धोक्याची घंटा

0
20

देश नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार या उत्सवी वातावरणातही जनतेच्या स्वास्थ्याप्रती किती गंभीर आहे हे दर्शवीत काही महत्त्वपूर्ण घोषणा नाताळच्या रात्री आकस्मिकरीत्या केल्या. हे धक्कातंत्र हा मोदींच्या कार्यपद्धतीचा विशेष राहिला आहे, परंतु ज्या घोषणा त्यांनी केल्या आहेत, त्या निश्‍चितपणे आजच्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक होत्या यात शंका नाही. पंधरा ते अठरा वयोगटाचे लसीकरण तीन जानेवारीपासून सुरू होईल, तर कोरोना योद्‌ध्यांना खबरदारीखातर अतिरिक्त लस देण्यास दहा जानेवारीपासून दिली जाणार आहे. साठ वर्षांवरील व्यक्तींना डॉक्टरच्या शिफारशीने अतिरिक्त डोस घेता येऊ शकेल. या डोसला बुस्टर डोस म्हणणे पंतप्रधानांनी टाळले. त्याऐवजी त्याला खबरदारीखातरचा डोस संबोधले आहे. या सगळ्या उपाययोजनांतून देश पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या प्रकोपाचा सामना करण्यास सज्ज झाला आहे हा संदेशच पंतप्रधानांनी जणू दिलेला आहे. नव्या ओमिक्रॉन संकटामुळे आता काय होणार या चिंतेत असलेल्या देशवासीयांसाठी केंद्र सरकार सुस्तावलेले नाही, तर जागरूक आहे हा फार मोठा दिलासा पंतप्रधानांच्या या संबोधनातून मिळाला आहे.
देशात पुन्हा एकवार कोरोना वाढत चालला आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने ही वाढ होताना दिसते आहे. गोव्यातही सर्वत्र लग्नसराई, ख्रिसमस, पर्यटन, नववर्ष आणि निवडणुकांचा धुमाकूळ सुरू झाला आहे आणि गेले काही दिवस सतत कोरोना रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ झालेली आहे. होणार्‍या कोरोना चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे दिसते आहे. राज्याचा एकूण टेस्ट पॉझिटिव्हिटी दर २.२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या पाचशेच्या घरात शिरू लागली आहे आणि सध्याची सर्वत्र दिसणारी बेफिकिरी लक्षात घेता ही संख्या अधिक वाढत जाण्याची भीती आहे. संपूर्ण देशात आज हीच परिस्थिती आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरियंट संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात जेमतेम होती, परंतु या आठवड्यापर्यंत ती साडेचारशेचा आकडा पार करून गेली आहे, त्यावरून ओमिक्रॉन संसर्गाचा वेग लक्षात येतो. जगभरातील भीषण परिस्थिती पाहिली तर भारतातही हे लोण येऊ घातले आहे हे विसरून चालणार नाही.
दुसर्‍या लाटेने जो हाहाकार माजवला तो अजून देश विसरलेला नाही. त्यामुळे आता ह्या तिसर्‍या लाटेत काय होणार याची चिंता खरे तर जनतेने करायला हवी, परंतु ज्या निर्विकारपणे लोक कोरोना त्रिसूत्रीला हरताळ फासताना दिसत आहेत ते पाहता चिंता वाटते. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत चाललेली असताना स्पष्ट दिसत असूनही जी खबरदारी घ्यायला हवी ती घेताना बहुसंख्य जनता दिसत नाही. परदेशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य असल्याचा समज अनेकांनी करून घेतलेला आहे. परंतु विदेशांतील आरोग्य यंत्रणा आणि आपल्याकडील आरोग्य यंत्रणा यांची तुलना होऊ शकत नाही. उद्या आपल्याकडील रुग्णसंख्या वाढत गेली तर आपली आरोग्य यंत्रणा योग्य उपचार करण्यासाठी पुरेशी ठरणार काय? एकशे तीस कोटी जनतेचा हा देश आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशातील वैद्यकीय सज्जतेचा जो तपशील दिला तो पाहिला तर ती आपल्या लोकसंख्येच्या एक टक्काही नाही. ही सगळी वस्तुस्थिती विचारात घेता ‘प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर’ हाच मंत्र जनतेने स्वतःहून अवलंबिणे जरूरी आहे.
कोरोनातून तावून सुलाखून देशाची अर्थव्यवस्था सुधारू लागली होती. गेल्या दिवाळीतील खरेदीचा धडाका लक्षात घेता कोरोनाचे दुष्टचक्र संपले असा दिलासा देशाला मिळाला होता. परंतु सध्याचे चित्र पाहिले तर पुन्हा निराशेचे ढग नववर्षाच्या आधीच देशावर दाटू लागले आहेत. सरकार काही प्रत्येकाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. ज्याने त्याने स्वतःच खबरदारी घेणे अधिक आवश्यक आणि उपयुक्त ठरू शकते. परंतु ज्या बेफिकिरीने सर्व व्यवहार चालले आहेत ते पाहाता एकेका व्यक्तीची चूक ही भोवतालच्या शेकडो लोकांचा जीव संकटात टाकू शकते. राज्याची प्रशासन यंत्रणाही अधिक कार्यक्षम झाली पाहिजे. दुर्दैवाने गोव्यात सध्या निवडणुकांचा माहौल आहे. इतर राज्यांत रात्रीच्या संचारबंदीसारखे उपाय सुरू झाले आहेत, परंतु गोव्यात सरकार नववर्षाचा हलकल्लोळ ओसरेपर्यंत सामाजिक निर्बंध लागू करू इच्छित नाही. पण या आठवड्यात राज्यात चालणारा धुमाकूळ जनतेच्या जीविताशी खेळ मांडणार नाही ना याचा विचार व्हायला हवा. नववर्ष आनंदाचे सौख्याचे जायला हवे असेल तर त्याच्या शुभेच्छा देण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेणे अधिक उपयोगी ठरेल.