हा जिवाशी खेळ

0
144

कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशातील प्रत्येकजण धडपडत असताना केवळ पैशांमागे लागलेल्या काही राक्षसी प्रवृत्तींनी वेळोवेळी डोके वर काढीत वेगवेगळ्या बनावट गोष्टी करीत जो धुमाकूळ घातला तो माणुसकीची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. बनावट सॅनिटायझर, बनावट रेमेडेसीवीर, बनावट लस अशा प्रकारच्या बनावटगिरीमध्ये गुंतलेली ही माणसे ‘माणूस’ म्हणवून घेण्यासही पात्र नाहीत. मुंबईमध्ये अलीकडेच कांदिवलीच्या एका नामांकित हाऊसिंग सोसायटीत बनावट लसीकरण करणारी एक टोळी उजेडात आली. त्या प्रकरणात काही डॉक्टरांनाही अटक झाली. त्या पाठोपाठ कोलकत्त्यामध्येही आयएएस अधिकारी असल्याचे भासवून लसीकरण शिबिरे भरवून हजारो जणांना बनावट लस देणारा देवंजन देव नावाचा एक महाभाग सापडला. एकीकडे कोरोनाशी झुंजणार्‍या समाजाला मदतीचा हात देण्यासाठी माणुसकीची परमोच्च उदाहरणे घालून देत प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून हजारो माणसे पुढे सरसावत असताना दुसरीकडे मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला चटावलेले हे दानव अशा प्रकारच्या बनावटगिरीतून जनतेच्या प्राणांशी जो खेळ मांडून राहिले त्याची निर्भत्सना आणि निषेध करावा तितका थोडाच आहे.
मुंबई काय किंवा कोलकाता काय, ह्या महानगरांतून बनावट लसीकरणाची जी प्रकरणे उजेडात आली ती त्या नागरिकांच्या जिवावर बेतू शकली असती. गुजरातमध्ये पाठवल्या गेलेल्या लशीच्या रिकाम्या बाटल्यांत सलाईनचे पाणी भरून मुंबईत रुग्णांचे ‘लसीकरण’ केले गेले. कोलकत्यात तर लशीच्या ऐवजी घातक अँटिबायोटिक्सचा वापर केला गेला. त्याचे दुष्परिणामही काहींना भोगावे लागले आहेत. आता ज्या दुर्दैवी निष्पाप नागरिकांना ह्या बनावट लसीकरणाचा फटका बसला आहे, त्यांची अँटिबॉडी चाचणी करून गरज भासल्यास त्यांना पुन्हा लस दिली जाणार आहे. ह्या सगळ्यामध्ये जो मनस्ताप ह्या नागरिकांना भोगावा लागला, ज्या ताणतणावातून जावे लागले त्याचे काय?
संबंधित गुन्हेगारांनी केलेला हा अपराध क्षुल्लक स्वरूपाचा मुळीच नाही. एखाद्याच्या हत्येचा पद्धतशीर प्रयत्न करावा अशा स्वरूपाचा हा गंभीर गुन्हा आहे आणि ह्या सगळ्या गुन्हेगारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवून त्यांना कठोरातील कठोर सजा दिली गेली पाहिजे. मध्यंतरी कोरोनाची लाट उफाळली असताना रेमेडेसीवीर इंजेक्शनची मागणी भलतीच वाढली होती. त्याचा फायदा उठवत बनावट रेमेडेसीवीर इंजेक्शन बनवणारा एक मोठा कारखानाच गुजरातमध्ये सापडला होता. अशा गोष्टींमध्ये गुंतलेले गुन्हेगार हे माणूस म्हणण्यास तरी पात्र आहेत काय? औषधे परस्पर बाहेर विकून इस्पितळातील रुग्णांना बनावट इंजेक्शन देणार्‍या परिचारिकेचे एक प्रकरणही मध्ये बाहेर आले होते. अशा एखाद्या परिचारिकेपासून संघटित टोळ्यांपर्यंत जी माणसे अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये गुंतलेली आहेत, त्यांचा अपराध एकाच जातकुळीचा आहे. बनावट लसीकरण ही तर अशाच प्रकारच्या निर्ढावलेल्या सैतानांची पुढची कामगिरी आहे.
केंद्र सरकारने लसीकरणासंदर्भात मध्यंतरी जो घोळ घातला तोही ह्या सगळ्या बनावट लसीकरणास कारणीभूत ठरला आहे. केंद्र सरकार जर वेळीच सर्वांसाठी लस उपलब्ध करू शकले असते तर अशा प्रकारच्या बनावटगिरीला संधीच मिळाली नसती. सरकारी केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने ज्याला त्याला मिळेल तेथून लस घ्यायची होती. त्याचाच फायदा ह्या महाभागांनी उठवला आणि बनावट लसीकरणाचे महोत्सव भरवून लूट केली. नुसती आर्थिक लूटच केली असे नाही तर बनावट ‘लस’ देऊन त्यांच्या प्राणांशी खेळ मांडला. विशेष म्हणजे काही ठिकाणी अशा महोत्सवांमध्ये राजकारण्यांनाही गुंतवण्यात आल्याचे दिसून आले आहे. कोलकत्त्यातील बनावट लस छावणीमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या एका खासदार महिलेलाही सामील करून घेण्यात आले होते व तिलाही बनावट लस देण्यात आली. मुंबईतील प्रकरणात विशेष म्हणजे बनावट लस दिल्या गेलेल्यांना कोविन पोर्टलवरून लस दिल्याची प्रमाणपत्रेही दिली गेली आहेत. त्यावर वेगवेगळ्या इस्पितळांची नावे आढळल्याने लस घेणार्‍यांत संशय बळावला आणि हे प्रकरण उजेडात आले. अशी आणखी किती प्रकरणे अद्याप गुलदस्त्यात असतील हे सांगता येत नाही, कारण हा देश खेड्यापाड्यांमध्ये वसला आहे. पुरेसे शिक्षण न झालेली भोळीभाबडी खेडवळ जनता देशात मोठ्या प्रमाणावर आहे. लसीकरणामध्ये कुठे काय घोळ झाला हे कोणीतरी आवाज उठवल्याविना कळणारही नाही. कळले तरी आपल्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरणे दडपण्याकडेच कल राहील. निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचण्यांचे बनावट दाखले देणार्‍या टोळ्याही सर्वत्र सक्रिय झाल्या आहेत. ह्या अशा गोष्टींवर सरकारने अधिक बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे. हा सगळा निष्पापांच्या जिवाशी मांडलेला खेळ आहे आणि त्यामुळे तितक्याच गांभीर्याने त्याकडे पाहून कठोरातील कठोर सजा दिली गेली पहिजे.