>> राज्यपालांना मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना बहुमत चाचणीवरून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बेंगळुरूत कैद करून ठेवलेल्या आमच्या आमदारांशिवाय जर बहुमत चाचणी झाली, तर ते घटनाविरोधी ठरेल असे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसच्या १६ आमदारांना ओलीस ठेवले आहे असा थेट आरोपही कमलनाथ यांनी पत्रात केला आहे. राज्यपालांनी या प्रकरणी योग्य निर्णय घ्यावा आणि कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना भोपाळला बोलवावे अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी पत्रकार परिषद घेत कमलनाथ सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित केल्याने राज्यपाल टंडन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर कमलनाथ यांनी पत्र लिहिले आहे.
दरम्यान, भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने अध्यक्षांना नोटीस पाठवून या प्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल.