हाईपो-थायरॉइडीझम

0
151
  • वैद्य स्वाती अणवेकर
    (म्हापसा)

कोणताही आजार बरा करायचा असेल तर औषध, योग्य आहार, दिनचर्या, ह्या सोबतच योग, व्यायाम आणि प्राणायाम ह्यांनादेखील तेवढेच महत्व आहे.
व्यायाम प्रकारात जॉगिंग, एरोबिक्स, रनिंग, ब्रिस्क-वॉकिंग ह्यांचा अंतर्भाव आपल्या व्यायामामध्ये करावा.

आज आपण हाईपो-थायरॉइडीझम म्हणजे काय ते सविस्तर जाणून घेणार आहोत. पण प्रथम थायरॉइडचा आजार आपल्याला झाला आहे हे कसे ओळखायचे ते पाहूयात. हे ओळखणे जरा कठीण काम आहे. कारण ह्या आजाराची लक्षणे थोडी अस्पष्ट असतात आणि ती मानसिकदेखील असतात. त्यामुळे जसे सर्दी झाली असता शिंका येतात आणि नाक गळते किवा छातीत कफ झाला असेल तर खोकला येतो तसे थायरॉइडच्या आजाराचे नसते.

गंमत म्हणजे बरीचशी लक्षणे ही मानसिक असल्याने घरातील काही व्यक्तींना असे वाटू शकते की ती व्यक्ती उगीचच छोट्या गोष्टींचा मोठा बाऊ करते किवा चक्क आजारपणाचे ढोंग करते आणि त्यामुळे हे आजार बरेचदा दुर्लक्षित राहू शकतात. मग ह्या आजाराचे निदान करायला तुम्हाला डॉक्टर किंवा एन्डोक्रिनॉलॉजिस्टची मदत घ्यावी लागू शकते. डॉक्टर थायरॉइड फन्क्शन टेस्ट अर्थात टी-३, टी-४, टीएस्‌एच्‌ची पातळी तपासून तसेच शारीरिक व मानसिक तक्रारी कोणत्या आहेत हे पाहून तुम्हाला कोणता थायराइॅडचा आजार झाला आहे हे सांगू शकतात.
हायपोथायरॉइडिझमचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आढळून येते. ह्यालाच ‘अंडरऍक्टिव्ह थायरॉइड’ असे देखील म्हणतात. ह्यात शरीराचा चयापचय पुष्कळ कमी होतो त्यामुळेच….
१) वारंवार थकवा येणे
२) हालचाल मंदावणे
३) अति प्रमाणात थंडी वाजणे
४) त्वचा कोरडी होणे
५) हृदयाची गती कमी होणे
६) जास्त न खातासुद्धा वजन वाढणे
७) केस कोरडे रुक्ष होणे
८) गोष्टी विसरायला होणे
९) मासिक पाळीच्या तक्रारी
१०) वंध्यत्व
११) सांधेदुखी
१२) उदासीनता
१३) पोट साफ न होणे
अशा अनेक तक्रारी या विकाराच्या रुग्णाला होऊ शकतात.
आपण मागील लेखामध्ये हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि थायरॉइड एकमेकांशी काय संबंध आहे हे सविस्तर पाहिलं होतं. हायपो-थायरॉइडिझममध्ये थायरॉइड ग्रंथी क्रियाशील करण्याकरिता पिट्युटरी अधिक प्रमाणात टीएसएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन निर्माण करते. पण थायरॉइड ग्रंथी मात्र टी३, टी४ हे हॉर्मोन्स आवश्यक प्रमाणात निर्माण करू शकत नाही परिणामीथायरॉइड फन्क्शन टेस्टमध्ये टी३ आणि टी४ या हॉर्मोन्सचे प्रमाण अगदी कमी आणि
टीएसएच चे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळून येते.

हायपो-थायरॉइडिझमची कारणे कोणकोणती आहेत?

१) जर काही कारणाने थायरॉइड ग्रंथी शस्त्रक्रिया करून काढून टाकली असेल..
२) गळ्याच्या भागी रेडिएशन थेरपी घेतली असेल..
३) आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असेल..
४) बाळंतपणानंतर काही कारणाने थायरॉइड ग्रंथीचे कार्य बिघडले असेल..
५) जन्मजात काही थायरॉइड ग्रंथीचा आजार असेल तर
६) पिट्युटरी किंवा हायपोथॅलॅमस ग्रंथीचा आजार असेल तर
७) तसेच हाशिमोटो थायरॉडायटिस किवा अन्य एखादा ऑटोइम्यून आजार असेल त हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो.

थायरॉइड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे सुरु राहण्यासाठी पुरवठ्याच्या स्वरुपात किवा आहारातून झिंक, सेलेनियम आणि आयोडिन हे ३ घटक योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. तर आहारात हे तिन्ही घटक मिळण्यासाठी 

१) दुध व दुधाचे पदार्थ
२) सी-फूड
३) अंडी
४) कोबी, पालक, फ्लॉवर, ब्रोकोली ह्यांचा अतिरेक टाळून सर्व प्रकारच्या भाज्या
५) साखरकंद किंवा पीच, बेरी ह्यांचा अतिरेक टाळून सर्व प्रकारची फळे
६) नाचणी, वरी, बाजरी, ज्वारी ह्यांचा अतिरेक टाळून सर्व प्रकारची धान्य ह्यांचा आहारात समावेश करावा
७) तसेच आहारात योग्य प्रमाणात आयोडिनयुक्त मीठ वापरावे ह्यालाच फॉर्टिफाइड मीठ असेदेखील म्हणतात.
८) आहारात फास्ट फूड, जंक फूड, बेकरीचे पदार्थ ह्यांचा वापर टाळावा. सकस पौष्टिक आहार घ्यावा.

हायपो-थायरॉइडीझममध्ये उपचार करताना आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो औषधी द्रव्यामध्ये गुळवेल, दशमूळ, कांचनार, इ औषधे वापरली जातात. तर औषधी कल्पांमध्ये षड्धरण, अमृतोत्तरम, खादिरादी गुटिका, कांचनार गुग्गुळ इ उपयुक्त आहेत. तर औषधी सिद्ध घ्रुतामध्ये गुडूची घृत, महातीक्तक घृत, तिक्तक घृत ह्याचा उपयोग वैद्य करतात. त्याचप्रमाणे गरज असल्यास पंचकर्म उपचारातील नस्य, शिरोधारा ह्यांचासुद्धा चांगला उपयोग होतो.

अर्वाचीन चिकित्सा पद्धतीमध्ये लिव्हो-थायरॉक्सिन हे औषध दिले जाते. तसेच
१) मानसिक ताण घेणे कमी करावे
२) ७-८ तासांची शांत झोप घ्यावी
३) रात्री जागरण व दिवसा झोपणे टाळावे
४) मनशांतीसाठी ध्यान करावे
५) आवडते छंद जोपासावे
कोणताही आजार बरा करायचा असेल तर औषध, योग्य आहार, दिनचर्या, ह्या सोबतच योग, व्यायाम आणि प्राणायाम ह्यांनादेखील तेवढेच महत्व आहे.
व्यायाम प्रकारात जॉगिंग, एरोबिक्स, रनिंग, ब्रिस्क-वॉकिंग ह्यांचा अंतर्भाव आपल्या व्यायामामध्ये करावा. सोबतच स्नायुंची शक्ती वाढवण्यासाठी डंबबेल किंवा शरीराच्या वजनाचा वापर करून किमान आठवड्यातून ३ वेळा करावे.

हायपो-थायरॉइडिझममध्ये उपयोगी योग प्रकार व प्राणायाम

१) सर्वांगासन २) विपरीतकरणी ३) हलासन ४) मार्जारासन
५) मत्स्यासन ६) नौकासन ७) उष्ट्रासन ८) भुजंगासन
९) चक्रासन १०) शवासन ११) सेतुबंधासन
१२) धनुरासन १३) सिंहासन
तर उज्जायी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका, कपालभाती ह्यांचा चांगला उपयोग होतो