डिलायला लोबो शिवोलीतूनच लढणार; प्रचाराला सुरुवात

0
13

>> मंत्री मायकल लोबो ठाम; वेळप्रसंगी पत्नी अपक्ष निवडणूक लढणार

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो या शिवोली मतदारसंघातूनच विधानसभेची निवडणूक लढविणार असून, मंत्री लोबो यांच्या उपस्थितीत काल डिलायला लोबो यांनी देवदेवतांचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी मायकल लोबो हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले असून, प्रचाराला सुरुवात करून त्यांनी एक प्रकारे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे भाजपला दाखवून दिले आहे.

डिलायला लोबो यांनी निवडणूक प्रचाराला प्रारंभ करण्यापूर्वी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर, श्री गणेश, श्री सातेरी आदी देवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच पर्रा येथील चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. लोबो यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्याचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवोली मतदारसंघात प्रचार कार्यालय देखील सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो हे आपली पत्नी डिलायला लोबो यांना शिवोली मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत; त्यात त्यांना अद्याप यश आलेले नसले, तरी डिलायला लोबो या शिवोलीतूनच लढणार यावर ते ठाम आहेत. शिवोलीतून दयानंद मांद्रेकर हे भाजपच्या उमेदवारीवर दावा करत आहेत, तर दुसर्‍या बाजूला आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी मायकल लोबो यावर भाजपवर विविध प्रकारे दबावतंत्राचा वापर करत आहेत. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतेच संकेत मिळत नसल्याने कालपासून डिलायला लोबो यांच्यासह मायकल लोबोंनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिवोली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरले आहे, असे डिलायला लोबो यांनी काल प्रचारावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, डिलायला लोबो पर्रा पंचायतीच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.

उमेदवारी मिळण्यापूर्वीच मतदारसंघात प्रचार सुरू
डिलायला लोबो या कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मंत्री मायकल लोबो यांनी त्यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून त्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

शिवोली मतदारसंघ विकासाच्याबाबतीत मागे राहिला आहे. मतदारांनी डिलायला लोबो यांना एक संधी दिल्यास मतदारसंघाचा निश्‍चितच कायापालट होईल.

  • मायकल लोबो, कचरा व्यवस्थापन मंत्री