काल बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुये येथील इस्पितळासाठी परिचारिका व एमटीएससह विविध 96 पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. त्याशिवाय तुये इस्पितळासाठी कंत्राटी पद्धतीवर सल्लागारांचीही नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा लोकसेवा आयोगाद्वारे कायमस्वरुपी पदे भरण्यात येत नाहीत तोपर्यंत गोमेकॉ व आरोग्य खात्यातही कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येणार आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तुये येथील इस्पितळ अपूर्ण सोयींसह घाईगडबडीत सुरू करू नये, अशी मागणी तुये येथील ग्रामस्थांनी केली होती, या पार्श्वभूमीवर तुये इस्पितळाचे उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्र विभाग, शस्रक्रिया विभाग व नेत्ररोग विभागात कंत्राटी पद्धतीवर 15 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रोस्टर पद्धतीवर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती, जमाती व ओबीसीसाठीचे जागे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तिस्क – फोंडा येथे वैद्यकीय प्रकल्पासाठी कला आणि संस्कृती खात्याची जमीन आरोग्य खात्याकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.