तामिळनाडूला पाणी सोडण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय

0
114

कावेरी प्रश्‍नावरून भडकलेल्या हिंसाचाराने काल दुसरा बळी घेतला. सोमवारी जमावावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात एक आंदोलक ठार झाला होता. तर काल अशाच प्रसंगात बंगळरूत एक युवक मृत्यूमुखी पडला. याच पार्श्‍वभूमीवर काल कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने तामिळनाडूला येत्या २० सप्टेंबरपर्यंत दररोज १२ हजार क्युसेक्स कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वरन यांनी मृत आंदोलकांच्या निकटवर्तियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडू व कर्नाटकमधील हिंसाचाराच्या घटनांबद्दल तीव्र वेदना व्यक्त करून शांततेचे आवाहन केले.
हा प्रश्‍न हिंसाचाराने सुटणार नसून कायद्याच्या कक्षेत राहूनच त्यावर तोडगा काढावा लागेल असे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे. कायदा मोडण्याची कृती हा या प्रश्‍नावर योग्य पर्याय ठरू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक तामिळनाडूला
पाणी सोडणार
दरम्यान, तामिळनाडूला कावेरीचे १२ हजार क्युसेक्स पाणी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा कर्नाटक सरकारने घेतला आहे. २० सप्टेंबरपर्यंत हे पाणी तामिळनाडूला सोडावे लागणार आहे. त्याचबरोबर हिंसाचार माजविणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही कर्नाटक सरकारने दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बंगळूर शहराला बसला असून तेथे सुमारे २५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या शहराच्या विविध भागांत कालही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांत ३६५ जणांना अटक करण्यात आली आहे. काल म्हैसूरमधील एका तामिळ चित्रपटाचे चित्रिकरणही बंद पाडण्यात आले.
दरम्यान, तामिळनाडूतही काल दुसर्‍या दिवशीही उभय राज्यांच्या आंतरराज्य बस वाहतुकीवरही या हिंसाचाराचा मोठा परिणाम झाला आहे.