टॅक्सीवाल्यांना सरकार मोफत डिजिटल मीटर देणार ः मुख्यमंत्री

0
39

राज्यातील टॅक्सीवाल्यांना सरकार मोफत डिजिटल मीटर देणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. टॅक्सी मीटरच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. टॅक्सीला मीटर बसवणे सक्तीचे करण्यात आले असून सरकार हे मीटर टॅक्सीवाल्यांना मोफत देणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील २० हजार टॅक्सीवाल्यांना मोफत मीटर देण्यासाठी सरकारला ३४ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली. गोवा माईल्सच्या टॅक्सीवाल्यांनाही आपल्या टॅक्सीत मीटर बसवण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. राज्यात टॅक्सी चालवण्यासाठी टॅक्सीवाल्यांकडे १५ वर्षांचा निवासी दाखला असायला हवा अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

गेल्या बर्‍याच काळापासून टॅक्सीवाल्यांनी मीटरची सक्ती असतानाही ते बसवण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सरकारने मीटर बसवण्यासाठी पैसे द्यावेत अशी मागणी आता या टॅक्सीवाल्यांनी केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.