‘त्या’ जहाजावरील लोक अतिरेकीच

0
100

परिस्थितीजन्य पुराव्यामुळे स्पष्ट : पर्रीकर
गुजरातमधील पोरबंदरनजीकच्या समुद्रात भारतीय तटरक्षक दलाच्या कारवाईमुळे संबंधितांनी स्वतःच उडवून लावलेल्या जहाजावरील लोक हे अतिरेकीच असावेत असे परिस्थितीजन्य पुराव्यांवरून दिसून आले असल्याचे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे केले.
पाकिस्तानी नौदल व लष्करी अधिकार्‍यांच्या संपर्कात त्या जहाजावरील लोक होते असेही पर्रीकर यांनी पत्रकारांना सांगितले. ३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली होती. त्या जहाजावरील लोक तस्कर होते हा दावा त्यांनी फेटाळून लावला. आपल्या या म्हणण्याचे त्यांनी समर्थन करताना सांगितले की, त्या लोकांनी ते जहाज स्वतःहून उडवून लावीत आत्मघाती कृती केली. तस्कर असते तर त्यांना अशा पद्धतीने आत्महत्या करण्याची गरज नव्हती. आपल्याजवळील तस्करीचा माल पाण्यात टाकून त्यांना शरणागती पत्करता आली असती. मात्र तसे नसल्याने व आपल्या दिलेल्या कामासाठी ते वचनबद्ध असल्यानेच त्यांनी आत्मघाती निर्णय घेतला. त्यावरूनच त्यांचे अतिरेक्यांशी संबंध होते हे स्पष्ट असल्याचे पर्रीकर म्हणाले. ‘त्या’ जहाजावरील लोकांचे वर्णन आपण संशयास्पद अतिरेकी किंवा संभाव्य अतिरेकी असे करीत असल्याचे ते म्हणाले. भारतीय तटरक्षक दलाने पाठलाग केल्यानंतर पाक जहाजावरील लोकांनी आत्महत्या केल्याने असा निष्कर्ष निघतो असेही त्यांनी सांगितले. सदर जहाज मच्छीमारी क्षेत्रातही नव्हते किंवा तस्करांचा वावर असलेल्या क्षेत्रातही ते नव्हते. त्यामुळे त्यांना काही तरी वेगळे करायचे होते असा अंदाज निघतो. सोने, अमली पदार्थ व अन्य बंदी घातलेल्या मालाची तस्करी करणारी जहाजे वर्दळीच्या मार्गाचा वापर करतात. कारण त्यांना अन्य जहाजांमागे दडणे त्यामुळे शक्य होते याकडे पर्रीकर यांनी लक्ष वेधले. ‘त्या’ रात्रीच्या घटनेवेळी अन्य बोट आढळून आली होती. त्याविषयी बोलताना ती बोट पाकिस्तानच्या आर्थिक विभागात होती असे पर्रीकर म्हणाले.

‘ते’ जहाज पाकिस्तानचे नव्हे 

पाक सरकारतर्फे खुलासा

गुजरातच्या पोरबंदर किनार्‍यानजीक स्फोटाद्वारे उडवून लावण्यात आलेले जहाज हे पाकिस्तानचे नव्हते असे स्पष्टीकरण पाकिस्तानचे विदेश व्यवहार खात्याचे प्रवक्ते तस्नीम अस्लम यांनी केले आहे.
‘आम्ही आमच्या सर्व यंत्रणांकडून माहिती मिळवली असून संबंधित ठिकाणी पाकिस्तानमधून कोणतेही जहाज रवाना झालेले नव्हते. असे असताना सदर जहाज पाकिस्तानचे असल्याचे म्हणणे हास्यास्पद आहे.’ असे अस्लम म्हणाले.
याबरोबरच अस्लम यांनी असाही आरोप केला की, भारतीय जहाजे मच्छीमारीसाठी सातत्याने पाकिस्तानी सागरी हद्दीत येत असतात. त्यांना ताब्यात घेतले जाते आणि त्याविषयीच्या नोंदी पाहिल्यास त्यांना चांगली वागणूक देण्यात येते असे स्पष्ट होते असे ते म्हणाले.