झ्वेरेव, बुस्टा उपांत्य फेरीत

0
165

जर्मनीच्या पाचव्या मानांकित आलेक्झांडर झ्वेरेव व स्पेनच्या विसाव्या मानांकित पाब्लो कारेनो बुस्टा यांनी यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. झ्वेरेव याने ३ तास २५ मिनिटे चाललेल्या लढतीत क्रोएशियाच्या २७व्या मानांकित बोर्ना कोरिक याचा कडवा प्रतिकार चार सेटमध्ये १-६, ७-६ (५), ७-६ (१), ६-३ असा मोडून काढला.

पाब्लो कारेनो बुस्टा व कॅनडाच्या १२व्या मानांकित डॅनिस शापोवालोव यांच्यातील लढत ४ तास ८ मिनिटे रंगली. हा सामना बुस्टा याने ३-६, ७-६ (५), ७-६ (४), ०-६, ६-३ असा जिंकला.
उपांत्य फेरीत झ्वेरेव व कारेनो बुस्टा हे दोघे आमनेसामने येणार आहेत. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या २८व्या मानांकित जेनिफर ब्रेडीने कझाकस्तानच्या युलिया पुतिनेतसेवा हिला ६-३, ६-२ असे गारद केले. जपानच्या चौथ्या मानांकित नाओमी ओसाकाने ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने अजून एक पाऊल टाकताना अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्स हिला ६-३, ६-४ अशी धूळ चारली.