दाऊद इब्राहिम गँगचा शार्प शूटर ‘ब्लॅक स्कॉर्पियन’ जेरबंद

0
131
अटक केलेल्या शार्प शूटर शाम किशोर गरिकपट्टी समवेत पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप, प्रियांका कश्यप, निरीक्षक सिध्दांत शिरोडकर, विश्वेश कर्पे व राजेशकुमार.

साळगाव येथे गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गुन्हा अन्वेषण पोलिसांनी शनिवारी दुपारी साळगांव येथे एका घरावर छापा मारून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील शार्प शूटर शाम किशोर गरिकपट्टी (५०) याला अटक केली. गेल्या ८ वर्षांपासून तो गोव्यात येत जात असे. त्याने राहण्यासाठी हणजूण येथे भाड्याने खोली घेतली होती. त्याच्याकडून रिव्हॉल्वर आणि बनावट ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. असे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मुंबई बॉंबस्फोट मालिकेसह अन्य कित्येक मोठ्या गुन्ह्यांत त्याचा हात होता असे कश्यप यांनी यावेळी सांगितले.गरिकपट्टी याच्यावर खून, खंडणी, अपहरण याच्यासह कित्येक गुन्हे मुंबई व अन्य ठिकाणच्या पोलिस स्थानकांवर नोंद असून पोलीस त्याच्या शोधात होते. मुंबई पोलिसात त्याच्याविरुध्द १९ गुन्ह्यांची नोंद आहे. ९३ साली नवी दिल्ली पोलिसांनी त्याला ‘टाडा’ खाली अटक केली होती. भाई ठाकूर व सुभाष ठाकूर यांच्या टोळीशीही त्याचा संबंध होता.
बॉंबस्फोट मालिकेतही हात
मुंबई येथे १२ मार्च१९९३ साली जी बॉंबस्फोट मालिका झाली होती त्यातही त्याचा हात होता. दाऊद टोळीतील (डी गँग) एक शार्प शूटर असलेल्या शाम किशोर गरिकपट्टी याचे ‘डी गँग’मध्ये ‘ब्लॅक स्कॉर्पियन’ हे नाव होते.
जे. जे. शूटआऊटमध्येही सहभागी
दाऊद इब्राहिम याचा भाऊ इब्राहिम कासकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जे. जे. इस्पितळात केलेल्या गोळीबारातही गरिकपट्टी हा सहभागी झाला होता. यावेळी अरूण गवळी टोळीतील शैलेश हळदणकर याच्यासह दोन पोलीस शिपायांना जे. जे. इस्पितळात गोळ्या घालून ठार करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गरिकपट्टी याच्यावर ४६५, ४६८, ४७१ व शस्त्रास्त्र कायद्यातील कलम २५ खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला तीन दिवसांचा पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आलेला असून त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे. आपणाबरोबरच उत्तर गोव्याच्या अधीक्षक प्रियांका कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सिध्दांत शिरोडकर, विश्वेश कर्पे, राजेशकुमार कलंगुटे व अन्य ६० पोलीस शिपायांनी या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे कार्तिक कश्यप यांनी यावेळी सांगितले.