>> बायडन २३८ तर ट्रम्प यांची २१३ जागांवर आघाडी
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस अजूनही कायम असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडन यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही राज्यांचे निकाल अद्याप हाती आलेले नाहीत. रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार ५३८ जागांपैकी बायडन यांच्याकडे २३८ तर ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल मते आहेत. बहुमताचा आकडा २७० आहे.
दरम्यान, फ्लोरिडा, टेक्सास ही मोठी राज्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकल्यानंतर बायडन यांनी एरिझोनामध्ये बहुमत मिळवत ट्रम्प यांच्यावर मात केली.
एरिझोनामध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे. या राज्यात ११ इलेक्टोरल मते आहेत. दोन मोठी राज्ये ट्रम्प यांच्याकडे गेल्यानंतर बायडन यांच्यासाठी एरिझोनाचा विजय आवश्यक होता. २०१६ मध्ये एरिझोनातून ट्रम्प यांनी विजय मिळवला होता. पेन्सिलवेनिया, विसकॉनसिन या दोन महत्त्वाच्या राज्यांसह अजून सात राज्यांचा निकाल आलेला नाही.
डेलावर, या आपल्या गृहराज्यासह बायडन यांनी एकूण २० राज्यांत विजय मिळवला आहे. कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन या महत्त्वाच्या राज्यात त्यांनी विजय मिळवला आहे. मंगळवारी १० कोटीपेक्षा जास्त मतदारांनी अमेरिकेत मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, ट्रम्प यांनी मतमोजणीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला तर बायडन यांच्या कायदेशीर टीमने न्यायालयीन लढाईस सज्ज असल्याचे म्हटले आहे. मतमोजणी सुरू असताना आरोप प्रत्यारोप सुरूच असून डेमोक्रॅटीक पक्षाने मतमोजणीत गोंधळ केला असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असून याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पिछाडीवरून ट्रम्प यांची मुसंडी
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर होते. ट्रम्प प्रथम बायडन यांच्यापेक्षा जवळपास शंभरहून अधिक इलेक्टोरल मतांनी पिछाडीवर होते. तमात्रत्यांनी जोरदार मुसंडी मारत चुरशीची लढत दिली आहे. फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. फ्लोरिडामध्ये २९ इलेक्टोरल मते आहेत. सध्या बायडन यांनी एरिजोना, मिनेसोटा, वर्जिनिया आणि कोलराडो या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आठ राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर असून ट्रम्प यांनी विजयाचा विश्वास असल्याचे म्हटले आहे.