डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयित पोलिसांना शरण

0
47

पर्वरी येथील डॉ. अमोल तिळवे या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरना मारहाण केल्याप्रकरणातील प्रमुख संशयित मिनेश नार्वेकर हा स्वतःहून पर्वरी पोलिसांना शरण आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाला समाजमाध्यमातून प्रसिद्धी लाभली होती. सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि खासगी डॉक्टरांनी पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन पोलिसांना निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्यानुसार त्याच दिवशी मारहाण प्रकरणात सामील झालेल्या तिघांना पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले होते. काल मंगळवार मिनेश हा स्वतः पोलिसांना शरण आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिनेश नार्वेकर याने डॉ. तिळवे यांनी निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे बाळ दगावले. त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करावा असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. मी पळून गेलो नव्हतो तर अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो असे त्याने पुढे सांगितले. निरीक्षक निनाद देऊलकर या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.