‘डेल्टा प्लस’वर कोविड लस प्रभावी ठरेल

0
95

कोरोनाचे उत्परिवर्तीत रूप असलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या विषाणूवर कोविड लस प्रभावी ठरत नाही, हे खरे नसून डेल्टा विषाणूवर कोविडची लस प्रभावी ठरली आहे. त्यामुळे डेल्टा प्लसवरही ती निश्‍चितच प्रभावी ठरेल असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल अनौपचारिकरित्या काही पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकांनी नको त्या अफवांवर विश्‍वास ठेवून कोविडची लस घेणे टाळू नये, असा सल्ला देतानाच ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांच्यासाठी कोविड जीवघेणा ठरला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘डेल्टा प्लस’चे रुग्ण शेजारच्या महाराष्ट्रात सापडू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमच्यासाठी ती चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे भविष्यात ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झालेले रुग्ण विनाविलंब शोधता यावेत यासाठी गोमेकॉ सिक्वेन्सिंग मशीन खरेदी करणार असून हे मशीन खरेदी केल्यानंतर कोरोना विषाणूंचे नमुने चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागणार नसल्याचे बांदेकर यांनी स्पष्ट केले.

‘डेल्टा प्लस’ हा वेगाने संसर्ग पसरविणारा आहे हे सिद्ध झाले असल्याचे मान्य करतानाच त्याचा संसर्ग हा अतिगंभीर स्वरूप धारण करतो की काय हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे बांदेकर यांनी पुढे स्पष्ट केले.

राज्यात डेल्टा प्लसचा रुग्ण नाही
कोरोनाचे उत्परिवर्तीत रूप असलेल्या डेल्टा प्लस विषाणूची चाचणी करण्यासाठी लागणारे ‘सिक्वेन्सिंग’ मशीन गोमेकॉ खरेदी करणार आहे. राज्यात अजून तरी ‘डेल्टा प्लस’चा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती डॉ. बांदेकर यांनी दिली. राज्यात ‘डेल्टा’चे रुग्ण सापडले आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र अद्याप तरी राज्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडला नसल्याचे काल त्यांनी स्पष्ट केले. येथून पुण्यातील प्रयोगशाळेत जे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी काही नमुन्यांत डेल्टा विषाणू सापडला. मात्र एकाही नमुन्यात अद्याप तरी ‘डेल्टा प्लस’ विषाणू सापडला नसल्याचे ते म्हणाले.

जूनमध्ये कोरोनाने राज्यात ३२७ बळी
चोवीस तासांत ६ मृत्यू, २४० बाधित

राज्यात जून महिन्यात नवे ११,०२३ बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण ३२७ जणांचा बळी गेला आहे. तसेच, २३ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. मे महिन्यात ६४ हजार ६१४ बाधित रुग्ण आढळून आले होते.

गेल्या चोवीस तासांत नवीन २४० रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, आणखी ६ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या २ हजार २७४ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३,०५४ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८० टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात चोवीस तासांत ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या बळींच्या संख्येत घट होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण बळींची संख्या ३,०५४ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत २४० रुग्ण
राज्यात गेल्या चोवीस तासांत ४२०६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २४० नमुने बाधित आढळले. चोवीस तासांत इस्पितळांमधून १९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ६८९ एवढी झाली आहे.
फोंडा येथे सर्वाधिक १४५ सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे. मडगावात १३८ साखळी येथे १२१ रुग्ण आहेत. इतर भागांतील सध्याच्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.

२०१ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी २०१ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ३६१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८० टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २१३ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.

२४ तासांत २७ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. चोवीस तासांत नव्या २७ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.