कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत केंद्राचा राज्यांना पुन्हा इशारा

0
53

अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयानेही राज्यांना असा इशारा दिलेला होता. मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. बाजार, सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटन स्थळांवर गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने वरील इशारा दिला आहे.

यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांनी आवश्यक पावले उचलण्याची गरजही केंद्राने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. देशातील अनेक भागांमध्ये खासकरून हिल स्टेशन, सार्वजनिक वाहतूक आणि बाजारांमध्ये कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होण्याचा इशारा राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना दिला आहे.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करण्यास सक्षम असणार्‍यांमध्येही कोरोनाची लागण येणे आणि लॉकडाऊन सुलभ करणे ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची संभाव्य कारणे असू शकतील असा इशारा दिला आहे.