तिसरी घंटा कधी?

0
259
  • प्रवीण मराठे
    (नाट्य दिग्दर्शक, सत्तरी)

गोव्याला रंगभूमीची खाण असं म्हटलं जातं.. इकडे राहणारी व्यक्ती आयुष्यात एकदातरी तोंडाला नाटकाच्या प्रयोगासाठी रंग फासते. पण आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर हे असे पुढे किती दिवस चालू राहील सांगता येणार नाहीये. नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीत, वेषभूषा, रंगभूषा, नाटकांचे दिग्दर्शन अशा गोष्टींना प्राधान्य देत आजही पुष्कळ लोक आपला उदरनिर्वाह करीत होते… पण कोरोनासारख्या महामारीमुळे आलेलं हे संकट कधी दूर होईल, व नाटकाची तिसरी घंटा कधी वाजेल या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. नाट्यसंस्था आणि कलाकारांसाठी ‘आभासी’ प्रयोग गोमंत रंगभूमीला वरदान ठरू शकतो का? हा खूप मोठा प्रश्‍न आहे. नाटक उभे करताना येणारा नेपथ्य व इतर तांत्रिक खर्च, त्यात येणारा प्रवासखर्च, दिवस-रात्र बस, कार रिक्षेचा प्रवास करून प्रयोगाच्या जागी पोहोचा. पोहोचल्यावर प्रेक्षक येतील की नाही ही भीती. शिवाय आयोजकांच सहकार्य. एवढं सगळं करण्यापेक्षा कोविडच्या वेळेत रेकॉर्ड केलेले प्रयोगच लोकांपर्यंत पोहोचवणे सोयीचे असू शकते हे माझं स्पष्ट मत. जर तांत्रिकदृष्ट्या चांगले रेकॉर्डिंग झाले असेल आणि ते तेवढेच प्रभावीपणे प्रवाहित झालेले असेल तर तो ‘थेट’ सादरीकरणाइतकाच प्रभावी ठरू शकतो.
डिजीटलीकरणाच्या माध्यमातून जगभरातला नाट्यव्यवहार खुला होत आहे, असे असले तरी महामारीच्या वातावरणात अजूनही तीच उदासी आहे. डिजीटलीकरणाकडे आपण एक संधी आणि स्वतंत्र कलामाध्यम म्हणून पाहतो की सध्याच्या कोरोना-लॉकडाऊनमधला निवांतपणा किंवा वेळ घालवण्यासाठीचे माध्यम म्हणून त्याकडे पाहतोय हा कळीचा मुद्दा आहे. कोरोना प्रकरण संपेपर्यंत फेसबुक किंवा वॉट्सअपवर प्रसारित करायचे आहे म्हणून काहीतरी करू असा विचार त्यामागे आहे? यातून, ‘लॉकडाऊन थिएटर’, ‘कोरोना थिएटर’ किंवा ‘क्वारंनटाइन थिएटर’च्या नावावर समोर मोबाईल ठेवून एखादी कविता किंवा गोष्ट वाचणे किंवा कुठल्यातरी एकल नाटकातला प्रवेश करून दाखवणे म्हणजे डिजिटल, आभासी रंगभूमी असे काहीसे होऊ लागले आहे. अर्थात, अशा प्रयोगाचे महत्त्व नाही असे नाही. वाचिक नाट्य परंपरेतील तो एक प्रकार असू शकेल. पण, नाटक म्हणजे निव्वळ शब्दांचे वाचन नसते. नाटक म्हणजे एक सर्वसाधारण रचना असते. त्यामध्ये प्रकाश आणि प्रकाश योजना असते, आवाज आणि संगीत असते. आणि या सर्वांतून येणारी एक ‘जादू’ असते हे इथे विसरले जाते.

जिवंतपणा हा नाटकाचा मूळ गाभा आहे. तो डिजीटलीकरणात गायब होतो. नाटक पडद्यावर पाहायला मिळते हे ठीक आहे. ‘झूम’ किंवा ‘गुगल मीट’वर हौस म्हणून एखादे सादरीकरण करताना ठीक आहे. एखाद्याचे बाजारीकरण होते, स्वतःला दाखवायची हौस भागून जाते किंवा एखादे म्हणणे मांडले जाऊ शकते. शिवाय, शैक्षणिक क्षेत्रातही याचे महत्त्व असू शकते. शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी. पण, इथे ‘थेट’ प्रयोगातली उत्स्फूर्तता नसते.
रंगमंचावरच्या कलाकारांचे श्‍वासोच्छ्वास स्वतः कलाकार किंवा प्रेक्षक अनुभवू, ऐकू शकत नाही. नाटक, संगीत, किंवा कुठलेही ‘थेट’ सादरीकरण यात श्वासांची देवाणघेवाण असते. रंगमंचावरच्या ‘जिवंत’ सादरीकरणातील ती कळीची बाब असते. डिजिटल सादरीकरणामधे आपण चेहरे पाहू शकतो, आवाज ऐकू शकतो. पण ते अनुभवू शकत नाही.

कोरोना काळ सामान्य होईतोवर डिजिटल- डिजिटल खेळू असा एक विचारही या कृतींमागे आहे. एकतर, ‘सामान्य’ असणे हे प्रकरणच बदलले आहे. आता आपण सामान्य म्हणजे काय हा प्रश्‍न विचारायला हवा. बदलत जाणार्‍या नव्या सामान्याचा विचार हवा. सुरुवातीचा ‘कोरोना थिएटर’चा जोश ओसरला असेल किंवा तो जेव्हा केव्हा ओसरेल त्यावेळी आपण नाटकासारख्या जिवंत, सामूहिक कला आणि डिजीटलीकरण याचा नीट विचार करायला हवा. जिवंत नाटक आणि आभासी नाटक यामधल्या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल, त्यातल्या ‘नाट्या’नुभवाबद्दलच्या सौंदर्यदृष्टीचा साकल्याने विचार व्हायला हवा.

कोरोनापूर्व काळात जे काही कुणी रेकॉर्डिग केले असेल ते ‘संग्रहित’ म्हणून केले असणार. आपण केलेला प्रयोग भविष्यकाळात बघायला मिळावा या इच्छेने ते रेकॉर्डिंग केले असणार. पण त्या रेकॉर्डिंगला ‘प्रत्यक्ष’ आणायचे असेल ते विचारपूर्वक होणे महत्त्वाचे आहे. कोरोना आपत्तीमुळे हा विचार करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे, चला सगळे करतायत म्हणून करू की आपणही ‘कोरोना थिएटर’ म्हणून करण्यात अर्थ नाही.

समजा, या काळात करण्यासारखे वा बघण्यासारखे एखाद्याकडे काही नसेल तरी हरकत नाही. किंवा काही केले नाही तरी काही बिघडणार नाही. काही दिवस नाटक-बिटक नाही बघितले तरी काही बिघडणार नाही. सहा महिने नाटक बघितलेच नाही किंवा काही साहित्य वाचलेच नाही किंवा लोकांपुढे आलेच नाही तर काही तसे बिघडणार नाही. ‘काहीतरी करूया’ म्हणून ‘व्यक्त’ व्हायची धडपड असेल तर त्यानं काही हाताला लागणार नाही. सहा महिने-वर्षभर कुणी आपलं कार्य पाहिलं नाही तर आपण विसरले जाऊ, नाटक संपेल अशी काहींना भीती असेल तर तो मनाचा खेळ असेल. आतून आणि आपल्या भोवतालाशी सहजपणे जुळणारं असं काही येत असेल ते आनंददायी किंवा विचारप्रवर्तक असू शकेल. ते टिकणारं असेल.

नाटक किंवा साहित्य नसले तरी इतर काहीतरी आपण बघत असतो किंवा वाचत असतो. प्रत्येक ‘जिवंत’ कलाकृती ‘डिजिटल’ व्हायला हवी असे नाही. किंवा, जवळ बरा मोबाइल कॅमेरा आहे म्हणून प्रत्येकाने उठून काहीतरी रेकॉर्डिंग करून ते अपलोड करायला पाहिजे असे काही नाही. आपल्या कृतीमागच्या हेतूंबद्दलची स्पष्टता हवी.

अर्थात, ज्यांचे नाटकावर पोट आहे. त्यांच्यासाठी हा काळ खरंच कठीण आहे. त्यांनी, डिजीटलीकरणाकडे व्यावसायिक कृती म्हणून पाहायला हवे. त्यांनी ऑनलाइन माध्यमातला आपला वावर वसूल करायला हवा. त्यांनी ‘कोरोना थिएटर’ व्यावसायिक पातळीवर न्यायला हवे. डिजिटल रंगभूमीवरही ‘पडद्यामागचे कलाकार’ असतात त्यांचाही इथे विचार व्हायला हवा.

उद्या, परवा किंवा काही दिवसात सगळं सुरळीत झालं तरी नाटकाच्या डिजीटलीकरणाकडे गांभीर्याने आणि विचारपूर्वक पाहायला हवे. यातून नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. डिजिटल आहे की प्रत्यक्ष यापेक्षा पर्याय कसे नवे मिळत आहेत याबद्दलची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. एवीतेवी नाटकाच्या ‘जिवंत’ नाटकाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित राहिला आहे. मग, डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे थोड्या जास्त लोकांपर्यंत नाटक पोचवण्याची संधी घ्यायला हवी. एखादा प्रयोग करताना तो नंतर ‘थेट’ जाणार आहे याची जाणीव ठेवून योग्य ती तयारी व्हायला हवी. या निमित्ताने, नाट्यसंस्था, कलाकार-तंत्रज्ञ एकत्र मिळून काम करण्याच्या शक्यता अजमावता येतील.
कोरोना लॉकडाऊनमध्ये एक लक्षात आले आहे की नाटक किंवा नाट्यात्म काहीतरी हवे आहे. मागणीचे स्वरूप बदलले आहे. परिस्थिती आणि कलारुपाची गरज म्हणून वेगवेगळ्या माध्यमात आदानप्रदान वाढले आहे. या आदानप्रदानाला कलात्मक तसेच व्यावसायिक दृष्टी प्राप्त होण्यासाठी तांत्रिक प्रगतीची जोड द्यावी लागणार. मोठी अडचण आहे ती पारंपरिक माध्यमात प्रशिक्षण घेतलेल्यांना डिजिटल माध्यमाच्या खाचाखोचा समजण्याची. डिजिटल माध्यमाची गरज, त्याचे सौंदर्यशास्त्र समजून घेऊन रूप तसेच तांत्रिक शिक्षणाची पुनर्मांडणी करायला हवी. मग त्यात नट आले, संगीतकार आले, शैक्षणिक केंद्रेही आली. प्रवास सर्वांचा आहे….आता प्रतीक्षा फक्त तिसर्‍या घंटेची…!!!