कोरोना नियमांना पर्यटकांकडून हरताळ

0
10

>> नियमांचे सर्रास उल्लंघन; संसर्ग वाढण्याची भीती

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मोठ्या संख्येने देशी पर्यटक दाखल होत आहेत. राज्यातील समुद्र किनारे आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर या पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पर्यटकांकडून कोविड नियमांचे पालन केले जात नाही. सामाजिक अंतर न पाळता विनामास्क फिरणारे पर्यटक सर्रास दिसून येत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे.

राज्यातील समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळे सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजू लागली आहेत. तसेच नाताळ व नववर्षानिमित्त हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी कोविड नियमावलीचा फज्जा उडत आहे. मास्क केवळ नावापुरताच सोबत बाळगला जात आहे. त्याचा वापर होताना दिसत नाही. तसेच सामाजिक अंतराचे सुद्धा पालन केले जात नाही. सरकारी पातळीवरून कोविड नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसत नाही.

देशी पर्यटक आपली वाहने घेऊन येत असल्याने रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. पणजी शहरात वाहन पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच किनारी भागात सुध्दा वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून सोमवारी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य खाते आणि पर्यटन खात्याकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.

सक्रिय कोरोना रुग्ण
संख्या साडेचारशेनजीक

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४४९ एवढी झाली आहे, तर कोरोना बळींची एकूण संख्या ३५१९ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत १०७३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २५ नमुने बाधित आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे दिवसभरात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.३२ टक्के एवढे आहे.