तो आणि ती

0
13
  • सुरेखा सुरेश गावस-देसाई

खरेतर वसंत बापट सरांचे व्यक्तिमत्त्व असे होते की त्यांचा कधी ना कोणाला धाक वाटला, ना कधी भीती वाटली. उलट आदर, आपलेपणाच जास्त वाटायचा. आणि याच कारणामुळे असेल, एकाने विचारण्याचे धाडस केलेच, “सर, तुमची कविता तुम्ही कधी शिकवणार आहात? सॉरी सर, चुकूनमाकून नेमके त्याच दिवशी गैरहजर राहाणे होऊ नये म्हणून विचारतो सर!”

कुठूनतरी गाण्याचे बोल ऐकू येत होते. अरे… हे गाणे! इथे कुठून…? ही तर आमच्या सरांची कविता! पुढील खिडकीतून धो-धो पावसात घसाघसा वाहणारा तर कधी खळाळणारा आणि आता मात्र कोरडाठाक पडलेला ओहोळ दिसत होता. मागच्या आणि उजव्या बाजूला कुंपणाबाहेर मोठी घरे! पण त्यातील कोणालाही मराठीतील ओ की ठो समजत नाही. राहता राहिला पुढचा रस्ता. मी लगबगीने स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत डोकावले. 25-30 पावलांवर मुख्य फाटक. फाटकाबाहेर रस्त्यावर एक पांढरी ट्रॅव्हलर उभी होती. आवाज तेथूनच येत असावा. तोच बस हलली, पुढे गेली आणि मी पार मागे… मागे. सुमारे 50-52 वर्षे मागे. 1965/66 साल असावे. आमचे रामनारायण रुईया कॉलेज! जलद (फास्ट) लोकलला बायकांच्या डब्यात खूप मुली भेटायच्या. आमचा रुईयाचा गट मोठा. आमच्या गप्पा- सर, मॅडम, त्यांचे शिकवणे याभोवतीच फिरायच्या. कधी त्यांच्या नकला. म्हणता म्हणता माटुंगा स्टेशन यायचे.

आम्हाला मराठी (गद्य) शिकवायला विदुषी डॉ. सरोजिनी वैद्य (कवी शंकर वैद्यांच्या पत्नी), पद्यासाठी कवी वसंत बापट, तर इंग्रजी गद्यासाठी सदानंद रेगे होते. अशा नामवंतांचे अध्यापन आम्हाला लाभले. त्यामुळे इतर कॉलेजच्या मुलींना जेवढी असूया वाटायची तेवढीच मची मान अभिमानाने अधिकच उंचावायची- ताठ व्हायची.

वसंत बापट म्हणजे उंच, गोरेपान, मिस्कील खट्याळ डोळे असे देखणे व्यक्तिमत्त्व असलेले कवी, ही आमची त्यावेळची त्यांची मनात वसलेली- ठसलेली प्रतिमा! त्यांची तासिका म्हणजे आमच्यासाठी एकेक पर्वणीच. नेहमीच त्यांचा वर्ग खचाखच भरलेला.
आणि कॉलेजच्या सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात शोध लागला- सरांची एक कविता आपल्या पाठ्यपुस्तकात- अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहे. पद्य विभागात शेवटून दुसरी वा तिसरी कविता- ‘अजून त्या झुडपांच्या मागे’
आपले सर आपलीच कविता आपल्याला कशाप्रकारे शिकवतील बरे? तीही भावनाप्रधान- हळुवार- प्रणयरम्य- प्रेमकविता! उत्कंठा ताणली जात होती. आम्ही मुले नुकतीच अकरावी पास होऊन आलेली. 17-18 वयोगटातील. त्यावेळी आम्हाला सगळेच खरेखुरे वाटायचे. कवितेतील ‘मी’ (वा तो) म्हणजे नायक- नायक म्हणजे प्रियकर- म्हणजेच कवी. आणि कवी म्हणजे कविता लिहिणारा- म्हणजेच बापट सर! असेच आम्ही समजत होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच त्यांची प्रेमकविता! पण आम्हीच ‘रोमँटिक’ मूडमध्ये.

त्यांची शुद्ध-स्वच्छ, प्रभावी, ओघवती भाषा! कवितेचे रसग्रहण चालायचे. ते करताना त्यांची रसवंती पाझरायची आणि आम्ही तृषार्थ चातक! त्यांचे अध्यापन- कवितेचे रसग्रहण म्हणजे मोत्याची माळ! माळेतील प्रत्येक मोती झेलावा- रसातील प्रत्येक थेंब प्राशन करावा! शब्द अन्‌‍ शब्द, वाक्य अन्‌‍ वाक्य लिहून घेता आले पाहिजे असे वाटायचे. पण वाणी आणि लेखणी (बोलणे आणि लिहिणे) यात कितीतरी अंतर! केवळ अशक्य! टिपणेही काढायची, त्याचबरोबर अध्यापनातील रसग्रहणाचा पुरेपूर आस्वाद घेऊन आनंदही लुटायचा- असे वाटे.
पण मग ठरविले, सर जेव्हा स्वतःची- त्यांची कविता शिकवतील तेव्हा श्रोता आणि प्रेक्षक ही भूमिका स्वीकारायची. कान व डोळे उघडे. कदाचित सगळे एकवटल्यामुळे एकतानता येईल. एकाग्रतेमुळे सरांचे भावप्रकटन मनावर बिंबले- बिंबवले जाईल. खऱ्या अर्थाने कविता आत्मसात करता येईल. त्या आनंदात मनसोक्त डुंबता येईल. सरांची कविता येईपर्यंत सर्वांचीच अर्धीअधिक पाठ झाली होती- पारायणे केल्यासारखी!
खरेतर सरांचे व्यक्तिमत्त्व असे होते की त्यांचा कधी ना कोणाला धाक वाटला, ना कधी त्यांची भीती वाटली. उलट आदर, आपलेपणाच जास्त वाटायचा. आणि याच कारणामुळे असेल, एकाने विचारण्याचे धाडस केलेच, “सर, तुमची कविता तुम्ही कधी शिकवणार आहात? सॉरी सर, चुकूनमाकून नेमके त्याच दिवशी गैरहजर राहाणे होऊ नये म्हणून विचारतो सर!”
“मी सांगणारच होतो तुम्हाला. बरे झाले तुम्हीच विचारले. मी रेगे सरांशी बोललो आहे. आणि त्यांनी मान्यही केले आहे. माझी कविता रेगे सर तुम्हाला शिकवतील.”
या अनपेक्षित धक्क्याने आमचा भ्रमनिरास झाला. सगळ्यांनी एकसाथ हल्लागुल्ला केला. कडाडून विरोध केला. कधी नव्हे ते मुलींनीही बाके बडवून निषेध नोंदविला. सरांनी हातानीच सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला.
“माझी कविता मीच शिकविली तर तो एकप्रकारे माझ्या कवितेवर केलेला अन्याय नाही का होणार? तुम्हाला नाही का तसे वाटत? बघूया तरी त्रयस्थाच्या भूमिकेतून माझी कविता कशी वाटते ती! मी असेनच मागे बसलेला.”
पण शेवटी आमची जोरदार मागणी व प्रेमळ हट्ट यापुढे आम्ही सरांना माघार घ्यायला भाग पाडलं.
तो दिवस उजाडला. सर वर्गात आले. सगळे चिडीचिप्प! सगळ्यांनीच आपले ‘खुसूखुसू’ हसणे पुरेपूर हसून घेतले होतेच. सर अगदी रंगून शिकवीत होते आणि आम्ही दंग होऊन रंगून गेलो होतो.

लजवंती होणारी शेवंती, थरथरणारा दवबिंदू, झुरणारा चंपक, गुंगीमधला मोगरा, गीतामधले गरळ, बरळणारा वारा… एकही शब्द इकडचा तिकडे होऊन चालणार नाही. सगळे अगदी जेथे असावे तेथे. चपखल बसणारी अचूक पण आशयघन शब्दरचना! आलंकारिक असूनही बोजड न वाटणारी भाषा! कळीसारखी उमलत-फुलत जाणारी कविता! सहजस्फूर्त रंगवलेले प्रेमकाव्य! कविता जसजशी वाचत जावी तसतशी मनःचक्षूसमोर चित्ररूपाने चित्ररूपाने चित्रित होते- चितारली जाते.
तो आणि ती- निसर्गाच्या कुशीत रमली आहेत की आपल्या नशेत त्यांनी नैसर्गिक भवताल आपल्या भोवती वेढून-ओढून घेतला आहे?
बेल- घंटा झाली. सर गेले आणि आम्ही तेथेच!
चार कडव्यांच्या या कवितेत ‘अजून’ शब्द दोनदा येतो. त्यावेळी तो शब्द वेगळा वाटला नव्हता, पण आज तो नव्याने उमगला. आज ती संपूर्ण कविता नव्याने कळल्यासारखी वाटते.
प्रेमभंग वा आणखी कोणत्या कारणामुळे दोन दुरावलेले ‘प्रेमी’ एकमेकांना भेटू शकत नाहीत. पण विरहामुळे व्याकूळ झालेला ‘तो’ वेळीअवेळी संकेतस्थळी जातो. कधीतरी ती येईल, आपली भेट होईल असे त्याला वाटते. ‘माझी आशा तरळत आहे’ उणीव आहे ती ‘तिची.’ त्यामुळे सगळे तसेच असूनही सगळेच वेगळे वाटते.

कालांतराने त्यांची बहुरंगी- बहुढंगी- विविधांगी प्रतिभा समोर येत गेली. ऐंशी वर्षांच्या हयातीत सरांची कोणती भूमिका वठवायची राहून गेली? खोडकर पण बुद्धिमान विद्यार्थी, कवी, साहसी कार्यकर्ता, स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रसेवादलाच्या कलापथकातील कलाकार, कादंबरीकार, नाटककार, सूत्रधार, सूत्रसंचालक, संघटक, नट, गीतकार, संगीतकार, शाहीर, निर्भीड पत्रकार, निवेदक, गायक, लेखक, दिग्दर्शक, संयोजक, वक्ता, अध्यापक, प्राध्यापक, संपादक (साधना), समीक्षक, निबंधकार, टीकाकार, साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष… पण ठसठशीत व ठळक ‘मोहर’ उमटली ती त्यांच्या ‘कवी’ या त्यांच्या नावावर- विशेषणावर.
शाळेत शिकलेली पहिली कविता आपल्याला पाठ आहे-
देवा तुझे किती, सुंदर आकाश।
सुंदर प्रकाश, सूर्य देतो॥
तशीच कॉलेजमध्ये असताना शिकलेली- पाठ केलेली शेवटची कविता अजूनही आठवते-
अजून त्या झुडपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते।
अजून अपुल्या आठवणींनी
शेवंती लाजवंती होते॥1॥
तसे पहाया तुला मला ग
अजून दंवबिंदु धरथरतो।
अर्ध्यामुर्ध्या कानकुजास्तव
अजून ताठर चंपक झुरतो॥2॥
कॉलेजच्या स्नेहसंमेलनात त्यांची ‘मुख्य’ भूमिका. विशेषतः फिशपाँड (शेला-पागोटे वा शालजोडी) या कार्यक्रमात खुसखुशीत विनोद करून कोणाला कोपरखळ्या मारत तर कधी खमंग फोडणी देऊन टीकाटिप्पणी करत, त्याला तोड नाही.
शिवाय काव्यवाचनाच्या त्रिकुटात त्यांचा समावेश आहे. विं. दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या बरोबरीने मराठी कविता वाचनाचा पायंडा घातला. सगळ्याच कविता गेय नसतात. काहींना चालीही लावता येत नाहीत. उपरोक्त तिघांनी आपापल्या कविता वाचून दाखवल्या. त्या काव्यवाचनाने लोकांवर गारुड केले आणि आमच्या सरांमुळे काव्यवाचनाचा मनमुराद आनंद लुटता आला. ‘महाराष्ट्र-दर्शन’ही- कार्यक्रम- घडले त्यांच्यामुळेच.
आज हे आठवले- ते त्यांच्या कवितेच्या दोन ओळी कानावर पडल्यामुळे… अजून त्या झुडपामागे…