या कटामध्ये १९ जण सामील होते. त्यापैकी सहा जण आजवर ठार झाले, सात जणांना अटक झाली, तर सहा जण अजूनही फरार आहेत व बहुधा पाकिस्तानात पळून गेल्याचा संशय आहे. या १९ जणांपैकी बारा जण स्थानिक काश्मिरी युवक होते हेही उल्लेखनीय आहे. मौलाना मसूद अजहरच्या ‘शहादत’च्या हाकेला ओ देत हे तरुण या हल्ल्याच्या कटकारस्थानात ‘जैश’ची प्यादी म्हणून वावरले. परंतु या कटाची सारी सूत्रे पाकिस्तानातून हलली, त्यामुळे आता भारत सरकारची यासंदर्भात काय भूमिका असेल हे महत्त्वाचे ठरेल.
पुलवामामध्ये चाळीस जवानांचा बळी गेल्यावर बालाकोटची धडक कारवाई घडली. तिच्या फलश्रृतीबाबत आणि खुद्द पुलवामा हल्ल्याच्या सत्यतेबाबतच काही राजकीय नेत्यांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या. एनआयएचे आरोपपत्र त्यांची तोंडे बंद करण्यास पुरेसे ठरावे. बालाकोटची कारवाई झाली आणि पाकिस्तानवर अभूतपूर्व जागतिक दबाव आला म्हणून दुसरा मोठा दहशतवादी हल्ला चढवायची या दहशतवाद्यांची हिंमत झाली नाही याकडे एनआयएने अंगुलीनिर्देश केलेला आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान आले, तेव्हा त्यांनी ‘नया पाकिस्तान’ घडविण्याची भाषा करीत भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांची ग्वाही दिली होती. कर्तारपूर कॉरिडॉरला दिलेली गती, अभिनंदन वर्धमानची परत पाठवणी आदींद्वारे पाकिस्तान भारताशी चांगले संबंध राखू पाहात असल्याचा आव इम्रान सरकारने आजवर आणला आहे. मात्र, हे करीत असतानाच दुसरीकडे चीनला जवळ करणेही पाकिस्तानने सुरूच ठेवले आहे. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय दडपणामुळे दहशतवादाविरुद्ध कारवाईचा देखावा जरी केला गेला, तरी आयएसआयच्या भारतविरोधी कारवाया बंद झाल्या आहेत असे दिसत नाही. बालाकोटने दिलेल्या खणखणीत इशार्‍यामुळे आणि खुद्द काश्मीरसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या धडक निर्णयामुळे त्यांची गती मंदावली आहे एवढेच. कुरापत काढली तर सूड उगविण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि अमेरिका या घडीस भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे याचे भान पाकिस्तानला आहे. मात्र, मौलाना मसूद अजहरकडे पुलवामा हल्ल्याचे आरोपपत्र सुस्पष्ट निर्देश करीत असताना इम्रानचा नया पाकिस्तान आता काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे असेल. जैश ए महंमद आणि मसूद अजहरसंदर्भात पाकिस्तान काय भूमिका अवलंबितो त्यावर त्यांच्या नया पाकिस्तानच्या दाव्याची सत्यासत्यता लख्खपणे कळून येईल. भारत सरकारही केवळ न्यायालयीन कामकाजावर भिस्त ठेवून स्वस्थ बसणार की मौलाना मसूद अजहरला ‘घरात घुसून मारण्या’ची प्रतिज्ञा पुरी करणार हेही दिसेलच! एनआयएने केवळ आरोपपत्र दाखल करणे पुरेसे नाही. आपल्या चाळीस जवानांचा निर्घृणपणे बळी घेणार्‍या हैवानांना कायमचा धडा शिकवला गेला पाहिजे. हे बलिदान व्यर्थ जाऊ नये!