गोवा- बेळगाव महामार्गावरील रामनगरनजीक असणाऱ्या अस्तुली येथे गोव्यातून हुबळीच्या दिशेने येणारी इनोव्हा कार (केए 25 एनबी 6888) आणि हुबळी येथून गोव्याच्या दिशेने जाणारी रेनॉल्ट क्विड कार (जीए 04 ई 8055) यांची एकमेकांना समोरासमोर धडक बसली. या अपघातात क्विड कारमधील चालकाच्या शेजारी बसलेल्या रुद्रया शिवनावर (77) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या रेणुका हिरेमठ (60) यांचाही रामनगर येथील इस्पितळात आणल्यानंतर मृत्यू झाला. कारचालक शिवराज शिवनावर (28) तसेच बसवा शिवनावर (70) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम रामनगर सरकारी इस्पितळात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले. अपघातातील सर्व राहणार मूळ लक्ष्मेश्वर हुबळी व सध्या राहणार फोंडा गोवा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिल्ली आहे. इनोव्हा कारमधील हुबळी येथील प्रवासी गोवा येथे तीन दिवसांचा प्रवास करून पुन्हा हुबळीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. रामनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नायक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रथम घटनास्थळी जाऊन रेनॉल्ट क्विडमध्ये अडकून पडलेल्या जखमींना बाहेर काढून इस्पितळात दाखल केले.