‘त्या’ चरित्र भूमिका विसरूच शकत नाही ः सोनाली

0
100

नेहमीच वाटतं चांगल्या भूमिका कराव्यात पण ‘बाबा आमटे’ चित्रपटात मंदा आमटेंची भूमिका केली आणि आयुष्यच बदललं. मंदा आमटे व जब्बार पटेलांच्या ‘डॉ. आंबेडकर’ मधील रमा आंबेडकर या दोन चरित्र भूमिका विसरूच शकत नाही. राष्ट्रपती भवनात खुद्द राष्ट्रपती मला तुम्ही रमा आंबेडकर का म्हणून विचारतात, माझी भूमिका लक्षात ठेवतात हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता असे लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी इफ्फीच्या कट्‌ट्यावर प्रकट मुलाखतीत सांगितले.

गुरुवारी सचिन चाटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला व त्या दिलखुलासपणे बोलल्या. कुठलाही चित्रपट, मग तो कुठल्याही भाषेत असो सारख्याच आवडीने करते असे स्पष्ट करून सोनाली म्हणाल्या, मी ऐशी-नव्वद सिनेमे केले परंतु ‘बजेट’मध्ये भेदभाव आढळला नाही. चित्रपट करताना दर्जाशी तडतोज केली जात नाही. फर्ग्युसन महाविद्यालयात पुण्यात शिकत असताना मी सत्यदेव दुबेंकडे मार्गदर्शन घेत होते, चि. त्र्यं. खानोलकरांच्या ‘आपुले मरण’ नाटकात काम केले होते. आणि याचवेळी गिरीश कर्नाड यांनी चित्रपटासाठी ऑडिशन घेतली आणि नंतर त्यांनी काम दिले. नंतर अनेक संधी मिळवून दिल्या. साधेपणा व प्रतिषठा मी एकाचवेळी त्यांच्यात पाहिली. ‘दिल चाहता’ वेळी गोव्यात चित्रिकरण सुरू असतानाचा माझा वाढदिवस मी विसरू शकत नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.

बॉलीवुडमध्ये एकदा शिरल्यानंतर तुमची करिअर मार्गाला लागते असा अनुभव सांगून सोनाली म्हणाल्या, मी जेव्हा चित्रपटात प्रथम ऑडिशनला गेले तेव्हा, ‘तुझा रंग चित्रपटात चालणार कां?’ अशा खोचक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या परंतु या क्षेत्रात जीवनाची सुंदरता महत्त्वाची असते. यावेळी त्यांनी आपला ‘कच्चा लिंबू’ चित्रपट जरुर बघा असा आग्रह केला.

वेगवेगळ्या भूमिका आव्हानात्मक वाटतात ः प्रभावळकर

मीना कर्णिक यांच्याशी कट्‌ट्यावर संवाद साधताना ख्यातनाम अभिनेता दिलीप प्रभावळकर म्हणाले, चौकट राजा मधील अल्पबुद्धीच्या मुलाची भूमिका असो, आबा टिपरेंची भूमिका असो की हसवाफसवी मधील भूमिका असोत, वेगवेगळ्या कारणांसाठी मला वेगवेगळ्या भूमिका आव्हानात्मक वाटतात. चिमणराव, गंगाधर टिपरे या भूमिकांनी मला वेगळी ओळख दिली. भूमिकेची गरज बघून मी रंगभूषा करतो. ‘हसवा फसवी’त एक दुसर्‍याशी संबंध नसलेल्या सहा भूमिका केल्या त्याला एवढा प्रतिसाद मिळाली, की अपेक्षाच नव्हती. त्यात मी गायचो आणि समोर भीमसेनजी, पु. ल. बसलेत असे कळले की अवघडल्यासारखे व्हायचे असे त्यांनी संबंधित प्रश्‍नावर सांगितले. मुन्नाभाई मधील गांधीची भूमिका करताना खूप तयारी करावी लागली.