Home बातम्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची विजय जोसेफ यांनी घेतली शपथ

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची विजय जोसेफ यांनी घेतली शपथ

0

विजय यांच्यासह इतर नऊ मंत्र्यांनी घेतली शपथ

तमिळगा वेट्री कझगमचे (टीव्हीके) प्रमुख आणि अभिनेता-राजकारणी सी. जोसेफ विजय हे तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी काल रविवारी मुख्यमंत्री पदाची तमिळ भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान राहुल गांधीदेखील उपस्थित होते.

विजय यांच्यासोबत आणखी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ. के.जी. अरुणराज, के. ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी.के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे.
हे सर्व आमदार विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाचे सदस्य आहेत. सद्यस्थितीत, विजय यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात आघाडीतील मित्रपक्षांच्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री होताच, विजय यांनी तत्काळ कामाला सुरुवात केली आणि कागदपत्रांच्या पहिल्या संचावर स्वाक्षरी केली. या आदेशांमध्ये 200 युनिट्स मोफत वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि अमली पदार्थांविरोधात कारवाई यांसारख्या तरतुदींचा समावेश आहे.

शपथविधीप्रसंगी विजय यांनी स्टेडियमवर उपस्थित असलेल्यांचे हात जोडून आभार मानले व ते व्यासपीठावर आले. यावेळी त्यांनी निवडणूक सभेप्रमाणे भाषण द्यायला सुरुवात केली. यावेळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना मध्येच थांबवून फक्त लिहिलेली शपथ तेवढी वाचण्यास सांगितले. त्यानंतर विजय यांनी संमतीदर्शक मान हलवली आणि शपथ वाचली.
तत्पूर्वी, शनिवारी विजय यांनी राजभवनाला भेट दिली आणि टीव्हीके, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम-2, व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांची 121 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे राज्यपाल आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर, राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.

121 आमदारांचा पाठिंबा
विजय यांच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके या पक्षाने, आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. आपल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह, विजय यांच्याकडे 121 आमदारांचा भक्कम पाठिंबा उपलब्ध आहे; तर साध्या बहुमताचा आकडा 118 इतका आहे.
1967 नंतर जवळपास 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच तामिळनाडूला ‘द्रविडवादी नसलेल्या’ पक्षाचा मुख्यमंत्री लाभणार आहे. यापूर्वी, 1963 ते 1967 या काळात काँग्रेस सरकारच्या अंतर्गत एम. भक्तवत्सलम यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.