टी-२० क्रमवारीत मलानची अव्वल स्थानी झेप

0
95

>> बाबरची दुसर्‍या क्रमावर घसरण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मलानने (९७७ गुण) क्रमवारीत अग्रस्थानावर झेप घेतली आहे. पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमची दुसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. मलानने इंग्लंडकडून सर्वाधिक १२९ धावा करीत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने पहिल्या लढतीत ४३ चेंडूत ६६ धावांची तडफदार खेळी करीत सामनावीराचा पुरस्कारही प्राप्त केला होता. त्याचा फायदा त्याला क्रमवारीतील बढतीत झाला असून त्याने ४ स्थानांसह अग्रक्रमवर झ्रेप घेतली आहे. बाबर आझमला (९६० गुण) एका स्थानाचे नुकसान झाले असून त्याला पहिले स्थान गमवावे लागले आहे.

अव्वल दहात भारताच्या दोघ फलंदाजांनी आपले स्थान राखले आहे. लोकेश राहुलला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो २र्‍या स्थानावरून चौथ्या स्थानवर घसरला आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो १०व्या स्थानावरून ९व्या स्थानावर पोहोचला आहे.

काल बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांनीही मोठी झेप घेतली आहे. बेअरस्टोने मालिकेत ७२ धावा नोंदविल्या. त्यामुळे त्याला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १९व्या स्थानावर पोहोचला आहे. तर बटलरने दोन सामन्यात मिळून १२१ धावा केल्याने त्याला मोठा फायदा झाला असून त्याने ४०व्या स्थानावरून थेट २८व्या क्रमावर झेप घेतलेली आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिन्चनेही मालिकेत चांगली फलंदाजी केली. त्याने तीन सामन्यांतून १२५ धावा केल्याने आपले तिसरे स्थान राखले आहेत. ग्लेन मॅक्सवेलनेही आपले सहावे स्थान राखण्यात यश मिळविले. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या रशिद खानने आपले अव्वल स्थान राखले आहे. अफगाणिस्तानचा मुजीब उर रेहमान दुसर्‍या स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाची २ स्थानांनी घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी फेकला गेला आहे, तर इमाद वासिम आणि शाबाद खान यांचीही एका स्थानाने घसरण झाली आहे. इंग्लंडच्या आदिल रशीदला २ स्थानांची बढती मिळून तो सातव्या स्थानी, ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन दोन स्थानांच्या बढतीसह दहाव्या स्थानी तर आफ्रिकेचा तबरेज शास्मी एक स्थानाच्या बढतीसह चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे.