केंद्र सरकारची घरोघरी लसीकरण मोहीम

0
34

>> नीती आयोगाची माहिती, मार्गदर्शक सूचना जारी

केंद्र सरकारने घरोघरी लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिव्यांगांना आणि जे लोक घरीच असून चालू फिरू शकत नाहीत त्यांचे घरीच लसीकरण करण्यात येणार असल्याचे काल केले जाईल. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी दिली. लस घेण्यासाठी जे केंद्रात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही घरीच लसीकरण सुरू करत असल्याचे ते म्हणाले. या लसीकरणातही सर्व नियमांचे पालन केले जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले.

देशातील ६ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला आहे. यामध्ये लक्षद्वीप, चंदिगड, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि सिक्कीम यांचा समावेश आहे. देशातील ४ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पहिला डोस दिला गेला आहे. यामध्ये दादरा- नगर हवेली, केरळ, लडाख आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.
देशातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णसंख्याही कमी झाली आहे. सध्या देशात सध्या ३ लाख सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी १ लाखांहून अधिक केरळमध्ये आणि ४० हजारांहून अधिक महाराष्ट्रात आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी ५ टक्क्‌यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी दर आहे, तिथे गर्दी करू नये. कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमासाठी पूर्व परवानगी घेण्यात यावी, तसेच त्यामध्ये लोकांची संख्याही सांगितली पाहिजे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले. सणांच्या काळात निष्काळजी राहू नका, आपण सुरक्षित राहावे, सण घरीच साजरा करावा, असे आवाहन श्री. पॉल यांनी नागरिकांना केले आहे.

दरम्यान, देशात सलग १२ व्या आठवड्यात कोरोना संसर्गाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा कमी आहे. हा दर ३ टक्क्यांहूनही कमी आहे.