दिगंबर कामतांना अंतरीम जामीन

0
82

>> खाण घोटाळा प्रकरण
>> एसआयटीकडून चौकशी

गोव्यातील ३५ हजार कोटी रुपयांच्या खाण घोटाळाप्रकरणी काल उत्तर गोवा सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मडगावचे कॉंग्रेस आमदार दिगंबर कामत यांना एक लाख रुपयांची हमी व चौकशीस सहकार्य करण्याच्या अटीवर अंतरीम जामीन मंजूर केला. चौकशीस सहकार्य करण्याच्या आश्‍वासनानुसार कामत यांना अंतरीम जामीन मंजूर झाला. त्यानंतर ताबडतोब आमदार कामत गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष चौकशी पथकासमोर उपस्थित राहिले.
एसआयटीने काल कामत यांची बराचवेळ जबानी घेतली. वरील घोटाळा प्रकरणी एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी एसआयटीने त्यांना दुसर्‍यांदा समन्स पाठविला होता. अटक होईल या भीतीने कामत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. कामत यांचे वकील पराग राव यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. आपले अशील चौकशीस सर्व प्रकारे सहकार्य करणार असल्याचे सांगून कामत यांना अटक करण्याची गरज नाही, हा मुद्दा न्यायालयाला पटवून दिला. त्यामुळे कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.
यापूर्वी आपण एक लढाई लढलो आता दुसरी लढाई लढत असून आपल्याला न्याय मिळेल, असा विश्‍वास कामत यांनी व्यक्त केला. बेकायदेशीर खाण घोटाळा प्रकरण गेल्या बर्‍याच काळापासून गाजत होते. आता या प्रकरणी सरकारने चौकशी सुरू केली आहे.