मोपा विमानतळ जागेतील ३४० संरक्षक खांब मोडले

0
96

मोपा विमानतळातील जागेतील जागा सीमा बंदिस्त करण्यासाठी जीएमआर कंपनीने तारेचे संरक्षण करण्यासाठी ३६६ खांब उभे केले होते त्यापैकी अज्ञातांनी ३४० खांब मोडून टाकले. त्या संदर्भात कंपनीने पेडणे पोलीसांत लेखी तक्रार नोंदवली.
मोपा विमानतळ जमिनीवर खांब मोडून टाकल्याची माहिती पोलिसाना मिळताच पोलीस उपअधीक्षक सेराफिन डायस. पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली .

कंपनीने आपली जागा सुरक्षित करण्यासाठी सीमा भागात तारेचे कुंपण उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट खांब उभारले होते , त्यातील ३४० खांब अज्ञात व्यक्तींनी मोडून टाकल्याची घटना घडली आहे. ३ नोव्हेंबर रोजी सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्या आदेशानुसार वरील जागेतील दोन घरे मोडून टाकली होती. ही घरे मोडताना आम्हाला कोणतीही नोटीस किंवा पूर्व कल्पना दिली नव्हती असा दावा करून आम्हाला उघड्यावर टाकल्याचे सांगून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता कंपनीने संरक्षण करण्यासाठी खांब उभारले होते ते मोडून टाकल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे . एक कोटी चौरस मीटर जागेत विमानतळ उभारण्यासाठी केंद्र सरकार आणि गोवा सरकारने जीएमआर कंपनीला काम दिलेले आहे. मागच्या २२ दिवसापूर्वी कंपनीने धनगर समाजातील १५ युवकांना विमानतळावर नोकरी देणारी हमी पत्रे दिली. शिवाय सुरक्षा रक्षक यांचीही नेमणूक केली. दिवसा विमानतळ पठारावर सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. रात्री सुरक्षा रक्षक किंवा कोणतेही सीसीटीव्ही बसवले नसल्याचा लाभ उठवत खांब मोडून टाकण्याचा प्रकार घडल्याने पोलिसाना आता संशयिताना पकडण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे .

जीएमआर कंपनीचे अधिकारी मिलिंद पैदरकर यांच्याकडे संपर्क साधला असता कंपनीने एकूण ३६६ खांब उभारले होते त्यातील २५ खांब सुरक्षित आहेत. हे खांब स्थानिक नागरिकांनी मोडल्याचा दावा करून जे काही नागरिक सुरुवातीपासून प्रकल्पाला विरोध करतात. याच लोकांचा या खांब मोडण्यामागे हात असल्याचा दावा करून आपण लेखी तक्रारीत संबधित व्यक्तींचा हात असल्याची तक्रार पेडणे पोलीस स्टेशनला दिल्याचे म्हटले आहे.