नागरिकाची 90 लाखांची फसवणूक
गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने पणजीतील एका नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 90 लाख 85 हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मलप्पुरम-केरळ येथील मोहम्मद रशीक पुलिक्कल (21) याला अटक केली.
पणजीतील एका नागरिकाला वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन करून संशयिताने आपण ‘ट्राय’ आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवले. तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर झाला असून, तुमचा एका प्रसिद्ध व्यक्तीसोबत मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा बनाव त्यांनी रचला. त्यानंतर त्या नागरिकाला तथाकथित ‘डिजिटल अरेस्ट’ खाली अटक केली जाणार असल्याची भीती दाखवली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 90 लाख 85 हजार रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम खात्यात वळवली.
या फसवणूक प्रकरणी 23 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती संशयित आरोपी केरळमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केरळ येथे धाव घेऊन संशयित मोहम्मद रशीक याला ताब्यात घेतले.
संशयित आरोपीच्या तपासणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या बँक खात्यात 5 लाख रुपये जमा झाले होते, जे नंतर इतर साथीदारांच्या खात्यात वळवण्यात आले. हेच बँक खाते कर्नाटक आणि गोव्यातील इतर दोन सायबर फसवणूक प्रकरणांशी जोडलेले असून, त्या प्रकरणांमधील एकूण फसवणुकीचा आकडा 2 कोटी 10 लाख रुपयांच्या घरात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर तपास करीत आहेत.