आत्महत्येचे ‘त्याचे’ प्रयत्न पोलीस अधिकार्‍याने ठरवले फोल

0
70

मिरामार समुद्रात आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्लीतील एका युवा बांधकाम उद्योजकास म्हापशाचे पोलीस अधिक्षक उमेश गावकर यांनी पाण्याबाहेर काढून यशस्वीरित्या रोखण्याची घटना काल सकाळी घडली.

याबाबत वृत्त असे की धंद्यात बुडालेला वर्मा (पहिले नाव कळू शकले नाही) नावाचा हा युवा बांधकाम उद्योजक काल सकाळी ६ च्या दरम्यान मिरामार समुद्रात आत्महत्या करण्यासाठी समुद्रात उतरला. याचवेळी किनार्‍यावर जॉगिंगसाठी गेलेले पोलीस उपाधीक्षक महेश गावकर यांनी त्याला पाहिले. सदर युवकाने प्रथम आपला मोबाईल समुद्रात भिरकावला व नंतर धावत समुद्रात गेला. गांवकर यांनी यावेळी त्याच्या मागोमाग धावत त्याला पकडून समुद्रातून बाहेर आणले. पण त्याने गांवकर यांच्या तावडीतून सुटून पळ काढला. गांवकर याना पाण्यात फेकलेला त्याचा मोबाईल मिळाला. त्यावरून त्यांनी वर्मा याच्या पत्नीशी संपर्क साधला. आपले पती आपल्या मित्रांबरोबर गोव्यात आलेले आहेत असे त्याच्या पत्नीने गांवकर यांना सांगितले व त्याच्या मित्रांना आपण कळवले असे सांगितले. काही वेळाने वर्मा याचा आनंद हा मित्र मिरामारला आला व तो त्याला घेऊन गेला. वर्मा याचे बांधकाम व्यवसायात दिवाळे निघाले असल्याचे त्याच्या पत्नीकडून आपणाला कळले असल्याचे गांवकर म्हणाले.
दरम्यान, वर्मा हा प्रचंड मोठी रक्कम मांडवीतील कॅसिनोत हरवून बसल्याचीही चर्चा होती. मात्र, त्याना दुजोरा मिळू शकला नाही.
वर्मा यांचे मित्र आनंद यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यानी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.