आयआयटीसाठी फर्मागुढीत जमीन ः सुदिन ढवळीकर

0
249

>> फर्मागुढीत प्रकल्प उभारण्याची सरकारला सूचना

आयआयटीसाठी फर्मागुढी येथे १० लाख चौ. मी. एवढी जमीन उपलब्ध असून मेळावली येथील जनतेचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प फर्मागुढी येथील पठारावर उभारावा अशी सूचना मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सरकारला केली. त्यासाठी सरकारला बांधकामासाठी चटई क्षेत्र तेवढे वाढवून द्यावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा आयआयटी प्रकल्प फार्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जवळ उभारणे शक्य आहे ही बाब आपण दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याही लक्षात आणून दिल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

नरकासुर स्पर्धा व सनबर्न नको
युरोपीयन राष्ट्रांत कोरोनाची दुसरी लाट आलेली असून ब्रिटनने लॉकडाऊनची तयारी केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर आम्हीही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सरकारने सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबाबत फेरविचार करावा. तसेच यंदा नरकासुर स्पर्धांच्या आयोजनावरही बंदी घालावी. या स्पर्धांचे आयोजन केले नाही तर काहीही नुकसान होणार नसल्याचे ढवळीकर म्हणाले.

जिल्हा पंचायतीत १७ उमेदवार
येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो पक्ष १७ उमेदवार उतरविणार असून २ अपक्षांना पाठिंबा देणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.
५ दिवसांचे विधानसभा
अधिवेशन घेणे शक्य
सरकार आता विद्यालये सुरू करू पाहत असून कॅसिनो व सनबर्नसारखे संगीत महोत्सवही करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे त्यामुळे आता सरकारने लोकांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी ५ दिवसांचे अधिवेशनही आयोजित करावे, असे ढवळीकर म्हणाले.

पाडव्यापासून मगोची पुनर्बांधणी
मगो पक्षाच्या पुनर्बांधणीचे काम गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हाती घेण्यात येणार असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. गोवा मुक्तीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या मगो पक्षाने गोव्यात विकासाचा भक्कम पाया घातला. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस व भाजपने राज्याची वाताहत केली. त्यामुळे आता राज्यातील जनतेने सारासार विचार करून मगो पक्षाला पुन्हा एकदा सत्तास्थानी आणावे असे आवाहन त्यांनी केले. येत्या विधानसभा निवडणुकीत मगो चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून कॉंग्रेस तसेच भाजपबरोबर युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ढवळीकर म्हणाले की, एखाद्या पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात मोठ्या एकेरी पक्षाला पाठिंबा द्यावा लागतो. नव्याने निवडणुका घ्याव्या लागू नयेत यासाठी ते करावे लागते. यावेळी लोकांनी मगोच्या २१ आमदारांना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणार्‍या कॉंग्रेस सरकारनेच केंद्रात सत्तेत असताना हा प्रकल्प तयार केला होता. यासाठी कर्नाटकात यापूर्वीच ३४० कि. मी.पर्यंत काम पूर्ण झाले आहे तर गोव्यात ५६ कि. मी. चे काम होऊ घातले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एम्‌पीटीवर ११ दशलक्ष टन पेक्षा कोळसा आणण्यास देणार नाहीत असे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी जे म्हटले आहे त्याचा समाचार घेताना एमपीटीला कोळसा आणण्यासाठी काब्राल यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे ढवळीकर म्हणाले.

१९ आमदारांची वेगळी चूल?
सत्ताधारी भाजपच्या आमदारांपैकी १९ आमदार एकत्र येऊन वेगळी चूल मांडू पाहत असल्याचा गौप्यस्फोट ढवळीकर यांनी केला. हे आमदार वेगळे सरकार स्थापन करू पाहत आहेत की सरकार पाडू पाहत आहेत असे विचारले असता त्याविषयी आपणाला कोणतीही कल्पना नसल्याचे ते म्हणाले. हे आमदार तुमच्याही संपर्कात आहेत काय असे विचारले असता अशा लोकांबरोबर हात मिळवणी करण्यास आपणाला रस नसल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.