Home Featured पणजीत उद्यापासून नॅशनल बुक ट्रस्टचा गोवा पुस्तक महोत्सव

पणजीत उद्यापासून नॅशनल बुक ट्रस्टचा गोवा पुस्तक महोत्सव

0

8 फेब्रुवारीपर्यंत चालणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार महोत्सवाचे उद्घाटन

नॅशनल बुक ट्रस्टचा गोवा पुस्तक महोत्सव बुधवार दि. 4 फेब्रुवारीपासून सुरू होत असून, 8 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. उद्या संध्याकाळी 4.30 वाजता येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती काल नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय व गोवा सरकार, समर्थ युवा फाऊंडेशन आणि लोकमान्य सांस्कृतिक फाऊंडेशन यांच्या सहकार्याने या पुस्तक महोत्सवाचे आयोजन होत असल्याची माहिती यावेळी युवराज मलिक यांनी दिली. या उद्घाटन सोहळ्याला कला-संस्कृती मंत्री रमेश तवडकर, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, लोकमान्य सांस्कृतिक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे व नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे संचालक युवराज मलिक हे हजर असतील.

नॅशनल बुक ट्रस्टने ‘ओशन ऑफ स्टोरीज’ या संकल्पनेवर आधारित या गोवा पुस्तक महोत्सवाचे आयोजन केलेले असून, त्यात देशभरातील वाचक, लेखक, प्रकाशक व विचारवंत हे एकत्र येणार असल्याची माहिती युवराज मलिक यांनी दिली.
या महोत्सवात 100 पेक्षा जास्त प्रकाशकांची पुस्तकांची 200 वर स्टॉल्स असतील. त्यात इंग्रजी, मराठी, कोकणी, तसेच इतर भारतीय भाषांमधील विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. ह्या महोत्सवात प्रवेश हा विनामूल्य असेल आणि वाचकांना पुस्तक खरेदीवर 10 टक्के एवढी सवलत देण्यात येणार आहे. हा महोत्सव सकाळी 11 वाजता खुला होणार असून, रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहणार आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

मुलांसाठी विविध कार्यक्रम
या पुस्तक महोत्सवानिमित्त मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हे कार्यक्रम सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 1.30 या दरम्यान होणार आहेत. त्यात व्यंगचित्रांचे शिबिर, घोषणा लेखन शिबिर, नृत्य शिबिर, तसेच अभिनय शिबिर, पोस्टर मेकिंग वर्कशॉप, मातीकामाचे शिबिर, तसेच मुलांना गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आदींचा समावेश असेल, असे मलिक यानी सांगितले. यावेळी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती शालेय मुलांसाठी ही शिबिरे घेतील.

गोव्यातील बाल साहित्य चित्र प्रदर्शन
‘गोवा : प्रकाश आणि आनंदाच्या कथा’ नावाचे एक विशेष प्रदर्शन होणार आहे. त्यात गोव्यातील नामवंत कलाकारांच्या प्रतिनिधीक कलाकृती सादर केल्या जातील. त्यात मारियो मिरांडा आणि शशी शेटये यांच्या कलाकृती सादर केल्या जातील. गोव्यातील लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना हजर राहून हा गोवा पुस्तक महोत्सव 2026 यशस्वी करावा, असे आवाहनही यावेळी मलिक यांनी केले. या पत्रकार परिषदेला लोकमान्य सांस्कृतिक फाडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर हेही हजर होते.

लेखक मंचावर’मध्ये कोण सहभागी होणार?
या प्रदर्शनानिमित्त ‘लेखक मंचावर’ साहित्यिक सत्रांची एक आकर्षक मालिका आयोजित केली जाणार आहे. त्यात भारतभरातील प्रसिद्ध लेखक, पत्रकार, विचारवंत आणि सर्जनशील व्यक्ती भाषणे, संवाद व चर्चेच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतील. साहित्यिक सत्रात लेखक उदय माहूरकर, अभिनेत्री तथा दिग्दर्शिका व लेखिका मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री अविका गौर, भारतीय हवाई दलाचे वैमानिक व अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, लेखक शांतनू गुप्ता, चित्रपट निर्माते तथा अभिनेते चंद्रप्रकाश द्विवेदी, इतिहासकार मोहन शेटे, पत्रकार एम. जे. अकबर, लेखक सुमंत बत्रा, अभिनेते सचिन पिळगावकर आदींचा समावेश असेल. त्याशिवाय रात्रीच्यावेळी या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असेल, असे युवराज मलिक यांनी स्पष्ट केले.