तीन राज्यांत विजेचा, तर दोन राज्यांत ढगफुटीचा कहर

0
101

>> उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात ६७ जणांचा बळी

उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांच्या अनेक जिल्ह्यांत रविवारपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस अनेकांसाठी धोकादायक ठरला असून, वीज कोसळल्याने आत्तापर्यंत जवळपास ६७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानातही वीज कोसळल्याने जवळपास २० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यात ७ बालकांचा समावेश आहे. तसेच २१ जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशात वीज अंगावर कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या ४० मृतांच्या पीडित कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून मदत जाहीर केली आहे.

हिमाचल, जम्मू-काश्मिरात ढगफुटी

हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा भागातील भागसू नाग परिसरात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जम्मू-काश्मिरातील गंदरबल जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार उडाला असून, अचानक झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
हिमाचल प्रदेशचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मॅक्लोडगंजमध्ये ढगफुटी झाल्याने ओढ्यांनाही नदीचे स्वरुप आले. धर्मशाळा येथे शिला चौकाजवळ पाणी घुसल्याने एक तीन मजली घर कोसळले. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्तेही बंद झाले आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अनेक वाहने देखील वाहून गेली आहेत. ढगफुटीच्या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यातून तेथील परिस्थितीची भीषणता समोर आली आहे.