प्रख्यात चित्रकार लक्ष्मण पै यांचे निधन

0
95

>> काही दिवसांपूर्वीच घेतला होता कोरोना लशीचा पहिला डोस

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गोमंतकीय प्रख्यात चित्रकार, पद्मभूषण लक्ष्मण पै (९५) यांचे दोनापावल येथील राहत्या घरी काल रविवारी संध्याकाळी निधन झाले. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पै यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस नुकताच घेतला होता.

दि. २१ जानेवारी १९२६ साली मडगाव येथे जन्मलेले चित्रकार पै यांचे चित्रकलेच्या क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड योगदान असून त्यांना या क्षेत्रातील ‘मायो मेडल’ ही प्राप्त झाले होते. पॅरीस, लंडन, म्युनिच, स्टूटगार्ट, ब्रीमेन, न्यूयॉर्क, बँकॉक, क्वॉलालंपूर, सिंगापूर, नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा अनेक भागांत त्यांच्या पेंटिंगची प्रदर्शने यशस्वी झाली आहेत. देश-विदेशांतील अनेक चित्र दालनामध्ये त्यांची चित्रे आहेत. पणजी येथील कला महाविद्यालयाच्या उभारणीस पै यांचे मोठे योगदान आहे. या महाविद्यालयाचे ते १९७७ ते ९७ या काळात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. या काळात त्यांनी महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू केले. ते कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी यांचे चाहते होते. त्यांची त्यांनी काढलेली चित्रे न्यूयॉर्क सार्वजनिक ग्रंथालय, बर्लिन म्युझियम, पॅरिस येथील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टस्, मद्रास म्युझियम, नागपूर म्युझियम, पंजाब विद्यापीठ अशा ठिकाणी आर्ट गॅलरीत लावलेली आहेत.

अस्सल देशभक्त
१८ जून १९४६ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगावात गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला. त्यात पै हे सामील झाले होते. त्यावेळी पोर्तुगीजांनी त्यांना पकडले होते. मुंबईमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी गोव्यात येऊन या लढ्यात भाग घेतला होता. १९४३ ते ४७ या काळात त्यांनी त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये फाईन आर्टचे शिक्षण घेतले होते. या परीक्षेत ते प्रथम आल्यामुळे त्यांना १९४७ मध्ये त्यांचा ‘मायो मेडल’ देऊन सन्मान करण्यात आला होता.

विविध पुरस्कारांनी सन्मानीत
केंद्र सरकारने पै यांच्या कलेच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोवा सरकारने पै यांना प्रतिष्ठेच्या गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. ललित कला अकादमीचा पुरस्कार, नेहरू पुरस्कार मिळाला असून त्यांना गतवर्षी श्रीमद् विद्याधिराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून शोक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष्मण पै यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पै यांचे चित्रकला क्षेत्रातील कार्य सदैव स्मरणात राहील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेत्यांकडून दुःख
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पै यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रख्यात चित्रकार लक्ष्मण पै यांच्या निधनाने चित्रकलेच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत चित्रे साकारली, अशा शब्दात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

अखेरचा संदेश
चित्रकार लक्ष्मण पै यांनी गुरुवार ११ मार्च २०२१ रोजी खास चित्र रेखाटून आपला मुलगा आकाश याला सदैव हसत राहण्याचा अखेरचा संदेश दिला.