तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो

0
271
  • मीना समुद्र

स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आयुष्यभर झटणार्‍या आणि त्यांना ज्ञानामृताची महती पटवून देणार्‍या या कर्मयोगिणीचे तेज प्रत्येक लेकीबाळीने, प्रत्येक स्त्रीने अंतरीच्या गाभार्‍यात जतन करावे आणि नित्यस्मरणाने त्या प्रकाशात उजळून निघावे.

१० मार्च उलटून गेला. सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करणारा हा दिवस. त्यांच्या जीवनकार्याचा पट उलगडणारे एकपात्री प्रयोग, त्यांच्या जीवनावरचा चित्रपट, त्यांच्या आयुष्यातले घटना-प्रसंग सांगणारे अनेक कार्यक्रम या दिवशी सादर झाले आणि होताहेत.

पुराणकाळात आपल्या संयमाने, निर्धाराने, पतिपरायणतेने आणि बुद्धिचातुर्याने प्रत्यक्ष यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणणार्‍या सावित्रीची कथा आपण ऐकलेली असते; पण १९ व्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी त्याच निर्धाराने, संयमाने पतीच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे पुढे जाणारी सावित्री आपण अनुभवलेली असते. पुराणकालीन प्रातःस्मरणीय अशा पंचकन्यांसवे जिची गणना व्हावी आणि जिचे प्रेरणादायी कर्तृत्व सतत स्मरावे अशी ही ज्ञानज्योती. कधी स्वयंतेजाने तळपणारी सूर्यज्योती, तर कधी शांत स्निग्ध तेजाने तेवणारी चंद्रज्योती. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आयुष्यभर झटणार्‍या आणि त्यांना ज्ञानामृताची महती पटवून देणार्‍या या कर्मयोगिणीचे तेज प्रत्येक लेकीबाळीने, प्रत्येक स्त्रीने अंतरीच्या गाभार्‍यात जतन करावे आणि नित्यस्मरणाने त्या प्रकाशात उजळून निघावे.

विख्यात समाजसुधारक, क्रांतिवीर, महान द्रष्टे अशा एका युगपुरुषाची- म. ज्योतिबा फुले यांची- ही अर्धांगिनी- एक युगस्त्री! केवळ युगपुरुषाची पत्नी म्हणून नव्हे तर त्या महात्म्याच्या जीवनतत्त्वांशी संपूर्णपणे एकरूप झालेली त्यांची खरीखुरी सहधर्मचारिणी, सहकारिणी आणि सहयोगिनी. अशी दिव्य स्त्री युगायुगांतून एखादीच जन्मते आणि जीवनभरच्या आपल्या अथक, देदीप्यमान कार्याने सारे जग उजळून टाकते. ज्योतिबांची ज्योत बनून ज्योतीने ज्योत उजळीत पाजळीत तिने आपले आणि इतरांचेही जीवन उजळले. ज्ञानाचा आणि आत्मतेजाचा प्रकाश आजच्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनावर पडला आहे. त्यांनी लावलेल्या स्त्री-शिक्षणाच्या ज्योतीमुळे स्त्रिया आज आकाशात उंच भरार्‍या मारत आहेत आणि जीवनाच्या हरएक क्षेत्रात नवनवी क्षितिजे पादाक्रांत करत पुढे पुढेच जात आहेत. अखिल विश्‍वात भारतीय स्त्रियांची मान उंचावणार्‍या आणि बीजरूपाने लावलेल्या फुलबागेचे संगोपन, संवर्धन करून, त्यांच्या जीवनाचे नंदनवन करून त्यांनी आपले ‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ हे नाव सार्थ केले आहे.
१००-१५० वर्षांपूर्वी समाजातल्या अशिक्षित, उपेक्षित, पीडित, गरीब, दीनवाण्या अवस्थेतल्या स्त्रीला त्यांनी शिक्षणाद्वारे आत्मविश्‍वास मिळवून दिला. तिच्या अंगी असणार्‍या आगळ्या शक्तीची, सामर्थ्याची, सत्त्वाची आणि स्वत्वाची जाणीव तिला करून दिली. आपल्यासारखीच डोईवर पदर, कपाळभर कुंकवाची चिरी, गळ्यात मंगळसूत्र, हातभर कांकणं घालणार्‍या साध्यासुध्या गावरान वेशभूषेत असणार्‍या या गोर्‍यापान रंगाच्या स्त्रीच्या डोळ्यातल्या तेजाने त्यांना आकृष्ट केले. ही साधीसुधी स्त्री त्यांची पहिली शिक्षिका झाली. मुख्याध्यापिका झाली. विचारवंत तर ती होतीच, पण तिने अडाणी स्त्रियांत ज्ञानाची ओढ निर्माण केली. ज्ञान, विद्या, बुद्धी नसलेल्या; आचारविचार, त्याग-सेवा-दया-माया-माणुसकी नसलेल्या बेजबाबदार आयतोबाला माणूस म्हणावे का? असा प्रश्‍न त्यांना पडतो.
अशा शब्दात त्यांनी त्याची महती स्वतःच्या कवितेतून गायिली. शिक्षण आणि सामाजिक दर्जा यापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांसाठी- ब्रिटिश काळात स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करून- १८४८ मध्ये पुण्यासारख्या सनातन शहरात पहिली शाळा काढली (बुधवार पेठ, तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात). तिथे शिकवण्यासाठी जात असताना उच्चवर्णियांनी त्यांच्यावर चिखलफेक केली. ‘मला निंदिती, शेणधोंडेही मारिती’ असे त्यांच्या स्थितीचे वर्णन त्यांनी स्वतः केले आहे. जातिभेद, उच्चवर्णियांचे वर्चस्व, अंधश्रद्धा, थोतांडे, कर्मकांडे आणि एकूणच समाजात पुरुषप्रधानता असलेल्या काळात स्त्रीलाच नव्हे तर अखिल मानवजातीला स्वतःच्या हक्काची जाणीव आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा या पतिपत्नीने दिली. स्त्रीला समाजात समान दर्जा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रसंगी कपडे, वह्या-पुस्तके, खाऊ, खेळ आणि विद्यावेतन पुरवून शाळेसाठी तन-मन-धन वेचले. विधवाविवाह, बालहत्या प्रतिबंधक गृह, पाळणाघर असे आधाराश्रम काढले. समाजाने त्यांना वाळीत टाकले; घर सोडून जावे लागले; आप्तेष्ट, नातेवाईक यांनी बहिष्कार टाकला, पण या प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धैर्य या पतिपत्नीने दाखविले. ज्योतिबांची मते न पटणार्‍या लोकांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्नही केला. आपले जीवनसर्वस्व असणार्‍या ज्योतिबांवर अशी परिस्थिती ओढवली तेव्हा सावित्रीबाईंचे स्त्री-मन किती व्याकूळ झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. तरीही निर्धाराने त्या चालत राहिल्या. विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेऊन त्याला ‘यशवंत’ डॉक्टर बनवले. पतीच्या कार्यावर श्रद्धा, विश्‍वास आणि निष्ठा ठेवून सावित्रीबाईंनी दीनदलितांच्या उद्धाराचे आणि स्त्रीशिक्षणाचे, समाजसेवेचे कार्य चालूच ठेवले. पतीनिधनानंतर त्यांच्यावर अग्निसंस्कारही त्यांनीच केले. दुष्काळ, प्लेग यांच्या तडाख्यात सापडलेल्यांची सेवाशुश्रूषा करताकरताच १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

३ जानेवारी १८३१ ला जन्मलेल्या आणि ८ व्या वर्षी ज्योतिबांची धर्मपत्नी म्हणून फुल्यांच्या घरात आलेल्या सावित्रीने आजीवन पत्नीधर्म, समाजसेवा, स्त्री-शिक्षण, अस्पृश्योद्धाराची कामे केली. अशा कर्तृत्ववान स्त्रीचे स्मरण स्फुरणदायी असते. त्यामुळे ते सदासर्वकाळ व्हायला हवे आणि तसे ते होतेही. ८ मार्चच्या महिलादिनाच्या आसपासचे ८-१५ दिवस असेच उत्साहाचे, चैतन्याने भरलेले असतात आणि स्त्रीसामर्थ्याचा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव होतो. त्या प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक भाषणात, संवादात सावित्रीबाईंचे स्मरण होतेच होते. कारण शिक्षण हा श्‍वासोच्छ्‌वास झालेल्या या काळात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे शिक्षणानेच शिकविले आहे. तमाच्या तळाशी दिवे लावणार्‍या या हातांचे स्मरण आपण जरूर ठेवूया. ‘वाचे उच्चारी तैसी क्रिया करी तीच नरनारी पूजनीय’ असे त्यांनीच ‘सुबोध-रत्नाकर’मध्ये लिहून ठेवले आहे. सावित्रीबाई आपल्यासाठी अशा पूजनीय आहेतच, पण स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायकही आहेत. त्यांच्या संवेदनांशी एकरूप होऊन लिहिल्यासारखी एका कवयित्रीची ही कविता खूप भावली-
बये सावित्री,
कशी सोसली असशील, काळजाला भिडणारी कळ,
शुभ्रवस्त्रांकितांनी अंगावर चिखलशेण फेकताना?
तू नाही झालीस सैरभैर, नाही झालीस पाठमोरी
ताठ मानेने झेललेस मर्दानी वार होऊन भन्नाट स्वार
प्रकाशाच्या पाठीवर, खुले केलेस आम्हासाठी नव्या जगाचे द्वार
आजही इथेतिथे नवी शस्त्रे, नवे पवित्रे घेत जखमी करू पाहणारे असे लोक भेटतात तेव्हा अधूनमधून सावित्रीची आठवण येते आणि दुखरं मन खुलं करायला आता तुझे स्मरण तेवढेच उरलेले आहे असे कवयित्री सांगते.
सखी, तुझा वसा धरित्रीचा, तुझं फूल ज्योतीचं
तेजस्विनी तुझ्या काळजात जखमांचे दिवे झाले
अशी ही तेजस्विनी सावित्री, ज्ञानज्योती सावित्री निर्धाराने बाळकडू पाजवून मरणशय्येवरून उठवून जगायला सांगते. अंधार्‍या क्षणी दिवा लावायला आणि वाटा शोधायला लावते. निर्भय बनायला सांगते.
विद्येच्या सहाय्याने स्त्रीच्या मनात ज्ञानपिपासा जागली की त्या प्रकाशात तिच्या जीवनाला सर्वप्रकारचा अंधार- नैराश्य, भीती, परावलंबन, अबलता- दूर होऊन तिचे जीवन ज्योतिर्मय बनेल, आनंदी, शांतिमय बनेल हे सांगणार्‍या सावित्रीचे स्मरण म्हणूनच सतत व्हायला हवे.