आषाढ महिमा वर्णावा किती…

0
139
  • डॉ. गोविंद काळे

झपाट्याने बदलणार्‍या वेगवान काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी कालबाह्य बनल्या. आषाढ आणि आषाढवारी त्याला अपवाद. माणसा-माणसांतील प्रेम जागविणारे ‘सकलासी येथे आहे अधिकार’ असे म्हणून मानवतेची नाळ घट्ट करणारे शिक्षण वारीतच मिळते. हे आषाढ पर्वकाळा, तुला वंदन!

पर्वकाळ म्हणजे पुण्यकाळ. केवळ आषाढी एकादशीच नव्हे तर संपूर्ण आषाढ महिना पर्वकाळ म्हणून साधुसंतांनी गौरविला आहे. लक्षावधी वारकर्‍यांचे पाय ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करत-करत मोठ्या आनंदाने पंढरीची वाट चालतात. पंढरीची वारी हे जगातले फार मोठे आश्‍चर्य आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, चीनची लांब भिंत, पिसा येथील झुकता मनोरा, आग्र्याचा ताजमहाल ही जगातील आश्‍चर्ये मानली जातात. जगातील पर्यटकांनी भेट द्यायची आणि आश्‍चर्याने तोंडात बोटं घालायची. भव्यतेपुढे नतमस्तक व्हायचे एवढेच. पंढरीच्या वारीचे गणितच वेगळे. कोणी कोणाला आमंत्रण देत नाही, कोणी कोणाची कसलीही सोय करत नाही. विमानाचे, वेगवान रेल्वेचे, बसगाडीचे यंत्रयुग मानवी सुखासाठी उपलब्ध असताना हे सुख ठोकरायचे आणि शेकडो मैल चालत-चालत ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर करीत पंढरी गाठायची. श्रीविठ्ठलाचे दर्शन तर लांबूनच घेण्याची पाळी अनेकांवर येते. अत्युच्च सुख पदरी पडल्याचा अनुभव घ्यायचा आणि विलक्षण समाधानाने अपार आनंदाचे धनी होऊन परतायचे. जगातील हेच एकमेव जिवंत आश्‍चर्य आहे असे मला वाटते. आषाढी आणि आषाढाची सर अन्य कोणत्याच महिन्याला नाही… आषाढ तो आषाढ!!

आषाढाचा हा कीर्तिसुगंध दरवर्षी परमळत असताना भगवंतांनी मात्र गीतेच्या १० व्या अध्यायात ‘मासानाम् मार्गशीर्षोऽहम्’ असे का म्हणावे, याचे आश्‍चर्य मला आजही वाटते. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे’ असे बालकवींना लिहावेसे वाटले. या नयनरम्य हिरवळीपेक्षाही मला भावते ती आषाढातील भक्तिरसाची हिरवळ. माणसाला जागविणारी. ‘सह नाववतु| सह नौ भुनक्तु|’ या मांगलिक विचारांचे दर्शन आषाढवारीतच घडते. ‘मा विद्विषावहै…’ आम्ही एकमेकांचा द्वेष करणार नाही. बाप रे बाप! कुटुंबात कलह नि द्वेष, शेजार्‍यांशी पटत नाही असा हा आजचा कालखंड. ‘भेदाभेद हे अमंगल’ हे संतांचे तत्त्वज्ञान वारीतच पाळले जाते. ८० वर्षांच्या एखाद्या वारकर्‍याच्या चरणावर तरुण डोके टेकवतो तेव्हा तो वृद्ध वारकरीसुद्धा ‘माऊली’ म्हणून त्याच्यापुढे नतमस्तक होतो. आषाढाची ही वारीतील देण केवळ अविस्मरणीय मानावी लागेल. झपाट्याने बदलणार्‍या वेगवान काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी कालबाह्य बनल्या. आषाढ आणि आषाढवारी त्याला अपवाद. माणसा-माणसांतील प्रेम जागविणारे ‘सकलासी येथे आहे अधिकार’ असे म्हणून मानवतेची नाळ घट्ट करणारे शिक्षण वारीतच मिळते. हे आषाढ पर्वकाळा, तुला वंदन!
पंढरीच्या आषाढीवारीपुरते आषाढ मासाला मर्यादित करू नका. ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’, ‘ऋतुसंहार’, ‘मेघदूत’ ही चार काव्ये, ‘मालविकाग्निमित्रम्’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘शाकुंतल’ ही तीन नाटके अशा सप्त साहित्यकृतींची निर्मिती करणार्‍या, कविकुलगुरू म्हणून विश्‍ववंद्य मानल्या गेलेल्या कालिदासाचे वर्णन-
कालिदास गिरां सारं कालिदासः सरस्वति
चतुर्मुखो अथवा साक्षात् विदुर्नान्ये तु मादृशः|
असे केले जाते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणून कालिदास जयंती साजरी करण्याची प्रथा पडली.
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श|
कालिदासालासुद्धा आषाढातलाच मेघ दिसावा याला काय म्हणावे?
श्रावण-भाद्रपदातला मेघ चालला नसता काय? आषाढातलाच मेघ आपल्या ‘मेघदूत’ काव्यासाठी पसंत केला. वा रे आषाढ! पुन्हा एकदा तुला वंदन रे बाबा!!
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे,
फुल्लारविन्दा यतपत्र नेत्र
येन त्वया भारततैलपूर्णः
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः|
ज्ञानदीप प्रज्वलित करणार्‍या महर्षी व्यासांना वंदन करणारी गुरुपौर्णिमासुद्धा आषाढातच येते. शाळा-महाविद्यालयांतून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करताना प्रत्येकाच्याच ओठी असते गुरुमहात्म्य ः
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्‍वरः|
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
जगात शिकण्यासारखे खूप आहे. मिळेल तेथून गुण घ्या, अवगुण टाळा ही संतांची शिकवण घ्या ना रे बाबांनो.
जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्यां गुरु केला जाण
गुरुसी आलें अपारपण
जग संपूर्ण गुरू दिसे
आषाढातच निघते जगन्नाथाची रथयात्रा. बलराम सुभद्रासहित. आषाढाच्या प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत सांगितले आहे. आजही अनेक पुरोहितमंडळी विनयपूर्वक व्रताचरण करताना दिसतात.

देवसुद्धा सतत कष्ट करून दमतात हो. त्यांनाही दीर्घ विश्रांतीची गरज भासते. ‘देवशयनी एकादशी’ आषाढातच येते. चार महिने देव झोपी जातात. किती सुंदर कल्पना. देवशयनी एकादशी भक्तिपूर्वक साजरी होते. हासुद्धा असतो एक महोत्सवच. कोकिळा तर चैत्र- वैशाखातसुद्धा कुहूकुहू गाताना आढळते. पण धर्मशास्त्रकारांनी कोकिळाव्रत आषाढातच करण्यास सांगितले.
सृष्टीला चिंब भिजविणारा आषाढ
भक्तिरसाला उधाण आणणारा आषाढ
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे
अपार आनंदाची पर्वणी देणारा आषाढ…
आषाढ महिन्याने भरभरून दिले सर्वांना. काय आणि कसे सांगावे? गटारी अमावस्यासुद्धा आषाढाने अधोरेखित केली आहे. सर्वांचीच सोय आषाढाने पाहिली आहे.
आषाढाची आठवण तर सर्वच कवी ठेवतात-
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा ऋतु तरी
आषाढा! तुला मनोभावे प्रणिपात!