पर्रीकर आधुनिक गोव्याचे शिल्पकार ः मुख्यमंत्री

0
177

>> मनोहर पर्रीकर यांचा मिरामार येथे पहिला स्मृतिदिन

गोव्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मनोहर पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच त्यांना आधुनिक गोव्याचा शिल्पकार असे म्हटले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. मनोहर पर्रीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त काल मिरामार येथील त्यांच्या स्मृतिस्थळाजवळ त्यांना श्रद्धाजंली वाहताना डॉ. सावंत यांनी वरील उद्गार काढले. पर्रीकर यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्या नेत्याला गोवा मुकला असला तरी त्यांची स्वप्ने पूर्ण करून त्यांच्या संकल्पनेतील गोवा साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले.

पर्रीकर यांनी आपल्या कारकीर्दीत सुरू केलेली कामे २०२२ सालापर्यंत पूर्ण होणार असून पुढील २५ वर्षांचा विचार करून पर्रीकर यांनी या विकासकामांची आखणी केली होती, असे सावंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना सावंत म्हणाले, की पर्रीकर यांनी राज्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या. कचर्‍याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी साळगाव येथे साकारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प हा सर्वोत्तम असा प्रकल्प आहे. हिरवागार व स्वच्छ गोवा हे पर्रीकर यांचे स्वप्न होते. त्यांच्या संकल्पनेतील गोवा साकारताना त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही, असेही सावंत यांनी पुढे सांगितले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री असलेल्या पर्रीकर यांचा पहिला स्मृतिदिन काल सरकारी पातळीवर पाळण्यात आला. यावेळी मंत्री जेनिफर मोन्सेर्रात, दीपक पाऊस्कर, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, आमदार बाबुश मोन्सेर्रात, विजय सरदेसाई, पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग, वित्तसचिव दौलत हवालदार, पणजीचे महापौर उदय मडकईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस दामू नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पर्रीकर यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
मिरामार येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजप मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमालाही हजेरी लावून तेथे पर्रीकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी हजर होते.

गोवा फॉरवर्डची श्रद्धांजली
पर्रीकर यांनी सदैव विकासाचा ध्यास घेतला. गोवा व गोंयकारपण याबाबत त्यांनी कधी तडजोड केली नाही असे पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहताना गोवा फॉरवर्डने म्हटले.