तरुणाई ः कालची आणि आजची

0
72
  • ज. अ. रेडकर

केवळ पर्यटनाच्या नावाखाली गैर आणि अनैतिक धंदे खपवून घ्यायचे, मुबलक महसूल मिळतो म्हणून या गोष्टीकडे कानाडोळा करायचा हे भयानक चित्र आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात या देशाचा सोमालिया आणि नायजेरिया व्हायला वेळ लागणार नाही.

अलीकडे कोणतेही वर्तमानपत्र उघडले की, अपघात व अपराध यांच्याच बातम्या ठळकपणे दृष्टीस पडतात. अपघातात मृत्यू पावणारे असोत अथवा अपराधात गुंतलेले असोत, त्यात तरुणांची संख्या लक्षणीय असते. एकीकडे कमालीची बेकारी आणि दुसरीकडे कमी श्रमात भरपूर वेतन अशी दोन टोके याला कारणीभूत आहेत.

अज्ञान आणि बेकारीतून व्यसनाकडे वळणारी जशी तरुण पिढी आहे, तशीच उच्च शिक्षित व आयटी क्षेत्रात लठ्ठ वेतन घेणारी तरुणाई प्रत्येक वीक एन्डला रिलॅक्स होण्यासाठी व्यसनाचा आधार घेणारीदेखील आहे. मेडिकल तसेच अभियांत्रिकीसारखे उच्च शिक्षण घेणारे तरुण ड्रग्ज, दारू, धूम्रपान या गोष्टीकडे कसे काय वळतात असा प्रश्‍न पडतो. हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मुलांना अशी व्यसने लवकर घेरतात. कारण तिथे राहणार्‍या मुलांवर कुणाचे नियंत्रण नसते. येथे भेटणारे सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांना व्यसनांची दीक्षा देतात आणि मग हा सिलसिला कायम राहतो.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे घरात आणि समाजात वेगाने घडणारे बदल हे आहे. साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी समाजव्यवस्था धार्मिक प्रवृत्तीची होती. हिंदू कुटुंबात भजन, कीर्तन, पोथी वाचन या गोष्टी घराघरांतून होत असत. पाप-पुण्य याचा पगडा मानवी मनावर होता. घरातून मिळणारे संस्कार, शाळा-कॉलेजमधून मिळणारे शिक्षण, त्यावेळचे ध्येयनिष्ठ, निर्व्यसनी आदर्श शिक्षक यांच्याकडून संस्कारक्षम विद्यार्थी घडत होता. त्याची ध्येयासक्ती गगनाला गवसणी घालणारी असायची. पाठ्यपुस्तकांतून मिळणारे धडे आणि वडीलधार्‍यांचा धाक यातून व्यक्तिमत्त्व घडत होते. शिक्षकांची जरब मुलांवर असायची. त्यामुळे मुले कधी वाकड्या वळणावर गेली नाहीत. एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने घरात वडीलधारी मंडळी बरीच असायची आणि त्या सर्वांची नजर घरातील लहान मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे असायची. काही चुकले तर लगेच कान पकडला जायचा किंवा पाठीत धपाटा बसायचा. वडील, काका, मामा, आजोबा या सगळ्या वडीलधार्‍यांना लहान मुले घाबरून असायची. कारण शिस्तीचे धडे द्यायचे अबाधित अधिकार त्यांना होते. शाळेतील शिक्षकदेखील याच पठडीतील होते. बरे, या कुणाबद्दल कुठे तक्रार करायची सोय नव्हती. सोनाराच्या मुशीतून सोने जसे तावूनसुलाखून चोख निघते तसे मुलांचे चारित्र्य या धाकामुळे शंभर नंबरी सोन्यासारखे तावूनसुलाखून निघालेले असायचे. कुठलेही गैरवर्तन अशा मुलांकडून होत नसे. बालपणी झालेले हे संस्कार जीवनभर टिकून राहायचे. आता काळ बदलला तसे आचारविचार बदलले.
२० वे शतक गतिमान झाले आणि सगळे जीवनचक्रच बदलून गेले. संगणकक्रांती झाली आणि त्या अनुषंगाने अन्य वस्तू घरात आल्या. त्यात टीव्ही, मोबाईल यांचे वेड आबालवृद्धांना लागले. या माध्यमातून होणारे संस्कार मानवी जीवनावर प्रभाव टाकू लागले. शिक्षण पूर्ण झाल्यावर माणूस नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झाला आणि इथेच एकत्र कुटुंबव्यवस्थेचे विघटन व्हायला सुरुवात झाली. एक कुटुंब होते त्याचे एकाहून अधिक भाग होऊ लागले. माणूस जिथे जाईल तिथे त्याने आपला स्वतंत्र आशियाना बनवला. आपली पत्नी, आपली मुले एवढा संसार म्हणजे आपले कुटुंब ही धारणा वाढीस लागली. एकत्र कुटुंबपद्धती आक्रसत गेली आणि अशा विभक्त कुटुंबात जन्माला येणारी मुले अनेक चांगल्या गोष्टींना मुकली. एकत्रित कुटुंबातील वडीलधार्‍यांकडून मिळणार्‍या संस्कारांच्या बाळकडूचा स्त्रोत आटला. आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर मुलांसाठी वेळ देणे त्यांना शक्य होईनासे झाले. मुले नोकरांच्या हवाली करून आई-वडील घराबाहेर; मग कसे होणार सुसंस्कार?
एकटे वडीलच नोकरीला असले आणि आई गृहिणी असली तरी मुलांवर लक्ष देण्यापेक्षा तिचे लक्ष आता मोबाईल, टीव्हीवरील कार्यक्रम, ब्युटीपार्लर, किटी पार्टी याकडेच अधिक! मुलांचा अभ्यास घेणे, त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष पुरवणे, मुले कुणाच्या संगतीत वावरतात हे पाहणे या गोष्टी मागे पडल्या, अगदी इतिहासजमा झाल्या. परिणामी, मुले काय करतील ते खरे अशी परिस्थिती निर्माण झाली. मुलांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्याच्या, त्यांचे हट्ट पुरवण्याच्या नादात आपण एक पिढी बिघडवतो आहोत याचे भान आता पालकांना उरलेले नाही.

आपल्या बालपणी जे सुख आपल्याला घेता आले नाही ते आपण आपल्या मुलांना देत आहोत, अशा प्रकारची स्पष्टीकरणे आजच्या पालकांकडून ऐकू येतात. ङ्गाजील लाड करण्याने मुले हट्टी, दुराग्रही आणि स्वैर बनतात हे विसरले जाते. हीच मुले मोठी झाली की ती आपल्या आई-वडिलांना जुमानीत नाहीत, आपल्या मनाला येईल ते करतात आणि नंतर नको ते होऊन बसते. अलीकडेचे आङ्गताभ-श्रद्धा प्रकरण हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अशी ही हाताबाहेर गेलेली मुले गुंड, मवाली, बेजबाबदार आणि स्वैर बनतात. त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा कंपू त्याच मुशीतून तयार झालेला असतो. यातून निर्माण होते ती चंगळवादी संस्कृती! नशा आणणार्‍या मादक द्रव्यांचे सेवन, सिगारेटची धूम्रवलये, गुटका चर्वण, रात्री-बेरात्री चालणार्‍या रेव्ह पार्ट्या यांची चटक त्यांना लागते. तारुण्याचा कैङ्ग म्हणून बेङ्गाम ड्रायव्हिंग, मुलींची छेडछाड, त्यांच्यावर अतिप्रसंग, या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. या चैनीसाठी पैसा हवा असला तर त्यासाठी मग चोरी, लबाडी, ङ्गसवाङ्गसवी, खून, मारामार्‍या अशांसारखे गुन्हेगारी मार्ग चोखाळले जातात. अशाच एखाद्या घोर अपराधात मुलगा किंवा मुलगी अडकते तेव्हा पालकांचे डोळे उघडतात. पण वेळ केव्हाच निघून गेलेली असते!

वयवर्षे १३ ते १९ या वयाला इंग्रजीत ‘टीन एज’ म्हणतात. या ‘टीन एज’मध्ये मुले पौगंडावस्थेत असतात. चांगले वाईट याची जाण या वयात असत नाही (मुलींच्या बाबतीत सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात). या वयात मुले अनुकरणप्रिय असतात. याच वयात त्यांना जपायला हवे. २० ते २५ वयाच्या गटातील मुलांना गद्धेपंचविशीतील तरुणपिढी म्हणून ओळखली जाते. कारण या वयात त्यांना पोक्तपणा आलेला नसतो, पण तारुण्याचा कैङ्ग डोक्यात चढलेला असतो. या वयात ही तरुण मुले गैरमार्गाने वाहवत जाण्याची दाट शक्यता असते.

याला सरकारदेखील काही अंशी जबाबदार आहे. याचे कारण म्हणजे, शैक्षणिक धोरण, त्यावर आधारित व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी यांचे त्रैराशिक सरकारला योग्य प्रकारे हाताळता आलेले नाही. काळानुरूप शैक्षणिक धोरण कृतिशील होणे आवश्यक होते. एखादा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याआधारित स्वतंत्र व्यवसाय करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या ठिकाणी निर्माण व्हायला हवी. तांत्रिक अभ्यासक्रम काही प्रमाणात रोजगार मिळवून देऊ शकतात, पण अन्य प्रकारचे सर्वसाधारण शिक्षण विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण बनवीत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुळात आपला देश शेतीप्रधान आहे. शेती हा जागतिक बाजारपेठ मिळवून देणारा सर्वात मोठा व्यवसाय आहे. जगाची भूक भागविण्याची गरज शेतमाल उत्पादनाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही याचा विचार झाला नाही. स्वस्त दरात किंवा मोङ्गत धान्यपुरवठा सरकार करते हे पाहून शेतकर्‍यांनी शेतीच करणे सोडून दिले. पडीक ठेवलेली शेतजमीन मोठा भाव मिळतो म्हणून धनदांडग्यांना विकून टाकली. राजकीय नेत्यांनी आणि धनवंतांनी त्याजागी मोठी तारांकित हॉटेल्स, मॉल्स किंवा रहिवासी कॉम्प्लेक्स उभी केली. कॉंक्रीटची जंगले उभी राहिली. औद्योगिक क्षेत्राकडे अधिक लक्ष पुरवले गेले आणि शेती व्यवसायाकडे साङ्ग दुर्लक्ष झाले. शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना शेती करणे कमीपणाचे वाटू लागले. त्यांना हवी असते सरकारी नोकरी. परंतु शिकलेले अधिक आणि सरकारी नोकर्‍या मर्यादित असे व्यस्त प्रमाण! मग सर्वांना कशी मिळणार सरकारी नोकरी? शेती मागे पडली, नोकरी नाही, यामुळे शिक्षण घेतलेले हजारो तरुण बेकारीच्या दरीत ढकलले गेले. या बेकारीला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्याच्याही घटना आहेत. काही नाईलाजास्तव वाईट धंद्यात घुसले तर काही चोर्‍या-लबाडीत गुंतले.

समुद्रकिनारपट्टी भागात अनैतिक धंद्यांचे पेव ङ्गुटलेले आज दिसते. ड्रग्जचा व्यापार, बारडान्स, कॅसिनो, मसाज पार्लरच्या आड वेश्याव्यवसाय अशांसारख्या अनैतिक व्यवसायांनी जोर धरला आहे. देशी-विदेशी पैसेवाल्या लोकांनी या अनैतिक धंद्यात आपले बस्तान बसवले आहे. आपली तरुण पिढी त्यांच्या जाळ्यात अलगदपणे गुरङ्गटली जाऊ लागली आहे. ड्रग्ज हा प्रकार तर शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. ही धोक्याची घंटा आहे. केवळ पर्यटनाच्या नावाखाली गैर आणि अनैतिक धंदे खपवून घ्यायचे, मुबलक महसूल मिळतो म्हणून या गोष्टीकडे कानाडोळा करायचा हे भयानक चित्र आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात या देशाचा सोमालिया आणि नायजेरिया व्हायला वेळ लागणार नाही.