तोंडीलावणी

0
169
  • अंजली आमोणकर

परिस्थितीचं, आजारपणाचं ओझं ओढता ओढता आपण अगदी थकून जातो. आयुष्य अगदी कंटाळवाणं, अळणी होऊन जातं. अन् मग जरी कितीही नावं ठेवली तरी ‘गप्पांचं’ तोंडीलावणं जगण्यातला आळस, आलेली मरगळ, कंटाळा, निरुत्साह सर्वकाही पळवून लावतं…

झणझणीत-मसालेदार जेवणाने रसना कशी तृप्त होऊन जाते नाही? या मुख्य जेवणाबरोबर स्वादिष्ट अशी तोंडीलावणी असतील तर काय? दुधात साखर! दिवसभर जिभेची चव जात नाही. रोजच जेव्हा तेच तेच व सपक-अळणी वाटायला लागते, तेव्हा रसना कधीतरी चटक-मटक शोधते. लोणची, चटण्या, ठेचे, कोशिंबिरी, वडे-सांडगे, खरडे, सांडगी मिरच्या, कुरड्या, पापड्या, खार वड्या… काय काय अन् किती किती… वयाप्रमाणे या तोंडीलावण्यांची रूपं व चवी बदलतात. गॅसवर हिरवी लवंगी मिरची भाजून, तिच्या पोटात मीठ-लिंबू घालून, कच्चीच कचाकचा चावून खाण्याचं वय ओसरलं की फक्त मिरचीच्या शेंड्याचा बाऽऽरीक तुकडा पुरतो. पण तृप्ततेचा ढेकर द्यायला हे सगळं हवंच.
तसंच आपल्या आयुष्याचंही झालंय. रोजचं कामाचं, नोकरीचं, जबाबदार्‍यांचं, कर्तव्याचं, परिस्थितीचं, आजारपणाचं ओझं ओढता ओढता आपण थकून जातो. आयुष्य अगदी कंटाळवाणं, अळणी होऊन जातं, अन् मग जरी कितीही नावं ठेवली तरी ‘गप्पांचं’ तोंडीलावणं जगण्यातला आळस, आलेली मरगळ, कंटाळा, निरुत्साह सर्वकाही पळवून लावतं. परत तरतरीतपणा, उत्साह आणतं.

वयाप्रमाणेच या तोंडीलावण्याचेही विषय बदलून ‘अय्या-इश्श’ सुरू झालं, ‘साल्या’, ‘अबे’ सुरू झालं की वय बदलतंय हे ओळखायचं. तिरप्या नजरेनं, शिट्‌ट्या घालत, गालात हसत शेरेबाजी सुरू झाली की वय बदललंय हे ओळखायचं. कारण नसताना स्वतःतच रममाण होत हसत राहिला की वय बदललंय हे कळतं. ‘जगाची पर्वा’ नसल्यापासून ते सर्व जगाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, हे वागणं दिसलं की वयबदल समजायचा. वयाची ही अवस्था खूप लवचीक असते. वयाच्या तिशीपासून ते साठी-सत्तरीपर्यंत हे वय लांबतं, अन् त्याबरोबरच गप्पाष्टकांच्या तोंडीलावण्याचे विषयही. त्या गप्पांच्या विषयांवरून ग्रुपमधल्या सदस्यांचे वय सांगता येते. कारण म्हणतात ना, त्या-त्या वयात ते-ते याचं अगदी तंतोतंत प्रत्यंतर येतं. या वेगवेगळ्या समस्यांवरच्या गप्पा म्हणजे त्या-त्या वयाचं चविष्ट असं तोंडीलावणं ठरतं. वेळप्रसंगी ते ‘टॉनिक’ची भूमिकाही निभावतं!
काय काय नसतं या तोंडीलावण्यात? जगाच्या उठाठेवी, तक्रारी, कुरकुर, मोठेपणाचा बडेजाव व सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुगल्या. अगदी बायका-पुरुष कोणीही यातून सुटले नाहीत. चुगल्या व लावालाव्या करण्यात बायकांचा हात कोणी धरू शकत नाही असा एक जगद्विख्यात समज आहे. पण तो फोल आहे. पुरुषांनाही या लावालाव्या इतक्या प्रिय असतात, तेही आवडीने ‘चुगलबंदी’ करतात हे सिद्ध झाले आहे.

शिक्षण, नोकरी, नोकरीतील त्रास, बॉस, ट्रॅफिक, ट्रॅव्हलिंग, परीक्षा, इंटरव्ह्यू अशी तोंडीलावणी असतील तर वय पंचविशीतले आहे हे कळते. लग्न, मैत्री, ब्रेकअप, लफडी, प्रकरणं, कांदेपोहे समारंभ, बाळंतपण, डोहाळेजेवण, बारसे, बर्थ-डे, खडूस सासरवाले असे विषय असतील तर वय तीसच्या आतबाहेर असते. सासू व नवर्‍याच्या कागाळ्या, कामवाली, मुलांचे त्रास, सीसीएल रजा, मुलांचे हट्ट, आजारपणं, अभ्यास, पाळणाघरं, सणवार, ऍडमिशन्स, दहावी-बारावीच्या परीक्षा, खेळ पर्व असं सर्व बायकांच्या तोंडी, तर सासरच्यांच्या/बायकोच्या कागाळ्या, बॉस व ऑफिसातील सहकार्‍यांबद्दल तक्रारी-चुगल्या आलं की ओळखायचं, मंडळी चाळिशीला जवळ करायला लागलीय. चाळिशी पार करतानाच मुलांच्या करियरच्या गप्पा, वृद्ध सासरच्यांची आजारपणं, क्वचित सहचार्याचं एखादं जीवघेणं दुखणं, अपघात, आताच्या पिढीची काळजी, मुलांची करियरं, नोकर्‍या, लग्नकार्य, सूनजावई, रिटायरमेंट, व्हीआरएसची तोंडीलावणी साठी जवळ आल्याचे सांगते. अन् ‘आताच्या वेळी… आमच्या वेळी’चे तोंडीलावणे सुरू झाले की ओळखायचे, ‘विठ्ठल विठ्ठल’ करत राहायचे दिवस आलेत.
आयुष्यभर ज्या गोष्टीकडे बघण्याचीसुद्धा फुरसत मिळत नाही, त्या ‘जगाची चिंता’- या गोष्टीकडे आता मनसोक्त लक्ष दिलं जातं. मग काय चटकदार तोंडीलावण्यांची रेलचेलच उडते. आपल्या मताने काहीही फरक न पडणार्‍या विषयांवर तावातावाने बोलणी सुरू होते. त्यात मोदींच्या नवनवीन योजनांपासून ते ‘मी टू’पर्यंत सर्वकाही असते. या दशेत आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. खरंतर सार्वत्रिक समान कहाण्या असतात. घरोघरी तीच बोंब असते. याचवेळी ‘उपदेश’ या तोंडी लावण्याचीही तोंडओळख होते. इतरेजन बिचारे कधी तुमच्या वयाचा मान म्हणून, तर कधी नात्याचा मान म्हणून कसंबसं ऐकून घेतात. मग शेवटचं तोंडीलावणं पानात येतं- ‘आता आमचं काय उरलं आहे… नवीन पिढीला तुमचं ऐकायला वेळ नसतो, तुम्हाला नवीन पिढीचं काही मनास येत नसतं.’ मग पचनशक्ती गेलेली असते. जेवण मूठभर होतं. डाएटच्या नावाखाली तोंडीलावणी गायब होतात. सुरू होतात लाफ्टर क्लब. खोटं खोटं हसायला शिकवणारं. आता पदरात घ्यायचं फक्त जॅम, मुरांबे, खिरी, पक्वान्नं. आपलं व इतरांचं जीवन व जगणं मधुर करून टाकणारी तोंडीलावणी… गोड भाषेची व गोड वागण्याची.