तीन विरोधी आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
28

>> कॉंग्रेसचे एक व गोवा फॉरवर्डच्या दोघांचा समावेश

काल राज्यात घडलेल्या एका महत्त्वाच्या घडामोडीत कॉंग्रेसच्या एका व गोवा फॉरवर्ड पक्षाच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटणार्‍या कॉंग्रेसच्या आमदारामध्ये आलेक्स सिक्वेरा तर गोवा फॉरवर्डच्या जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांचा समावेश आहे.

या तिन्ही आमदारांनी विकासकामांच्या प्रश्‍नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले. मात्र गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ह्या विरोधी पक्षांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने काल चर्चांना उधाण आले होते.

फालेरोंवर कॉंग्रेसकडून
अन्याय ः आग्नेलो

गेल्या पाच वर्षात कॉंग्रेस पक्षाने ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांच्यावर अन्याय केला आहे. तसेच त्यांना वाईट वागणूक दिली. म्हणूनच आता त्यांचे नाव तृणमूल कॉंग्रेसशी जोडले गेले असल्याचे काल कॉंग्रेसचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याशी आपण चर्चा केली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र त्याचबरोबर त्यांनी आपण प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याचे मान्य केले. कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.