आगामी विधानसभा निवडणूक रिंगणातील जीत आरोलकर ठरले पहिले उमेदवार

0
130

गोवा विधानसभा निवडणुकीत अद्याप आठ महिन्यांचा काळ बाकी असतानाच मगो पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा विक्रम काल जीत आरोलकर यांनी केला. असा विक्रम करणारे आरोलकर हे राज्यातील पहिलेच उमेदवार ठरले आहेत.

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बुधवारी जीत आरोलकर यांच्या नावाची घोषणा करताना ते मगो पक्षाचे मांद्रे मतदारसंघातील उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. काल फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांनीच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची उमेदवारी आता निश्‍चित मानली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीतील ते पहिले उमेदवार ठरले आहेत.

मगोने अजून तरी कुणाशीही युतीसंदर्भात चर्चा केलेली नाही. मात्र, प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचा पर्याय खुला ठेवला असल्याचे यावेळी ढवळीकर यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत पक्ष भाजपशी युती करणार नसल्याचे ते म्हणाले. मगो आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्यामुळे धास्ती घेतलेल्या व मगोला विरोध करणारे आपमधील काही नेते मगो पक्ष फुटला असल्याच्या अफवा पसरवित असल्याचा आरोपही ढवळीकर यांनी यावेळी केला.
दरम्यान, काल दै. नवप्रभाशी बोलताना ढवळीकर यांनी, आपले उमेदवारही पक्ष १५ जुलैनंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले.