दादर ः मध्यमवर्गीयांचे आश्रयस्थान

0
322
  •  शरच्चंद्र देशप्रभू

चाळकरी आता चाळीत फक्त शरीराने राहत असल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरील भाव व देहबोलीतून दिसत आहे. मन अन्य निवास प्राकाराकडे ओढ घेत असल्याचे स्पष्ट जाणवते. तसा हा चाळसंस्कृती ते टोलेजंग टॉवर प्रवास कष्टाचा अन् वेदनादायक. परंतु स्थित्यंतर झाल्यावर चाळसंस्कृतीची नामोनिशाणी राहत नाही.

मागच्या आठवड्यात दादरला तीन-चार दिवस मुक्काम करण्याचा योग आला. गिरगाव व दादर म्हणजे मुंबईतील मध्यमवर्गीयांचे आश्रयस्थान. चाळसंस्कृती इथेच रुजली अन् फोफावली. चाळसंस्कृती ही या भागातील कित्येक पिढ्यांनी जोपासलेली अभिजात संस्कृती. साहित्य विश्‍वात या चाळ संस्कृतीने आपले स्थान अधोरेखितच नव्हे तर अबाधितच राखले आहे, म्हटल्यास वावगे होणार नाही. पु.लं.ची ‘बटाट्याची चाळ’ पासून दमदारपणे चाळसंस्कृतीने आपले पदार्पण साहित्य विश्वात केले. गंगाधर गाडगिळांच्या ‘खुरमुर्‍यांची चाळ’ किंवा श्री.न.पेंडसे यांच्या ‘संभूसाच्या चाळी’ने मराठी साहित्यविश्वाला एक अनोखी मिती लाभली. मध्यमवर्गीयांच्या गुणदोष अन् आंतरिक स्वभाववैशिष्ट्यांचे रेखाटन चाळीसंदर्भात केलेल्या लिखाणात आढळून येते.

जयवंत दळव्यांच्या ‘सभ्य गृहस्थ हो’ यात पण चाळीतील अंतरंग दिसून येते. आकार अन् विकारातून व.पु. काळेंनी पण आपल्या सहज सुलभ शैलीने चाळसंस्कृतीवर एक वेगळाच अलगद प्रकाशझोत टाकलेला आहे. आज चाळसंस्कृती अखेरचा श्वास घेताना दिसत आहे. टोलेजंग टॉवरमुळे चाळसंस्कृती आक्रसत चालल्याचे प्रतीत होत आहे. चाळीत राहणार्‍या माणसांचा आपल्या पूर्वसुरींशी असलेला नाजूक दुवा केव्हाच तुटलेला आहे. चाळकरी आता चाळीत फक्त शरीराने राहत असल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरील भाव व देहबोलीतून दिसत आहे. मन अन्य निवास प्राकाराकडे ओढ घेत असल्याचे स्पष्ट जाणवते. तसा हा चाळसंस्कृती ते टोलेजंग टॉवर प्रवास कष्टाचा अन् वेदनादायक. परंतु स्थित्यंतर झाल्यावर चाळसंस्कृतीची नामोनिशाणी राहत नाही. चाळसंस्कृतीचा अस्त म्हणजे एक बंदिस्त आत्मकेंद्रित समाजजीवनाला आरंभ. चाळीतील रहिवाशांच्या मानसिकतेला फ्लॅटसंस्कृतीत जागा नाही. तरीपण मुंबईतील फ्लॅटसंस्कृतीला चाळसंस्कृतीचा वारसा असल्यामुळे मनाची किंवा वास्तूची कवाडे बंद होण्यास विलंब लागणे साहजिकच आहे. परंतु आज तरी चाळसंस्कृती कालबाह्य झालेली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अन् याची जेवढी लवकर जाणीव होईल तेवढेच रहिवाशांच्या दृष्टीनेपण चांगले. आज खचलेल्या चाळी अन् मनाने खचलेले रहिवासी पाहताना क्लेश होतात.

आज दादरमध्ये जीवनाबद्दलची सकारात्मक वृत्ती निम्न श्रेणीतील समाज बांधवांत प्रकर्षाने दिसून येते. गिर्‍हाइकांच्या गरजेप्रमाणे पोटतिडकीने केलेला धंदा हे दादरकरांचे वैशिष्ट्य. दादरचे फेरीवाले म्हणजे जगातले आठवे आश्चर्य. कितीही चिरडले तरी अहिमहिसारखे पुनश्‍च जीवित होतात. फेरीवाल्यात आलेला आत्मविश्‍वास त्यांच्या सुप्त गुर्मीत दिसून येतो. पर्यायाने मध्यमवर्गीय जो घासाघीस करण्यात अग्रेसर होता, तो आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. नव्या पिढीतील मुलेमुली यांना तर घासाघीस करण्यात रसच राहिला नसल्याचे दिसून येते. कदाचित हा नवीन जीवनशैलीचा परिपाक असेल. आर्थिक समृद्धी अन् वापरा अन् फेका या आपोआप आलेल्या कृतीमुळे तरुणाईचा खरेदी यात्रेतला सहभाग वरवरचाच वाटतो. या व अन्य कारणांमुळे फेरीसंस्कृतीत एक अपरिचित असा बेगुमानपणा दिसून येतो. इन्स्टंट पद्धतीचा शिरकाव इथेपण झाल्याचे जाणवते. पर्यायाने मोठमोठी दुकाने आपला व्यवसाय सूट मिळवण्यासाठी चालवतात की काय अशी शंका वाटते. कारण मालकांचे संवेदनहीन चेहरे अन् कर्मचार्‍यांचे ठोकळेवजा चेहरे अन् सुमार उलाढाल यांची फेरीवाल्यांच्या विजिगीषू वृत्तीशी मेळ कसा साधणार? परंतु थंड पेयांचे स्टॉल्स पाहिले तर फेरीवाल्यांचे कसब अन् वागण्यातली अदब मनाला भावते. विलक्षण तयारीने ते आपल्या मालांचे मार्केटिंग करतात. वर्तमानपत्रात पेयातील प्रदूषणयुक्त पाण्यामुळे झालेल्या विषबाधेबद्दल रकानेच्या रकाने येताना रस्त्यावरील ज्यूस सेंटर आरामात आपल्या सुशिक्षित गिर्‍हाइकांची सरबराई करताना दिसतात. श्रम, जिद्द अन् लवचीक मानसिकता याचा प्रत्यय या थंड पेयाच्या स्टॉलमालकात दिसून येतो.

मुंबईकरांची ही खासियत. इथले गरिबातले गरीब लोकपण ही जीवनाची बाजी लढताना सहसा थकत नाही, हार मानत नाही. आम्ही राहिलेल्या हॉटेल कर्मचार्‍यांचा पगार किमान वेतनाच्या आसपास म्हणजे तेरा ते चौदा हजार महिना. या तुटपुंज्या पगारात ते आपले बजेट कसे बसवतात, हेच कळत नाही. प्रवासखर्च, मुलांची शिक्षणं, लग्नं अन् राहत्या गाळ्यांची दुरुस्ती हे यांना कसे झेपते हेच कळत नाही. शिवाय गावातील थोरामोठ्यांना आर्थिक मदत अन् व्यावहारिक सांगड यामुळेच हे शक्य होते अन्यथा असंभवनीयच!
इथले लोक ना कुणाच्या अध्यात अन् मध्यात. यामुळे प्रशासनावर अंकुश नाही. विस्कळीत अन् गलथान कारभार दिसून येतो. कमालीचा अलिप्तपणा हे मुंबईकरांचे वैशिष्ट्य. परंतु इथे संवेदनशील व्यक्तिमत्त्वे कोलमडून जाणार! संवेदनशील, भावुक न होता समाजसेवा, निदान शेजार्‍यांनाच मदत करणे मुंबईकरांनाच जमते. जीवघेण्या स्पर्धेतसुद्धा मुंबईकर हे करतो. यामुळेच पु.लं.च्या उद्गाराविषयी ‘चाळीतला ओलावा ओसरला, फक्त ओल राहिली’ यावर पण मुंबईकर आपल्या आत्मभानाची समाजमनाशी सांगड घालून जीवनाला एक नवा अर्थ देण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. भौतिक प्रगती साधतानापण भावविवश न होता एका सच्चा कर्मयोग्याप्रमाणे मुंबईकर काम करत राहतो अन् काळाबरोबर शर्यतपण करतो. आर्थिक सुबत्तेमुळे हिशेबी कृती सैल झाल्याचे दिसले तरी व्यावहारिक अधिष्ठानाची पाळेमुळे आणखीनच घट्ट होताना दिसतात. मुंबईतला गरिबातील गरीब माणूस कधी हार मानत नाही. याच्या देहबोलीत एक सुप्त आत्मविश्‍वास जाणवतो, तसेच आत्मिक समाधान. धोपटमार्गी जीवन तर मुंबईत राहिलेच नाही. परंतु निम्न श्रेणीतील माणसे परिघात पिचूनसुद्धा आत्मबलामुळे समाधानी वाटतात. मध्यमवर्गीय हा त्या मानाने जरा जास्त संस्कारसंपन्न वाटला तरी जबाबदार्‍यांमुळे वाकून गेल्याचे प्रतीत होते. गतिमानता हेच मुंबईचे मूळ व्यवस्थेचे अधिष्ठान अन् यामुळेच मुंबई रसरशीत वाटते.

उत्सवप्रेम तर मुंबईकरांच्या रक्तात भिनलेले. सणांचा बाज बदललेला आहे. परंतु वृत्तीत फरक नाही. रामनवमीसारखा उत्सव पण मोठ्या धडाक्याने साजरा होतो. फुटपाथ सुशोभित होतात अन् रोशणाईने उजळतात. वडाळामधील रामनवमीचा रथोत्सव बघण्याचे भाग्य लाभले. उत्सवातपण शिस्त आहे, व्यवस्थेत चोखपणा दिसून येतो. परंतु उत्सवाचा परिणाम आता मनावर रेंगाळत नाही. त्या बाबतीत पूर्वीचा अन् आजचा मुंबईकर यात जमीनआसमानाचा फरक दिसेल.

१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. चैत्यभूमीवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घ्यायला भीड लागली होती. परंतु कुणाची तर गरीब आंबेडकर भक्तांची. क्रिमी लेयरमधील लोक चुकूनही दिसत नाहीत. आता सारेच आपमतलबी. आपल्या कौटुंबिक चौकटीबाहेर डोकावणे उच्चस्तरीय पांढरपेशातील लोक कटाक्षाने टाळतात. मुंबईत वाहतुकीच्या साधनांत फार मोठी क्रांती घडून आलेली आहे. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाचे काम जोरात चालू आहे. बेस्ट बस सेवा, लोकल्सवर अवलंबून राहणारा मुंबईकर मध्यमवर्गीय आता आलिशान गाड्या उडवताना दिसत आहे. पिवळ्या-काळ्या टॅक्सींची जागा मेरू, ओला उबर यांनी घेतली आहे. नवीन पिढी छोटेसे अंतर पार करण्यासाठी टॅक्सीवर अवलंबून राहताना दिसत आहे. बहुतेक युवक-युवती बसचा नाद सोडून नाक्यांवर टॅक्सींना हात करतानाचे दृश्य दिसत आहे. एक वेळ टॅक्सी मध्यमवर्गीयासाठी चैन होती. आता ती गरज बनल्याचे दिसत आहे. खाद्यसंस्कृतीत पण बदल दिसून येत आहेत. उत्तर भारतीय अन् दाक्षिणात्य पदार्थांना जास्त मागणी दिसून येत आहे. ‘दत्तात्रय’ तर केव्हाच बंद झालेय. तांबे उपहार गृह खासे महाराष्ट्रीय पदार्थ पुरवीत आहे. तृप्ती उपाहारगृह सर्व प्रकारचे पदार्थ तयार करून गिर्‍हाइकांना आकर्षित करण्यात सफल झाल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम रेल्वे स्थानकाकडचे मामा काणेचे उपाहारगृह इतिहास जमा झाल्याचे दिसून येते. पणशीकर मिल्क बार टिकून आहे. ‘स्विग्गी’, ‘झोमॅटो’ या एजन्सींनी दादरच्या ग्राहकांत स्थान निर्माण केल्याचे दिसून येते. घरपोच पदार्थ पोचविणार्‍या या सेवा या गिर्‍हाइकांना निवांतपणे पदार्थाचा आस्वाद घरीच घेण्याचा पर्याय देतात.

जागतिकीकरणाच्या रेट्यातसुद्धा दादरकरांनी साहित्यसंस्कृतीला सोडचिठ्ठी न दिल्याचे जाणवते. श्री. दिलीप सावंत म्हणजे सुप्रसिद्ध कवी कै. वसंत सावंत यांचे पुतणे. पेशाने अभियंता. परंतु ताकदीचे कवी. यांच्या ‘मुंबापुरी’ या द्वितीय काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कों.म.सा.प.च्या सौजन्याने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या गावस्कर सभागृहात आयोजित केला होता. बर्‍यापैकी चोखंदळ रसिकांची उपस्थिती होती. श्री. विजय कुवळेकर, झी मराठी न्यूजचे संपादक भेटले. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी भूषवलेल्या माहिती आयुक्त पदाच्या काळातील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न झाला. डॉ. महेश केळुस्कर हे प्रथितयश साहित्यिक भेटले. त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून उलगडलेला कोकणातील निसर्ग अन् माणूस याबद्दल उभ्या उभ्या चर्चा झाली. परंतु कुठेतरी वाटत होते की हे सारे यांत्रिकपणे होत आहे. प्रत्येक जणाचा कार्यक्रम घडाळ्याच्या काट्यावर चालणार. त्यातल्या त्यात कवी अशोक नायगावकरांची हसरी, रांगडी वृत्ती भावली. बीजभाषण करणार्‍या स्वाती राजेचा पण समारंभात पूर्ण सहभाग दिसून आला. बाकी सारे प्रवासी घडीचे!