कला अकादमीत तात्पुरती दुरुस्ती करून इफ्फीचे चित्रपट दाखवणार

0
142

कला अकादमी मुख्य सभागृहामध्ये तात्पुरती दुरुस्ती करून आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. कला अकादमीच्या इमारतीबाबत ़इफ्फीनंतर निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
कला अकादमीच्या इमारतीच्या सद्यःस्थितीबाबतच्या दोन्ही अहवालांवर सखोल अभ्यास करून इमारतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कला अकादमीचे दोन्ही
अहवाल समान
कला अकादमीच्या इमारतीबाबतीत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाने सल्लागाराकडून तयार करून घेतलेला अहवाल हे दोन्ही अहवाल समान आहेत. येत्या दीड महिन्यात या दोन्ही अहवालांचा सविस्तर अभ्यास करून सर्वांना विश्वासात घेऊन कला अकादमीच्या इमारतीबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
कला अकादमीच्या मुख्य सभागृहाची तात्पुरती दुरुस्ती करून वापर केला जाऊ शकतो. परंतु, खुल्या थिएटरचा वापर शक्य नाही. गेले आठ नऊ महिने खुले थिएटर बंद ठेवण्यात आले आहे. कला अकादमीच्या दुरुस्ती कामावर मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन विचार करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असेही गावडे यांनी सांगितले.
कला अकादमीच्या इमारतीचा आढावा घेणार्‍या दोन्ही अहवालांमध्ये सूचना सारख्याच करण्यात आल्या आहेत.