तिसरा पर्याय?

0
112

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा यांची गोवा भेट अचानक रद्द झाल्याची अचूक वेळ साधत आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गोव्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर येत आहेत. आगामी निवडणुकीचे रणशिंग ते आपल्या ह्या गोवा भेटीत फुंकणार आहेत हे उघड आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोव्याच्या राजकीय क्षितिजावर दमदार पदार्पण करण्यासाठी ‘आप’ ने ह्यावेळी सर्वशक्तिनिशी प्रयत्न चालवलेले दिसतात. तेवढे आर्थिक बळही ह्यावेळी त्यांच्यापाशी दिसते आहे. २०१७ च्या निवडणुकीतही ‘आप’ ने आपले भाग्य आजमावून पाहिले होते, परंतु तेव्हा गोव्यात नव्यानेच अवतरलेला ‘आप’ एका विशिष्ट कोंडाळ्याच्या हाती अडकला होता. त्यामुळे त्याला आम जनतेची स्वीकारार्हता लाभली नाही. शिवाय जनतेपर्यंत पोहोचण्यातही तेव्हा पक्ष बराच कमी पडला होता. त्याच्यावरची ‘भायलो’ पक्ष असल्याची छाया हटली नव्हती. यावेळी तसे चित्र दिसत नाही. गोव्याच्या जनतेला तिच्या संकटाच्या घडीस – कोरोना काळामध्ये सर्वांत आधी ‘आप’ च मदतीला धावून आलेला आहे. ऑक्सिमित्र योजना असो, मोबाईलवरून वैद्यकीय मार्गदर्शन असो, प्राणवायू पुरवठा करणे असो, गरजूंना धान्यपुरवठा करणे असो, किंवा प्रसारमाध्यमांतील जोरदार जाहिरातबाजी असो, ‘आप’ पूर्ण तयारीनिशी सध्या गोव्याच्या निवडणुकीच्या रणमैदानावर उतरलेला आहे.
राज्यातील बहुतेक मतदारसंघांपर्यंत आपले जाळे पोहोचवण्याचे जोरदार प्रयत्न पक्षाने केलेले आहेत आणि भाजप आणि कॉंग्रेस ह्या दोन्ही बड्या राजकीय पक्षांना नाकारून गोमंतकीय जनतेेने तिसरा पर्याय म्हणून ‘आप’ ला समर्थन द्यावे अशी भूमिका सध्या पक्ष आग्रहाने मांडताना दिसतो आहे. विशेषतः नीतीशून्य राजकारणाला ‘आप’ च्या यावेळच्या प्रचारामध्ये प्रमुख लक्ष्य केले गेेलेले दिसते. कॉंग्रेसमधून भाजपात उडी मारून पदे पटकावलेल्या पक्षबदलूंना नुकतेच लक्ष्य करीत ‘आप’ने त्यांना केक भेटीदाखल पाठवले. दक्षिण गोव्यामध्ये भाजप समर्थकांशी ‘आप’ कार्यकर्त्यांचा संघर्षही झडला. खरे तर ‘आप’ ला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाने करणे म्हणजे सापळ्यात अडकणे आहे. आम आदमी पक्षाला सध्या जनतेचे लक्ष आपल्याकडे अधिकाधिक वेधून घ्यायचे आहे आणि त्यासाठी अशा आक्रमक उपक्रमांचा आटापिटा पक्षातर्फे केला जाणार आहे. त्यामुळे त्यावर जेवढा गदारोळ होतो तो शेवटी ‘आप’च्याच पथ्थ्यावर पडेल.
खरे म्हणजे राज्यातील अनेक प्रश्न ‘आप’ आपल्या प्रचाराच्या अजेंड्यावर प्राधान्याने घेऊ शकला असता. कोरोना हाताळणीतील सरकारचे अपयश,
राज्याची ढासळती आर्थिक स्थिती, लटकलेला खाण प्रश्न, म्हादई प्रश्न, असे अनेक प्रश्न ऐरणीवर आणता आले असते, परंतु आम आदमी पक्षाने ह्यावेळी केवळ गोव्यातील नीतीशून्य राजकारणालाच लक्ष्य करायचे ठरवलेले दिसते. ‘‘चोरांनी नाडले मरे, गोंय विकूंक काडले मरे’’ सारखी प्रचारगीते आणि जाहिरातबाजी ह्याच मुद्‌द्याकडे अंगुलीनिर्देश करते. नीतीशून्य भाजपा आणि कृतीशून्य कॉंग्रेसला पर्याय म्हणून आम्हाला आजमावून पाहा असा ‘आप’चा यावेळी गोमंतकीयांना संदेेश दिसतो.
वैचारिकदृष्ट्या पाहता ‘आप’ ने उपस्थित केलेला हा मुद्दा बिनतोड आहे, परंतु गोमंतकीय मतदार खरोखर राजकारणातील शुचितेचा आणि शुद्धतेचा अशा प्रकारचा विचार करून मतदान करतो का? आजवरच्या निवडणुकांतील मतदारांना आकृष्ट करणारे मुद्दे हे ‘नैतिक’ पेक्षा ‘आर्थिक’च राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने भरभक्कम बहुमत राज्यात मिळवले ते विविध कल्याणयोजनांच्या आणि पेट्रोलदरातील कपातीच्या बळावर. राजकारण्यांची नीतीमत्ता, त्यांची वैचारिक उंची वगैरेंशी गोव्यातील सर्वसामान्य मतदारांचे काही देणेघेणे दिसत नाही. बहुतांश मतदार आपला फायदा पाहतात आणि त्यानुसार मतदान करतात. त्यामुळेच गोव्यामध्ये काही मतदारसंघ हे विशिष्ट व्यक्तींचे सुभे झालेले आहेत. त्यांनी पक्ष बदलले तरी त्यात फरक पडत नाही. मतदारांना सरकारी नोकर्‍या हव्या आहेत, मोफत कल्याण योजना हव्या आहेत, अनुदाने हवी आहेत, सवलती हव्या आहेत. ‘आप’ च्या केवळ राजकारण स्वच्छ करण्याच्या मुद्‌द्यावर किंवा नुसत्या वीज व पाणी मोफतच्या घोषणेवर जनमत वळवणे वाटते तेवढे सोपे नाही. केजरीवालांना याचा विचार करावा लागेल. गोव्याला नीतीशून्य राजकारण नको असेल, परंतु ‘नौटंकी’चे राजकारण तर त्याहूनही नको आहे!