>> संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत नरेंद्र मोदी
आज दहशतवादाचे आव्हान कोणा एकाच देशाला नसून जगातील सर्वच देशांना आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीला आव्हान आहे. म्हणूनच मानवतेसाठी संपूर्ण जगाने एकत्र येणे आता अपरिहार्य बनले आहे असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील आपल्या भाषणात केले.
दहशतवादाच्या विरोधात युनोतील सदस्य देशांमध्ये एकमत दिसत नाही याकडे मोदी यांनी लक्ष्य वेधले. संयुक्त राष्ट्रसंघाची निमिर्ती ज्या तत्त्वांवर झाली आहे त्या तत्वांनाच यामुळे ठेच पोचते असे ते म्हणाले.
मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ‘आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. म्हणूनच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे, त्याचवेळी दहशतवादा विरोधाला संताप सुद्धा आहे.’
भारत देश म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची एक प्राचीन महान संस्कृती आहे. या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. जनसहभागातून जनकल्याण हे आमचे मूलतत्त्व आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलणे हा माझ्यासाठी गौरवास्पद क्षण आहे. म्हणूनच आजचा हा क्षण महत्त्वपूर्ण आहे. कारण यावर्षी संपूर्ण जग महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करत आहे. गांधीजींनी दिलेला सत्या आणि अहिंसेचा संदेश आजही जगाला मार्गदर्शक आहे, असे मोदी म्हणाले.
२०२५ पर्यंत भारत
क्षयरोगमुक्त बनविणार
मोदी यांनी यावेळी सांगितले, की यावर्षी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील जनतेने सर्वाधिक मते देऊन मला व माझ्या सरकारला पहिल्यापेक्षा मोठा जनादेश दिला. जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारतात पार पडले. केवळ ५ वर्षांत जनतेला ११ कोटींपेक्षा जास्त स्वच्छतागृहे उपलब्ध करून एका विकसनशील देशाने जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. २०२० पर्यंत गरिबांसाठी आणखी दोन कोटी घरांची व्यवस्था करणार तसेच २०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्यासाठी कार्यरत असल्याचेही मोदी म्हणाले.
भारताने १९९६ साली ‘कॉम्प्रहेन्सिह कन्वेंशन ऑन इंटरनॅशनल टेररीझम (सीसीआयटी) वरील मसुदा दस्तावेज युनो आमसभेत मांडला होता. मात्र तो केवळ ब्ल्यू प्रिंट राहिला. कारण सदस्य राष्ट्रांचे एकमत होऊ शकले नाही. सर्व प्रकारच्या दहशतवादाला गुन्हेगारी ठरविण्याचा सीसीआयटीचा हेतू होता. ज्यामुळे दहशतवाद्यांना व त्यांच्या अर्थ पुरवठादारांना शस्त्रास्त्रे, पैसा व सुरक्षित ठिकाणे मिळणे शक्य झाले नसते असे मोदी म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांसाठी शांती पथकांमध्ये भारताने मोठा त्याग केला आहे. भारतीय शांती पथकांमधील १६० जणांनी प्राणांची आहुती दिली आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
काश्मीरमधील कर्फ्यू भारताने हटवावा ः इम्रान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल संयुक्त राष्ट्र आमसभेतील आपल्या भाषणात काश्मीर प्रश्न उपस्थित केला. काश्मीरमधील अमानवी कर्फ्यू भारताने हटवावा आणि स्थानबद्ध केलेल्या सर्वांना मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या प्रदीर्घ भाषणात इम्रान खान यांनी उभय अण्वस्त्रधारी देश आमने-सामने ठाकल्यास त्याचे परिणाम दोन्ही देशांच्या सीमांपासून बरेच दूरपर्यंत होऊ शकतात असा इशाराही दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याआधी आपल्या भाषणात शांततेचा संदेश दिला होता. मात्र खान यांनी नेमकी उलट युद्धाची भाषा बोलून दाखवली.